आतापर्यंत ५० कोटी फलक झळकल्याची माहिती; यंदा निवडणुकांमध्ये ‘प्रोग्रॅमॅटिक प्रणाली’चा वापर

शहराचे विद्रूपीकरण होऊ नये यासाठी ठिकठिकाणी फलकबाजी करण्यास मनाई असली तरी यंदाच्या निवडणुकीत ऑनलाइन फलकबाजीला मात्र जोर आला आहे. निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत विविध संकेतस्थळांवर प्रचाराचे तब्बल ५० कोटी फलक झळकल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी यंदा प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रोग्रॅमॅटिक प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांचा ऑनलाइन वावर वाढू लागतो. राजकीय पक्ष संकेतस्थळांवरील पारंपरिक जाहिराती, समाजमाध्यमांचा वापर करून आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतो. पण संकेतस्थळांवरील पारंपरिक जाहिरातींमधून फारसा फायदा होत नाही. ज्या व्यक्तीला जाहिरातींमध्ये रस नाही ती व्यक्ती जाहिरात बंद करून संकेतस्थळावर पुढे जाते. म्हणून राजकीय पक्षांनी आपला मोर्चा समाजमाध्यमांकडे वळविला. या माध्यमाचा फरक मोठय़ा प्रमाणावर दिसून आला. मात्र त्यातही प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार पोस्ट वाचत असतो. यामुळे सर्वच पोस्ट वाचल्या जातात असे नाही. प्रत्येकाच्या आवडीनुसार त्याच्यासमोर जाहिरात झळकाविणाऱ्या प्रोग्रॅमॅटिक प्रणालीचा वापर यंदाच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी केल्याचे समजते. या प्रणालीमुळे जाहिराती प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचल्या व त्याचा फायदा होत असल्याचे राजकीय पक्षांचे म्हणणे आहे.

प्रोग्रॅमॅटिक प्रणाली काय आहे?

या प्रणालीत आपण विविध संकेतस्थळांवर कोणत्या विषयाचा शोध घेत असतो, कोणत्या विषयासाठी किती वेळ देतो याचा अभ्यास केला जातो. याला वापरकर्त्यांची ऑनलाइन वागणूक असे म्हटले जाते. म्हणजे एखादी व्यक्ती महापालिकेशी संबंधित सकारात्मक माहिती वाचत असेल तर ती व्यक्ती संकेतस्थळावर वाचत असलेल्या माहितीशी संबंधित एक डिजिटल जाहिरात फलक (बॅनर जाहिरात) झळकतो. यामुळे मतदारांना त्यांच्या आवडीनुसार जाहिराती झळकविल्या जातात.

याचा प्रभाव अधिक पडत असल्याचे राजकीय पक्षांना जाणवले. यामुळेच यंदा प्रोग्रॅमॅटिक प्रणालीचा स्वीकार झाल्याचे व्हटरेझचे संस्थापक आशीष शहा यांनी सांगितले. या प्रणालीचा वापर अमेरिका निवडणुकांमध्येही झाला आहे. या प्रणालीच्या माध्यमातून आक्रमकपणे प्रचार करणे शक्य होत असल्याचेही शहा यांनी नमूद केले. यंदा या प्रणालीचा वापर सुरू झाला तेव्हा पाच कोटी फलक झळकवण्याचे उद्दिष्ट होते. मात्र ते ५० कोटींच्या वर गेल्याचेही त्यांनी नमूद केले.