मुंबई: अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पोर्ट्स अँड एसईझेड यांसह एकूण सहा अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या गंभीर आरोपांमुळे झालेली पडझड आणि तोटा पूर्णपणे पुसून टाकला आहे आणि आता ते त्यांच्या जानेवारी २०२३ च्या पातळीवर पुन्हा पोहोचले आहेत.

समूहातील एकूण दहा कंपन्यांपैकी अदानी टोटल गॅस, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी विल्मर आणि एनडीटीव्ही हे अजूनही हिंडेनबर्गने आरोप करण्याआधीच्या म्हणजे जानेवारी २०२३ पूर्वीच्या पातळीवर पोहोचू शकलेले नाहीत. अदानी टोटल गॅसचे मूल्य अजूनही पूर्व उच्चांकावरून ७४ टक्के, अदानी एनर्जी सोल्युशन्सचे ५९ टक्के, अदानी विल्मर ३५ टक्के आणि एनडीटीव्हीचे मूल्य ११ टक्के खाली आहे.

हेही वाचा >>>‘इंडिगो’ला वाढत्या प्रवासी संख्येने दुपटीने नफा

मागील दोन सत्रांत समभागांतील तेजीमुळे अदानी समूहाच्या समभागांचे बाजार मूल्य १६.६२ लाख कोटींपुढे पोहोचले आहे. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि अदानी पॉवर यांनी अनुक्रमे ४० टक्के आणि ३५ टक्क्यांहून अधिक वाढ साधून उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. अंबुजा सिमेंट्स आणि अदानी एंटरटेनमेंटच्या समभाग मूल्यातही लक्षणीय वाढ झाली आहे, ते अनुक्रमे २५ टक्के आणि २० टक्के वधारले आहेत.

हिंडनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी २०२३ रोजी, अदानी एंटरप्रायझेसच्या प्रस्तावित २०,००० कोटी रुपयांच्या समभाग विक्री (एफपीओ) आधी अदानी समूह त्यांच्याच कंपन्यांवर समभागांचे मूल्य फुगवणारी हेराफेरी करत असल्याचा आरोप करणारा अहवाल प्रकाशित केला होता. त्यावेळी समूहाने हा अहवाल निराधार असल्याची भूमिका घेत, हे देशाविरूद्धचे कारस्थान असल्याचे म्हटले होते.

कंपनीचे नाव हिंडेनबर्ग आरोपापूर्वी बाजारभांडवल सध्याचे बाजारभांडवल

बाजारभांडवल बदल

अदानी पॉवर १,०५,३९०.८६                         २,७२,९७४.८५             १,६७,५८३.९९

अदानी पोर्ट्स १,६६,१२५.४९                         ३,०५,६३८.०६             १,३९,५१२.५७

अंबुजा सिमेंट ९९,४६०.९७                         १,५६,५३१.५०             ५७,०७०.५३

एसीसी             ४३,६१३.५९                         ४८,९९२.७६                         ५,३७९.१७

अदानी एंटरप्रायझेस ३,९१,५३३.३९             ३,९४,२७७.९८                         २,७४४.५९

अदानी ग्रीन एनर्जी ३,०५,८५२.९१             ३,०६,३३८.१०                         ४८५.१९

एनडीटीव्ही            १,८३२.५०                         १,५७७.६१                         -२५४.९९

अदानी विल्मर ७०,९८८.४५                         ४४,८७१.४०                        -२६,११७.०५

अदानी एनर्जी ३,१०,३६९.११             १,२४,१७६.६५                         -१,८६,१९२

अदानी टोटल गॅस ४,२८,१०१,०७             १,०७,९९०.३५                         -३,२०,११०.७२

(रु.कोटी) स्त्रोत : बीएसई

अदानी पोर्ट्सचा ‘सेन्सेक्स’मध्ये समावेश

येत्या २४ जूनपासून अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचा ‘सेन्सेक्स’मध्ये समावेश करण्याची घोषणा मुंबई शेअर बाजाराने केली आहे. तर ‘सेन्सेक्स’ निर्धारित करणाऱ्या आघाडीच्या ३० कंपन्यांमधून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी विप्रोला वगळण्यात येईल. अदानी पोर्ट्सचे समभाग मूल्य वर्षभरात दुपटीने वाढले आहे. अदानी पोर्ट्सच्या समावेशामुळे ‘सेन्सेक्स’चे मूल्यांकनही वाढू शकते.