Bitcoin Price Drop Analysis: एका महिन्यापूर्वी सर्वकालीन उच्चांक गाठल्यानंतर रविवारी बिटकॉइनमध्ये १.५९% घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. या घसरणीमुळे वर्षाच्या सुरुवातीपासून गुंतवणूकदारांना झालेला ३०% नफा संपुष्टात आला आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या क्रिप्टोकरन्सीला पाठिंबा देण्याच्या धोरणाचा उत्साह कमी झाला आहे, तसेच अलिकडच्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आलेल्या मंदीमुळे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास तयार नाहीत.
रविवारी बिटकॉइन ९३,७१४ डॉलर्सच्या खाली घसरला, जो गेल्या वर्षीच्या अखेरीस त्याच्या क्लोजिंग प्राइसपेक्षाही कमी आहे. त्यावेळी ट्रम्प यांच्या निवडणूक विजयानंतर बाजार तेजीत होते. ६ ऑक्टोबर रोजी बिटकॉइन १२६,२५१ डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता, परंतु ट्रम्प यांनी टॅरिफबद्दल अनपेक्षित टिप्पणी केल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी त्यामध्ये घसरण सुरू झाली होती.
गेल्या महिन्यात, ईटीएफ व्यवस्थापक आणि मोठ्या कंपन्यांसह अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी त्यांची बिटकॉइनमधील गुंतवणुकी कमी केली आहे. यामुळे या वर्षाच्या सुरुवातीला बिटकॉइनला विक्रमी उच्चांक गाठण्यास मदत करणारे घटक कमी झाले आहेत, असेही ब्लूमबर्गच्या वृत्तात म्हटले आहे.
बिटकॉइनमध्ये केवळ ईटीए मधूनच २५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक आली आहे, ज्यामुळे बिटकॉइनची एकूण मालमत्ता सुमारे १६९ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे पोर्टफोलिओ संतुलित करण्यासाठी आणि वाढत्या महागाईपासून संरक्षण करण्यास मदत झाली.
नॅनसेनचे संशोधन विश्लेषक जेक केनिस यांनी ब्लूमबर्गला सांगितले की, दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी नफा बुक करणे, मोठ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेणे आणि जागतिक आर्थिक चिंता यामुळे बिटकॉइनमध्ये घसरण झाली आहे.
या वर्षी बिटकॉइनने गुंतवणूकदारांना चांगलाच धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन टॅरिफ जाहीर केल्यानंतर एप्रिलमध्ये ते सुमारे ७४,४०० डॉलर्सपर्यंत घसरले होते. त्यानंतर ते पुन्हा वाढून विक्रमी पातळीवर गेले आणि मग पुन्हा खाली आले.
जगातील पहिली आणि सर्वात मोठी क्रिप्टोकरेन्सी असलेले बिटकॉइन अजूनही एकूण क्रिप्टो बाजाराचा सुमारे ६०% हिस्सा राखून आहे, ज्याची एकूण किंमत सुमारे ३.२ ट्रिलियन डॉलर्स आहे.
