आषाढीची वारी म्हटलं की, सर्वांना टाळ-मृदूंग यांच्या गजरात, अभंग-ओव्यांच्या नामसंकीर्तनात दंग झालेले, माऊलीच्या दर्शनाची आस डोळ्यात बाळगून मैलोनमैल पायी प्रवास करणारे वारकरी आठवतात. ऊन-पाऊस-वादळ या कशाचाही विचार न करता ‘माऊली-माऊली’ करत सर्वजण मार्गक्रमण करत असतात. या वारीतील अभूतपूर्व सोहळे म्हणजे रिंगण होय. डोळ्यांचे पारणे फिटणारे हे सोहळे. वारी आणि रिंगण म्हणजे काय ? रिंगण रचना कशी असते आणि रिंगण सोहोळ्याचा आपल्या जीवनाशी असणारा संबंध जाणून घेणे उचित ठरेल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


वारी म्हणजे काय?

मराठी मध्ये ‘वारी’ हा शब्दप्रयोग सतत फेऱ्या मारणे या अर्थी केला जातो. वारी या शब्दाचा अध्यात्मामध्ये अर्थ सातत्याने एखाद्या ठिकाणी जाणे, नित्यनियमाने जाणे असा घेतला जातो. आषाढी-कार्तिकी एकादशीला ज्याप्रमाणे वारी जाते, त्याप्रमाणे दत्तसंप्रदायामध्येही वारीची प्रथा आहे. शाक्त संप्रदायामध्येही वारीला लोक जातात. इप्सित तीर्थस्थळाला ठराविक दिवशी परंतु नियमित भेट देणे म्हणजे वारी होय. जे वारी करतात ते वारकरी होय. महाराष्ट्र, कर्नाटक प्रांतात मोठ्याप्रमाणावर वारकरी संप्रदाय दिसतो.


रिंगण म्हणजे काय ?

रिंगण याचा अर्थ गोलाकार असा होतो. वारीतील रिंगण म्हणजे एक प्रकारचा खेळ म्हणता येईल. रिंगण म्हणजे म्हणजे पालखी भोवती गोल फिरणे. पंढरपूरच्या वारी सोहळ्यात रिंगणाची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात तरडगावजवळील चांदोबाचा लिंब, वाखरीजवळील बाजीरावाची विहीर आणि वाखरी अशा तीन; तर माळशिरस, खुडुस फाटा, ठाकूरबुवा समाधी, भंडीशेगावच्या पुढे अशा चार ठिकाणी गोल रिंगण होते. संत तुकोबा महाराजांच्या पालखी सोहळ्यात बेलवंडी, इंदापूर, अकलूज, माळीनगर, बाजीरावाची विहीर आणि वाखरी या ठिकाणी गोल आणि उभ्या रिंगणाची परंपरा आहे.

रिंगणाचे स्वरूप

वारीमध्ये असणाऱ्या रिंगणचे ठिकाण मोठे मैदान असते. वारकरी रिंगणाच्या स्थळी पोहोचले की, चोपदार रिंगण लावतात . यामध्ये मध्यभागी पालखी, पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी व दिंड्या, त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्याभोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे राहातात. रिंगण लावणे हे कौशल्याचे काम आहे. चोपदारांचे कौशल्य व वारकऱ्यांची शिस्त याठिकाणी दिसून येते. रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर – तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी व विणेकरी हे स्वतंत्ररित्या पळतात. रिंगणाचे मुख्य आकर्षण अश्वांची दौड हे असते. पालखी सोहळ्यात एक अथवा दोन अश्व सहभागी असतात. यात एका अश्वावर जरी पताका घेतलेला स्वार असतो, तर एक अश्व रिकामा असतो. रिकाम्या अश्वावर संत महाराज बसतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात. त्यानंतर त्यात अश्व मोकळा सोडतात. अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात. यावेळेस भाविक ‘माऊली माऊली’ असा गजर करतात.

हेही वाचा : विश्लेषण : कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ का होत आहे? कुत्र्यांच्या आक्रमकतेतील वाढीची कारणं काय?

रिंगणाचे प्रकार

रिंगणाचे गोल रिंगण आणि उभे रिंगण असे दोन मुख्य प्रकार आहेत. उडीचे रिंगण आणि मेंढी/बकरीचे रिंगण हे उपप्रकार आहेत. गोल रिंगण म्हणजे सर्वजण गोलाकार स्थितीत असतात आणि त्यामधून अश्वाची दौड होते. दुसरा प्रकार म्हणजे उभे रिंगण. यामध्ये दिंड्या वर्तुळाकार उभ्या न राहता पालखीच्या दोन्ही बाजूने समोरासमोर उभ्या राहतात. यामधून अश्वाची दौड होते. उडीचे रिंगण हा प्रकार रिंगण सोहोळे झाल्यावर असतो. रिंगण झाल्यावर दिंड्यांचे विविध खेळ होतात. हे खेळ होताना टाळ व भजन सुरू असते. यामध्ये मध्यभागी पालखी ठेवून बाजूने पाकळ्यांप्रमाणे रचना करून टाळकरी बसतात . वेगवेगळ्या ठेक्यांवर संतांची भजने होतात. या वर्तुळाच्या बाजूने पखवाज वादक उभे राहून पखवाज वाजवतात. अजून एक प्रकार म्हणजे बकरीचे रिंगण. संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका पालखी सोहळ्यात मेंढरांचे अथवा बकरी रिंगण सुद्धा होते. पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेले शेतकरी भाविक आपली मेंढरे घेऊन येतात . ही मेंढरे रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात . पालखी सोहळ्यात अशा प्रकारे विविध समाजातील लोक सहभागी होतात.

हेही वाचा : विश्लेषण : उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केलेले ‘गारदी’ नक्की आहेत तरी कोण? काय आहे गारदींचा इतिहास

रिंगणामागील अध्यात्म

हजारो वर्षांपासून चालत निघणाऱ्या वारीचे रूपांतर जेव्हा पालखी सोहळ्यात झाले, तेव्हापासून रिंगणाची परंपरा सुरू झाली, असे संदर्भ मिळतात.
रिंगणाची परंपरा ही लौकिक अर्थानेच सुरू झाली असावी. सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, वीणेकरी गोलाकार उभे राहतात. नामगजर सुरू होतो. टाळ-मृदुंगाच्या एकाच तालात आणि एकाच लयीत पदन्यास करीत वारकरी नाचू लागतात. या तालातच भरधाव वेगाने दिंडी सोहळ्यातील अश्व गोलाकार प्रदक्षिणा करीत पालखीला अभिवादन करतात. टाळ-मृदुंगाचा वेग, जयजयकार आणि वायुवेगाने धावणारे अश्व हे सारे दृश्य विलोभनीय असतेच; त्याचबरोबर लष्कराच्या छावणीला व शिस्तीला शोभणारेही असते. मुळात वारी हा बहुरूपी संतखेळ आहे. परमार्थ हा गंभीर चिंतनाने, इंद्रिय दमनाने, शुष्क आणि अत्यंत कठीण, तसेच अनाकलनीय अशा सैद्धांतिक व्याख्यानाने करायचा नाही, तर तो आनंदाने खेळत, स्वत:ला विसरत करायचा आहे. खेळ तर पांडुरंगालाही आवडतो.वारकरी या रिंगणात खेळताना सुखाने इतके धुंद झाले आहेत की ब्रह्मैक्यभावाने कसे एकरूप झाले, हेदेखील विसरले आहेत. जीवनाच्या परिघात ही सामरस्याची अनुभूती घेणे, हेच रिंगण आहे. एका ध्येयापासून निघून ध्येयपूर्ती करून, पुन्हा त्याच्या स्वरूपात येऊन मिळणे, हे रिंगण होय. प्रत्येकाला आपल्या ध्येयाचे, न्यायाचे, वृत्तीचे, कर्माचे, पुरुषार्थाचे रिंगण समजायला हवे. हे रिंगण उभे करून जो खेळकर भूमिकेतून जीवनाकडे पाहतो, तो जीवनवारीचा आनंदयात्री होतो. वारकरी हा सर्व संसारचिंता सोडून माऊलीच्या दर्शनाला जातो, तिथे माऊलीच्या भक्तीत एकरूप होतो, आणि पुन्हा आपल्या मूळ संसाराकडे नव्या ऊर्जेने परत येतो. हे त्याच्या आयुष्याचे रिंगण असते.

रिंगण हा वारीतील सर्वांच्याआकर्षणाचा भाग असतो. पण, हे रिंगण म्हणजे केवळ खेळ नाही, नामजप नाही तर आनंदयात्री प्रवास असतो…

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ringan ceremony which tells the meaning of life vvk
First published on: 25-06-2023 at 19:40 IST