– उदय गंगाधर सप्रे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक मनस्वी कलाकार व खरं तर त्रिपुराचा राजकुमार असलेला एक मनस्वी कलाकार ज्याचा ओढा संगीताकडे होता अशा सचिन देव बर्मन यांना जाऊन आज (बुधवारी) ४३ वर्षं झाली. दादा बर्मनच्या हिंदीतील संगीताची सुरुवात १९४६ च्या ‘शिकारी’ पासून झाली. १९४७ ला ‘दो भाई’ ते पार अगदी १९७६ च्या अर्जून पंडित पर्यंत हे संगीत वाहतं राहिलं. सुरांची आराधना करायची कधी गरज न भासलेल्या या श्रेष्ठ कलाकाराने रसिक श्रोत्यांना लोकसंगीत ते शास्त्रीय संगीतापर्यंत सगळ्या संगीताचा ‘प्यासा’ करून सोडलं , यात खूप समर प्रसंग आले. दिलकी रानी बरीच विद्या शिकवत चितोड विजय देऊन गेली , कधी लोकांचं प्यार भरं वागणं मिळालं तर कधी हाती मशाल धरावी लागली. कधी कोणी अफसर सजा देत नौजवाँ बनवून गेला तर कधी एक नजर ही बुझदिल पण ठरली. पण आपल्या कर्तृत्वावर अतूट विश्वास असलेल्या दादा बर्मननी संगीत क्षेत्रात बहार आणली, प्रसंगी बाजी लावली व लाल कुँवरला हाताशी धरून जाळं विणलं आणि संगीतातले शहेनशाह बनले — पण जीवन ज्योती तेवत ठेवत अरमान मोठेच ठेवले. टॅक्सी ड्रायव्हरने राधा कृष्ण पासून पार अगदी चालीस बाबा एक चोर मधून अंगारे पण दाखवले. सोसायटीतील ‘मुनीमजी’नी मदभरे ‘नैन’नी हाऊस नं. ४४ मधला देवदास पण दादांना दाखवला. कधी फंटूशचा प्यासा बनत पेईंग गेस्ट नौ दो ग्यारह होत मिस इंडियाला सोलवाँ सालमध्ये सितारोंसे आगे नेत लाजवंती बनवत काला पानीसारखी हवीहवीशी सजा बनला तर कधी चलती का नाम गाडी असं म्हणंत सुजाता साठी कागज के फूल घेऊन इन्सान जाग उठा. आताशा मियाँ बीबी राझी होत हरएक मंझिल वरून काला बाजार करत एक के बाद एक बंबईका बाबूला बेवकूफ बनवत अपना हाथ जगन्नाथ रवया दाखवत नीली आँखे वालं संगीत पण नाॅटी बाॅय झालं होतं. मग डाॅ. विद्या नी बात एक रातकी तेरे घरके सामने मेरी सूरत तेरी आँखे बनलेया बंदिनीला जिदी बनत कैसे कहूँ? असं वाटत असतानाच बेनझीर बनत हळूच संगीताचं महत्व सांगितलं. नंतर हा वसा आपणाकडे घेत तीन देवियाँनी गाईड करत Jewel Thief तलाश केला. संगीताच्या ज्योती ने आराधना करत करत इश्क पर जोर नही असं पटवंत प्रेमपुजारीला शर्मिली नजाकत देत नया जमाना दाखवला. बदलत्या जमान्यातल्या गॅम्बलरने तेरे मेरे सपने व जिंदगी जिंदगी म्हणत ये गुलसिताँ हमारा म्हणायचा अनुराग शिकवला. फागुन महिन्यातला छुपा रुस्तम अभिमान मग जुगनू ला उस पार घेऊन गेला. प्रेमनगरमधल्या सगीना ला चुपके चुपके संगत मिली आणि मग ती संगत त्याग बनून आपली दिवानगी दाखवत बारूद बनून अर्जून पंडित च्या सुपीक डोक्यात विसावली व शेवटी ३५ वर्षांनी रागिणी MMS करून थांबली.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: S d burman death anniversary sachin tendulkar name blog by uday sapre
First published on: 31-10-2018 at 11:47 IST