scorecardresearch

क्रेडिट कार्डचा देणी थकिताचा जानेवारीत विक्रम; २९.६ टक्के वाढीसह १.८७ लाख कोटींचा उच्चांक

डिजिटलायझेशन यामुळे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत आली आहे

credit card
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

पीटीआय, नवी दिल्ली

करोनाकाळात वाढलेले ऑनलाइन व्यवहार आणि त्या परिणामी वाढलेले डिजिटलायझेशन यामुळे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत आली आहे. तथापि क्रेडिट कार्डाचा अतिरेकी वापरही वाढला असल्याचे सरलेल्या जानेवारी २०२३ मध्ये त्यावरील एकूण थकिताच्या रकमेने गाठलेला सार्वकालिक उच्चांक दर्शवतो. ही अशी न भरली गेलेली थकबाकी जानेवारीत २९.६ टक्क्यांनी वाढून १.८७ लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये क्रेडिट कार्डच्या थकबाकीमध्ये वार्षिक वाढ २९.६ टक्के होती, जी मागील वर्षीच्या याच महिन्यात सुमारे १० टक्के होती. तर थकबाकीची रक्कम जानेवारी २०२२ मधील १,४१,२५४ कोटी रुपयांवरून, या वर्षी जानेवारीमध्ये १,८६,७८३ कोटी रुपये झाली आहे.

आणखी वाचा- Gold-Silver Price on 8 March 2023: लग्नसराईत सोनं महागणार? वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत क्रेडिट कार्डच्या थकबाकीमध्ये २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये सर्वाधिक ३०.७ टक्के वाढ नोंदवली गेली होती. डिजिटलायझेशनमुळे ग्राहकांकडून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारे व्यवहार वाढल्याने त्यांचा खर्चदेखील वाढला आहे, असे मत एसबीआय कार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामा मोहन राव अमारा यांनी व्यक्त केले. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुलभतेने व्यवहार पार पडत असल्याने आरोग्य आणि वैयक्तिक निगेसंबंधित खर्च, शिक्षण, दैनंदिन देयके यांसह इतर कामांसाठी त्या माध्यमातून व्यवहार केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये १.२६ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत या वर्षी जानेवारीमध्ये त्या माध्यमातून १.२८ लाख कोटी मूल्याचे व्यवहार पार पडले. वार्षिक आधारावर त्यात ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

आणखी वाचा- ऐरॉक्स टेक्नॉलॉजीची ७५० कोटींच्या ‘आयपीओ’ योजनेतून माघार

वर्षागणिक वाढीवर नजर टाकली तर कार्ड वापरात ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या ११ महिन्यांपासून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहाराचे मूल्य १ लाख कोटीहून अधिक राहिले आहे, असे क्रेडिट कार्ड वापराच्या मासिक कलाबद्दल राव यांनी सांगितले.

जानेवारी २०२३ च्या अखेरपर्यंत, खासगी आणि सरकारी बँकांनी सुमारे ८.२५ कोटी क्रेडिट कार्ड वितरित केले आहेत. यामध्ये खासगी क्षेत्राचे योगदान अधिक आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक बँक आणि सरकारी क्षेत्रातील एसबीआय कार्ड या देशातील आघाडीच्या क्रेडिट कार्ड प्रदात्या कंपन्या आहेत.

कार्डधारकांच्या संख्येत वाढ कशामुळे?

तारण कर्ज आणि व्यवसाय कर्जासारख्या सुरक्षित कर्जाच्या तुलनेत, एकूणच वैयक्तिक कर्जाची मागणी वाढते आहे. तर क्रेडिट कार्ड हे कधीही-कोणत्याही वेळी मिळविलेले वैयक्तिक कर्जाचाच विनासायास प्रकार आहे. नुकतेच नोकरीला लागलेल्या नवपदवीधरांकडून क्रेडिट कार्डला अधिक मागणी आहे. ते आर्थिकदृष्ट्या अधिक जागरूक झाले असून या माध्यमातून ‘क्रेडिट स्कोअर’ (पत-गुणांक) सुदृढ करण्याचादेखील ते प्रयत्न करतात. या क्षेत्रात तंत्रज्ञानाधारित वित्त कंपन्यांनी ऑनलाइन माध्यमातूनदेखील क्रेडिट कार्ड देण्याची अतिशय सुलभ सुविधा दिल्यामुळे कार्डधारकांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र कुवतीच्या पल्याड जाणारा वापरही वाढत आहे.

आणखी वाचा- क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंटमधून करा हजारोंची बचत; शॉपिंग, ट्रॅव्हलसह ‘या’ गोष्टींवर मिळवा भरघोस सूट

कार्ड थकबाकी म्हणजे काय?

क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या खरेदी विनिमयानंतर सदर रक्कम ही ठरावीक काळात पूर्णपणे चुकती केल्यास त्यावर कोणतेही शु्ल्क कार्डधारकाला भरावे लागत नाही. मात्र विहित वेळेत (साधारण महिनाभरात) कार्ड वापरावरील भरल्या गेलेल्या रकमेला थकीत शिल्लक, अथवा वर्तमान शिल्लकदेखील म्हटले जाते. यामध्ये खरेदीची रक्कम , शिल्लक हस्तांतरण, रोख अग्रिम, व्याज शुल्क आणि अन्य शुल्क यांचा समावेश असतो. क्रेडिट कार्डवरील व्याजाचा दर हा दरमहा २.५ टक्के ते ३.५ टक्के या दरम्यान असतो.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 11:51 IST