पीटीआय, नवी दिल्ली
टाटा मोटर्सच्या मालकीच्या जग्वार लँड रोव्हरने (जेएलआर) भारतात आपल्या रेंज रोव्हर आणि रेंज रोव्हर स्पोर्ट्स या वाहनांचे उत्पादन सुरू केले आहे. सध्या इंग्लंडमधील सोलिहुल प्रकल्पातून या दोन श्रेणींमधील वाहनांचे उत्पादन घेऊन आणि ती भारतासह जगभरातील सुमारे १२१ देशांमध्ये निर्यात केली जातात. मात्र ५४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही वाहने इंग्लंडबाहेर उत्पादित होणार आहेत.
देशात जग्वार लँड रोव्हरच्या वाहनांची निर्मिती केली होणार असल्याने किमतीमध्ये सुमारे १८ ते २२ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे. किमतीतील घसरणीमुळे ही वाहने किफायतशीर होणार असून, याचा त्यांच्या विक्रीत आणखी वाढ होण्यास मदत होईल. जेएलआर इंडियाने गेल्या आर्थिक वर्षात भारतात ४,४३६ वाहनांची विक्री केली. विक्रीतील ही वाढ ८१ टक्क्यांवर गेली आहे.
हेही वाचा >>>जिओ फायनान्स ‘एफडीआय’ मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढवणार
टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी, टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी १५ वर्षांपूर्वी जेएलआर खरेदी करून तिचा टाटा समूहात समावेश केल्याबद्दल कौतुक केले. रेंज रोव्हरची निर्मिती भारतातच केली जाणार आहे, हा एक खूप खास आणि अभिमानाचा क्षण आहे, असेही ते म्हणाले.रेंज रोव्हर मालिकेतील इव्होक या सर्वात स्वस्त वाहनाची सध्याची किंमत ६७.९० लाख रुपये आहे आणि रेंज रोव्हरच्या सर्वात महागड्या वाहनाची किंमत २.३९ कोटी रुपये आहे.