मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजप व शिवसेना यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडताना दिसत नाही. मुंबईची लूट करण्याची गेल्या ६० वर्षांपासून परंपरा सुरूच आहे. मुंबई-ठाणे अशा शहरांना विकासाच्या नावाखाली केंद्राकडून मदत देण्यात राजकीय मतलबच जास्त असतो. बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेनच्या नावाखाली हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यांच्या भवितव्याचे काय असा सवाल करत जनहिताचे प्रश्न विचारणारे विकासाचे मारेकरी आणि गैरकारभारी ठरत असतील तर मग नोटाबंदीमुळे जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांना विकासाचे बळी म्हणावे काय? निदान महाराष्ट्राच्या राजधानीत तरी आम्ही निरपराध्यांना असे नाहक चिरडू देणार नसल्याचे त्यांनी ठणकावले. उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान मोदींची जी सभा होते ती भाजपचे नेते म्हणून नव्हे तर देशाचे पंतप्रधान म्हणून ते सत्तेच्या सर्व लवाजम्यासह अवतरतात व मतदारांसमोर आश्वसनांची पोतडी रिकामी करतात. सर्वच मुख्यमंत्री असेच करतात असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने ही टीका केली. मुंबईवरील संकटांच्या वेळी ज्यांनी शेपटय़ाच घातल्या त्यांनी मुंबई वाचवण्यासाठी छातीवर घाव झेलणाऱया शिवसेनेच्या वाटेला जाऊ नये असा इशाराही दिला. शिवसेना म्हणजे सत्तेतून निर्माण झालेला बुडबुडा नाही. शिवसैनिकांच्या रक्तामध्ये स्वार्थाचा नाही, तर राष्ट्रीयत्वाचा आणि महाराष्ट्र धर्माचा जबरदस्त ‘जर्म’ शिवसेनेने निर्माण केला असल्याचे त्यांनी म्हटले.

काय म्हटलं शिवसेनेने…
*सत्ताधारी पक्ष जेव्हा अशा निवडणुकांत उतरतात तेव्हा संपूर्ण यंत्रणा, प्रशासन, पैसा अशा गुटगुटीत गोळया खाऊन आलेली सूज त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसत असते. परंतु अशा सगळ्यांना शिवसेना पुरून उरली.
*मुंबईच्या अस्तित्वाची लढाई आतापर्यंत शिवसेनेने एकहातीच लढली आहे. निवडणुकीआधी काही मंडळींना अचानक मुंबई प्रेमाचे भरते येते.
*१० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका या ‘मिनी विधानसभा’ वगैरे असल्याचे म्हटले जात आहे. पण प्रत्येक निवडणूक ही स्वतंत्र विचारांची असते. जो सत्ताधारी पक्ष असतो त्या पक्षाचे मुख्यमंत्री संपूर्ण मंत्रिमंडळासह निवडणुकीच्या मैदानात तुताऱया फुंकत उतरतात.