Perplexity CEO On AI Instagram: एआय स्टार्टअप पर्प्लेक्सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद श्रीनिवास यांनी तरुणांना एक संदेश दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अंतहीन सोशल मीडिया स्क्रोलिंग सोडून द्या आणि त्याऐवजी एआय टूल्समध्ये प्रभुत्व मिळवा. गुरुवारी मॅथ्यू बर्मन यांच्या मुलाखतीत बोलताना श्रीनिवास यांनी लोकांना “इन्स्टाग्रामवर डूमस्क्रोल करण्यात कमी आणि एआय वापरण्यात अधिक वेळ घालवा,” असे आवाहन केले.

श्रीनिवास यांनी यावेळी इशारा दिला की, जे लोक एआय तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यात अयशस्वी ठरतील, ते नोकरीच्या क्षेत्रात मागे राहतील. “जे लोक खरोखर एआय वापरण्याच्या आघाडीवर आहेत, त्यांना ज्या लोकांना एआय वापरता येत नाही त्यांच्यापेक्षा खूप चांगल्या संधी मिळणार आहेत”, असे श्रीनिवास यांनी सांगितले.

श्रीनिवास यांनी यावेळी कबूल केले की, वेगाने विकसित होणाऱ्या एआय तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे बहुतेक लोकांसाठी आव्हानात्मक ठरते. “एखादी गोष्ट वेगाने आत्मसात करण्यात मानवजात कधीही अनुकूल नव्हती. एआय तंत्रज्ञान दर तीन ते सहा महिन्यांनी विकसित होते, आणि आपण त्याच्याशी किती वेगाने जुळवून घेऊ हे पुढील काळात महत्त्वाचे ठरणार आहे”, असे श्रीनिवास पुढे म्हणाले.

पर्प्लेक्सिटी प्रमुखांनी भाकीत केले की, काही नोकरदार एआयच्या प्रगतीशी जुळवून घेण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांना अपरिहार्यपणे नोकऱ्या गमवाव्या लागतील.

एआयमुळे उद्योगांमध्ये कर्मचारी संख्या कमी होत असल्याने, श्रीनिवास यांना असे वाटते की, नवीन रोजगाराच्या संधी पारंपरिक कंपन्यांपेक्षा उद्योजकांकडूनच आल्या पाहिजेत. “नोकरी गमावणारे इतर लोक स्वतः कंपन्या सुरू करतात आणि एआयचा वापर करतात, किंवा ते एआय शिकून नवीन कंपन्यांमध्ये योगदान देतात”, असे त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीनिवास यांचे भाष्य रोजगारावरील एआयच्या परिणामाबाबतच्या व्यापक चिंतेशी सुसंगत आहे. अँथ्रोपिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारियो अमोदेई यांनी काही दिवसांपूर्वीच भाकीत केले आहे की, एआयमुळे पाच वर्षांत ५०% व्हाइट-कॉलर एंट्री-लेव्हल नोकऱ्यांचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. तर एआयचे प्रणेते जेफ्री हिंटन यांनी इशारा दिला आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता सामान्य बौद्धिक श्रमांमध्ये कामगारांची जागा घेईल.