ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आज मुंबई महानगर पालिकेची सोडत पुन्हा जाहीर होणार आहे. मात्र, यावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. ओबीसींच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीची माहिती निवडणूक आयोगाकडे देण्यात आली असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांनी मुंबई मनपा आयुक्तांना पत्र लिहिले आहे. तसेच यावर कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही कोटेचा यांनी दिला आहे.

पुर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये एखाद्या वॉर्डमध्ये ओबीसी आरक्षण नसेल तर त्याठिकाणी तो वार्ड ओबीसी आरक्षित करावा लागतो. मात्र, तसे करण्यात आलेले नाही. एकूण ६४ वॉर्ड आहेत. या वॉर्डचा समावेश आजच्या सोडतीत होवू नये, अशी मागणी कोटेचा यांनी केली आहे.

या वार्डमध्ये महिला ओबासी की सर्वसाधारण ओबीसी अशा पद्धतीने गटवारी होणेही आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास आम्ही उच्च न्यायालयात जाऊ, असा इशारादेखील कोटेचा यांनी दिला आहे.