मुंबई : आरोग्य सेवा क्षेत्रातील जीपीटी हेल्थकेअर लिमिटेड कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) २२ फेब्रुवारीपासून खुली होत आहे. आयएलएस हॉस्पिटल्स या नाममुद्रेने मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांची शृंखला चालवणाऱ्या या कंपनीने तिच्या विक्रीला खुल्या समभागांसाठी प्रत्येकी १७७ रुपये ते १८६ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे.
हेही वाचा >>> मलाबार गोल्ड, टायटनसह चार नाममुद्रांना जागतिक मानांकन
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांना २६ फेब्रुवारीपर्यंत कंपनीच्या समभागांसाठी बोली लावणारा अर्ज करता येईल. सुकाणू (अँकर) गुंतवणूकदारांना २१ फेब्रुवारी रोजी कंपनीचे समभाग खरेदीसाठी उपलब्ध होतील. कंपनी नव्याने ४० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करणार आहे. तर ऑफर फॉर सेलच्या (ओएफएस) माध्यमातून कंपनीचे २.६ कोटी समभाग विक्रीसाठी खुले होत आहेत. हे समभाग बॅनियान ट्री ग्रोथ कॅपिटलच्या मालकीचे आहेत. बॅनियान ट्रीचा जीपीटी हेल्थकेअरमध्ये ३२.६४ टक्के हिस्सा आहे. हा संपूर्ण हिस्सा कंपनी विकणार आहे.
हेही वाचा >>> झेनिथ ड्रग्जची ४०.६७ कोटींची भागविक्री खुली
‘आयपीओ’तून उभ्या राहणाऱ्या निधीपैकी ३० कोटी रुपये कर्जफेडीसाठी वापरला जाणार आहे. या माध्यमातून कंपनीकडून सुमारे ५२५.१४ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे. जीपीटी हेल्थकेअरने कोलकात्यात २००० मध्ये आठ खाटांच्या रुग्णालयासह सुरूवात केली. आजच्या घडीला कंपनीची चार मल्टीस्पेशालिटी रुग्णालये असून, खाटांची क्षमता ५६१ आहे. जेएम फायनान्शियल ही या ‘आयपीओ’ची एकमेव व्यवस्थापक आहे.