मुंबईः जपानच्या सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुपचे भारतातील त्यांचे अंग असलेल्या एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेडमध्ये (पूर्वाश्रमीची फुलरटन इंडिया क्रेडिट कंपनी लि.) हक्कभागांच्या माध्यमातून १,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर या कंपनीने तिच्या पूर्ण मालकीच्या एसएमएफजी इंडिया गृहफायनान्स कंपनी लिमिटेड अर्थात एसएमएफजी गृहशक्तीमध्ये १५० कोटी रुपये गुंतवले आहेत.
एसएमएफजीद्वारे गुंतवण्यात आलेला १,३०० कोटींचा निधी हा कंपनीसाठी महत्त्वपूर्ण असून, धोरणात्मक विस्ताराच्या प्रयत्नांना यातून बळकटी मिळेल, असा विश्वास एसएमएफजी इंडिया क्रेडिटचे मुख्य वित्तीय अधिकारी पंकज मलिक यांनी व्यक्त केला. यातून परवडणाऱ्या किमतीतील गृहनिर्माणाला चालना देण्यासाठी एसएमएफजी गृहशक्तीमध्ये कंपनीला गुंतवणूक करता आली असून, त्या आधारे शाश्वत वाढीसह आणि कंपनीला तिच्या ग्राहकांना मूल्य प्रदान करता येईल, असे ते म्हणाले. ३१ डिसेंबर २०२३ अखेर कंपनीची भारतात व्यवस्थापन होत असलेली मालमत्ता (एयूएम) ४२,४८७ कोटी रुपयांवर पोहोचली असून, यात वार्षिक २४ टक्के वाढ झालेली आहे. कंपनी ९९० शाखांद्वारे देशभरात विस्तारली आहे.