अजय वाळिंबे

एसआरएफ लिमिटेड (बीएसई कोड ५०३८०६)

Portfolio RATHMANI METALS AND TUBES LIMITED
माझा पोर्टफोलियो : ‘पोर्टफोलिओ’ला देई पोलादी ताकद ! रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स लिमिटेड
One to three prize shares from moTilal Oswal Financial
मोतीलाल ओसवाल फायनान्शियलकडून एकास तीन बक्षीस समभाग; नफा चारपट वाढीसह ७२४ कोटींवर
jaguar land rover
लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….

प्रवर्तक: श्रीराम समूह
बाजारभाव: रु. २,२५१ /-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : केमिकल्स
भरणा झालेले भागभांडवल: रु. २९६.४२ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५०.५३

परदेशी गुंतवणूकदार २०.०४
बँकस्/ म्युचुअल फंडस्/ सरकार १३.७१

इतर/ जनता १५.७२
पुस्तकी मूल्य: रु. ३४८

दर्शनी मूल्य: रु. १०/-
गतवर्षीचा लाभांश: ७२%

प्रति समभाग उत्पन्न: रु.६४.५६
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३४.९

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.४३
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३०

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ११.४
रिटर्न ऑन कॅपिटल : २२.४
बीटा: ०.८

बाजार भांडवल: रु. ६६,७८० कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २,६४० / २,०४०

वर्ष १९७० मध्ये स्थापन झालेली एसआरएफ लिमिटेड श्रीराम समूहाची भारतातील एक आघाडीची रसायन कंपनी असून, कंपनी कापड, रसायने, पॅकेजिंग फिल्म्स, ॲल्युमिनियम फॉइल आणि इतर पॉलिमरचे उत्पादन आणि विक्री करते.

कंपनीच्या रासायनिक व्यवसायात दोन प्रमुख उत्पादन विभाग आहेत:

फ्लोरोकेमिकल्स – फ्लोरोकेमिकल्स व्यवसायात रेफ्रिजरंट्स, फार्मा प्रोपेलेंट्स आणि इतर औद्योगिक रसायनांचा समावेश होतो. ही उत्पादने कंपनीच्या भिवंडी (राजस्थान) आणि दहेज (गुजरात) येथील प्रकल्पातून होतात.

आज रेफ्रिजरंट क्षेत्रात एसआरएफ देशांतर्गत बाजारपेठेत आघाडीची कंपनी मानली जाते. कंपनीने नवीन रसायन ‘एफ ६०० ए’ दाखल केल्याने त्याचा बाजारातील हिस्सा वाढला आहे. एसआरएफची मेथिलीन क्लोराईड, क्लोरोफॉर्म आणि कार्बन टेट्रा क्लोराईड ही उत्पादने फार्मा आणि ॲग्रोकेमिकल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरतात.

स्पेशालिटी केमिकल्स – स्पेशालिटी केमिकल्स विभागाची उत्पादने मुख्यत्वे ॲग्रोकेमिकल आणि फार्मास्युटिकल क्षेत्रात वापरली जातात. एसआरएफ फ्लोरिनेशन केमिस्ट्रीत निपुण असून आता काही नॉन-फ्लोरिनेटेड केमिस्ट्रीमध्ये देखील उत्तम कामगिरी करत आहे. एसआरएफने अलीकडेच महसूल वाढीसाठी सहा नवीन ॲग्रो इंटरमिडियरीज आणि तीन फार्मा इंटरमिडियरीज सुरू केले आहेत. एसआरएफची केमिकल्स टेक्नॉलॉजी ग्रुप फ्लोरोकेमिकल्स आणि स्पेशालिटी केमिकल्स व्यवसायांसाठी नवीन उत्पादने आणि प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्यांची भारतात दोन संशोधन आणि विकास केंद्रे असून, आतापर्यंत एकूण ८३ मान्यताप्राप्त जागतिक पेटंट आहेत.

या खेरीज कंपनी पॅकेजिंग फिल्म्स व्यवसायात असून कंपनी एफएमसीजी आणि औद्योगिक उत्पादनांच्या श्रेणीतील खाद्यापासून ते नॉन-फूडपर्यंतच्या विस्तृत श्रेणीसाठी पॅकेजिंग करते. कंपनीचे सहा उत्पादन प्रकल्प असून त्यापैकी तीन भारतात तर उर्वरित थायलंड, दक्षिण आफ्रिका आणि हंगेरीमध्ये आहेत. तसेच एसआरएफ टेक्सटाइल विभागांतर्गत टायर कॉर्ड फॅब्रिक्स, बेल्टिंग फॅब्रिक्स आणि पॉलिस्टर इंडस्ट्रियल यार्नचे उत्पादन करते. मध्य प्रदेश आणि तमिळनाडू येथे कंपनीचे चार उत्पादन प्रकल्प आहेत. हे कापड आणि सूत हेवी ड्युटी टायर्स, रेडियल टायर, बेल्ट, फिशनेट, दोरी, औद्योगिक शिवणयंत्रे, सेफ्टी बेल्ट, कॉर्डेज इत्यादींमध्ये वापरतात. कंपनी आपल्या उत्तराखंड तसेच मध्य प्रदेश येथील प्रकल्पातून कोटेड आणि लॅमिनेटेड फॅब्रिक्सचे उत्पादनदेखील करते.

चार देशांमध्ये प्रकल्प असलेली आणि जगभरातील ८६हून अधिक देशांमध्ये उपस्थिती असलेली एसआरएफ एक जागतिक भारतीय कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीचा भारतातील महसूल ४० टक्के होता, त्यानंतर अमेरिका (१५ टक्के), स्वित्झर्लंड (६ टक्के), बेल्जियम (६ टक्के), दक्षिण आफ्रिका (४ टक्के), थायलंड (४ टक्के), जर्मनी (३ टक्के), आणि उर्वरित जगाचा २४ टक्के महसूल आहे.

सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या या कंपनीने मोठ्या भांडवली खर्चाच्या योजना आखल्या आहेत. यात प्रामुख्याने पुढील योजनांचा समावेश होतो:

 आगामी पाच वर्षांत कंपनी १५,००० कोटींचा भांडवली खर्च करणार असून त्यातील सुमारे १२,००० कोटी रुपये रासायनिक व्यवसायात गुंतवले जातील आणि उर्वरित पॅकेजिंग फिल्म्स व्यवसायात वापरले जातील.

 कंपनीचा दहेजमधील वार्षिक १ लाख मेट्रिक टन्स क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाला असून आणि नवीन एचएफसी प्रकल्पावर काम सुरू आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने फ्लोरोपॉलिमरसाठी विस्तार प्रकल्प मंजूर केला आहे.

 क्लोरोमेथेन, कॅल्शियम क्लोराईड आणि कॅप्टिव्ह वीजनिर्मिती सुरू झाली आहे.

 पुढील तीन वर्षांत फॅब्रिक क्षमता मासिक १,१०० मेट्रिक टनावरून १,८०० मेट्रिक टनांपर्यंत वाढेल.

कंपनीची जून २०२३ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीची कामगिरी खास नाही. लवकरच कंपनीचे सप्टेंबर २०२३ पर्यंतचे सहामाहीचे निकाल जाहीर होतील. हे निकाल तपासून एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून एसआरएफचा जरूर विचार करा.

सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजार भावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

stocksandwealth@gmail.com

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.