मोदींना का डावलले ? काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांचा सवाल

मुंबईत ठिकठिकाणी भाजपच्या वतीने लावण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे छायाचित्र झळकत असले तरी यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तेवढे स्थान देण्यात आलेले नाही. नोटाबंदी किंवा अन्य कारणांमुळेच मोदींना डावलण्यात आले आहे का, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी शुक्रवारी केला.

काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईत आलेल्या सिंग यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला. ‘हा माझा शब्द आहे’ या भाजपच्या जाहिराती मुंबईभर झळकल्या आहेत. यावर सर्वत्र मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी छबी दिसते. ८० टक्के जागा फडणवीस तर २० टक्के जागा मोदी यांना देण्यात आली आहे. आतापर्यंत मोदींची छबी मोठी असायची. पण मुंबईत भाजपला मोदी का नकोसे झाले, असा सवालही सिंग यांनी केला. नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत साऱ्यांनाच फटका बसला आहे. मोदींच्या नावे मते मागितल्यास विपरित परिणाम होऊ शकतो, असा बहुधा अंदाज भाजप नेत्यांना आला असावा. तसेच मोदी यांच्या नावे मते मिळणार नाहीत. म्हणूनच मोदी यांना डावलले असावे, अशी शक्यता दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केली.

शिवसेना आणि भाजपची लढाई ही वैचारिक नसून, लेनदेनची लढाई आहे. महापालिकेच्या लुटीत मिळणारा हिस्सा किती कोणाला यावरून हा सारा वाद असल्याची टीकाही सिंग यांनी केली. शिवसेना हा खंडणीखोर किंवा हफ्तेखोरांचा पक्ष आहे, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस करतात, मग या पक्षाच्या मांडीला मांडी लावून सत्तेत कसे बसतात, असा सवालही त्यांनी केला.

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपची परिस्थिती डामाडौल आहे. नोटाबंदीचा पक्षाला चांगलाच फटका बसला आहे. नोटाबंदीमुळे लाखो लोकांचा रोजगार बुडाला किंवा व्यापाऱ्यांवर गदा आली. मोदी सरकारच्या काळात भ्रष्टाचार कोठेही कमी झालेली नाही. आता कुठे गेले अण्णा हजारे, असा सवालही सिंग यांनी केला. तेव्हा केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात शंख फुंकला होता. आता हेच केजरीवाल गोव्यात पैसे घ्या, पण मत देऊ नका, असे आवाहन करतात. परिस्थितीनुरूप सारेच बदलतात, असेही मत सिंग यांनी व्यक्त केले. नोटाबंदीमुळे आर्थिक आघाडीवर गोंधळाची परिस्थिती असून, आणखी वर्षभर तरी हा गोंधळ निस्तरण्यास जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.