नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हो on णारा खर्च २७ टक्क्यांनी वाढून १८.२६ लाख कोटींवर पोहोचला आहे, जो आधीच्या आर्थिक वर्षात १४ लाख रुपये होता, असे रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे. सरलेल्या मार्च महिन्यात क्रेडिट कार्डवरील खर्च सुमारे १०.७ टक्क्यांनी वाढून फेब्रुवारीमधील १.४९ लाख कोटींवरून १.६४ लाख कोटींवर पोहोचला आहे.
हेही वाचा >>> दुप्पट उद्गम कर-भार ३१ मेपर्यंत शिथिल
मार्चमध्ये आर्थिक वर्षाच्या शेवटी आणि सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या खर्चात वाढ होते. एकूण १.६४ लाख कोटींपैकी, मार्च २०२४ मध्ये देशातील विक्रेत्यांकडील ‘पॉईंट ऑफ सेल’ व्यवहार फेब्रुवारीमधील ५४,४३१.४८ कोटींवरून ६०,३७८ कोटीपर्यंत वर पोहोचले. दरम्यान, ई-कॉमर्स माध्यमातून होणारे व्यवहार ९५ हजार कोटींवरून १.०५ लाख कोटींपर्यंत वधारले आहेत.
हेही वाचा >>> Amit Shah Investment: अमित शाह यांच्याकडे कुठल्या कंपनीचे किती शेअर्स आहेत माहीत आहे?
आघाडीच्या कंपन्यांमध्ये, एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून ४३,४७१.२९ कोटी रुपयांचे व्यवहार झाले, जे फेब्रुवारीमधील ४०,२८८.५१ कोटी रुपयांच्या तुलनेत ८.५७ टक्क्यांनी जास्त आहे. त्याचप्रमाणे, ॲक्सिस बँक कार्डच्या माध्यमातून या कालावधीत १८,९४१.३१ कोटींचे व्यवहार पार पडले. त्यात ८.०५ टक्के वाढ नोंदवली. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर फेब्रुवारीमध्ये २६,८४३.०३ कोटी रुपयांच्या तुलनेत १४.४९ टक्क्यांनी वाढून ३०,७३३.११ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर एसबीआय कार्डचे व्यवहार ७.३२ टक्क्यांनी वाढून २४,९४९.१७ कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. मार्च २०२४ मध्ये भारतातील बँकांनी वितरित केलेल्या एकूण क्रेडिट कार्डांची संख्या १०.१ कोटींवर पोहोचली आहे. एचडीएफसी बँकेने सर्वाधिक २.०५ कोटी क्रेडिट कार्ड वितरित केले आहे. त्यापाठोपाठ एसबीआय कार्डने १.८८ कोटी, आयसीआयसीआय बँक १.६९ कोटी आणि ॲक्सिस बँकेने १.४२ कोटी कार्ड वितरित केले आहेत.