मागील लेखामध्ये आपण एल-निनो हा हवामान परिणाम, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाय योजताना शेतकऱ्यांवर होऊ शकणाऱ्या विपरीत परिणामांबाबत चर्चा केली होती. मात्र त्यानंतरच्या पंधरवड्यात कमॉडिटी बाजारात अनेक गोष्टी घडल्या. विशेषकरून कृषीमाल बाजारपेठेमध्ये जोरदार घडामोडी घडत आहेत. किमती मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे कांदा उत्पादकांच्या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. तसेच सोयाबीन आणि कापूस यांचे भाव वाढतील या अपेक्षेने साठे करून ठेवलेले शेतकरी चार महिने झाले तरी भाव वाढणे सोडाच; परंतु उलट ते कमी होत असल्यामुळे हवालदिल, नाऊमेद होताना दिसत आहेत.
एवढे कमी म्हणून की काय, पण देशातील अनेक राज्यांत अवेळी पडत असलेला पाऊस आणि गारपीट यामुळे रब्बी हंगामातील उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान होताना पाहणे उत्पादकांच्या नशिबी येत आहे. मार्च महिना हा साधारणपणे शाळा आणि कॉलेज यांचा परीक्षेचा महिना म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र वरील प्रतिकूल परिस्थिती पाहिली की, असे लक्षात येईल की विद्यार्थ्यांपेक्षासुद्धा शेतकऱ्यांना मार्च महिना अधिक कठीण परीक्षेचा ठरेल, असे दिसत आहे. कारण आता तर केवळ अर्धाच महिना संपला आहे. उरलेल्या अर्ध्या महिन्यातदेखील अनेक महत्त्वाच्या घटना कमॉडिटी बाजार आणि त्यातही कृषिमालासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
हेही वाचा – वित्तरंजन : नैनालाल किडवाई
काय आहेत या गोष्टी, ज्यावर कृषिमाल उत्पादकांना बारीक नजर ठेवावी लागणार आहे. याबद्दल आपण आज विचार करणार आहोत. यापैकी एक महत्त्वाची गोष्ट मागील आठवड्यात होऊन गेली आहे. अमेरिकी कृषी खात्याने मार्च महिन्यासाठी जागतिक कृषिमाल मागणी-पुरवठा अनुमान प्रसिद्ध केले आहे. यामध्ये लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, सोयाबीनसाठी उर्वरित पणन वर्षासाठी पुरवठा अनुमान मोठ्या प्रमाणावर घटवले आहे. अर्जेंटिना येथे पडलेला दुष्काळ यामुळे तेथील सोयाबीन पिकाचे अनुमान मागील महिन्याच्या तुलनेत २० टक्क्यांनी घटवले आहे. नवीन अनुमानानुसार, अर्जेंटिनाचे यावर्षीचे सोयाबीन उत्पादन आता ३३० लाख टन असेल. डिसेंबर महिन्यातील अनुमानाचा विचार करता तब्बल ३३ टक्के कमी आहे. अर्जेंटिना हा ब्राजील आणि अमेरिका यांच्यापाठोपाठ जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश आहे. सोयाबीन प्रमाणेच मक्याचे उत्पादन अनुमानदेखील ४०० लाख टनांपर्यंत म्हणजेच मागील महिन्यापेक्षा १५ टक्के कमी केले आहे. डिसेंबरच्या तुलनेत ते २७ टक्के कमी आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये या देशांमधील उत्पादनाचे आकडेच किंमत निश्चिती करीत असल्यामुळे त्याचा थोड्या उशिराने का होईना परंतु येथील बाजारपेठेमध्ये देखील प्रभाव जाणवतो.
दुसरी लक्ष देण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून संभाव्य व्याजदर वाढीचा निर्णय. येत्या २२ मार्चला हा निर्णय घेतला जाईल तेव्हा भारतात मध्यरात्र असेल. अमेरिकेतील महागाई कमी होण्याची शक्यता दुरावल्यामुळे मध्यवर्ती बँकेची व्याजदर वाढ अपेक्षेपेक्षा जास्त आणि दीर्घकाळासाठी राहील, असे म्हटले जात असून त्यामुळे डॉलर अधिक मजबूत होऊन जागतिक बाजारात सर्वच बाजार बेजार होतील असे म्हटले जात आहे. त्यातल्या त्यात समाधान म्हणजे, रुपया कमजोर झाल्यामुळे येथील कृषिमाल वस्तू थोड्या महाग होऊन उत्पादकांना त्याचा आधार मिळतो.
हेही वाचा – बाजार-रंग : खर्चाचे गणित
कृषिमाल बाजारपेठेसाठी या सर्वांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अमेरिकी कृषी खात्याचाच महिनाअखेरीस प्रसिद्ध होणाऱ्या २०२३-२४ या नवीन पणन हंगामासाठी अमेरिकेतील सोयाबीन, मका, कापूस इत्यादी पिकांच्या पेरणीच्या क्षेत्राबाबतचे अनुमान. याच अनुमानावर अल-निनोचा ठसा असणार हे नक्की आहे. त्यामुळे कृषिमाल बाजारपेठेसाठी दिशा दर्शवण्यासाठी या अहवालाची सर्वात जास्त प्रतीक्षा राहील. हे झाले जागतिक घटक. मात्र देशांतर्गत घटकांकडे पाहणेही तेवढेच आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने रिझर्व्ह बँकेचे व्याजदर धोरण. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या निर्णयाकडेदेखील लक्ष ठेवणे जरुरीचे आहे. कारण अमेरिकेने व्याजदर अर्ध्या टक्क्यांनी वाढवल्यास आपल्याकडेदेखील मोठी दरवाढ अटळ आहे. याचा कमॉडिटी बाजारावर थेट परिणाम दिसला नाही, तरी शेअर बाजार घसरला तर त्याची छाया इतर बाजारांवर पडतेच. तसेच या धोरणामुळे अर्थव्यवस्थेतील रोखसुलभतेवर विपरीत परिणाम झाल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या नियमानुसार किमती कमी होणे साहजिकच आहे. याशिवाय मार्च महिन्यातील शेवटचा आठवडा आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस या आठ-दहा दिवसांत हवामानविषयक अंदाजांचे पेव फुटल्यास आश्चर्य वाटू नये. एल-निनोने सर्वांना भरपूर खाद्य दिले असल्यामुळे त्याबाबतचे अहवाल आणि त्यामुळे बाजारांमधील चढउतार अधिक तीव्र होणे शक्य आहे. याशिवाय अवेळी पाऊस अजूनही संपला नसल्याने वेगवेगळ्या राज्यांमध्ये या आठवड्यात पाऊस, गारपिटीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेदेखील शेतकरी चिंतेत आहे. अलीकडे झालेल्या अवेळी पावसामुळे महाराष्ट्रामध्ये हरभरा, ज्वारी, गहू आणि मका या पिकांचे कमी-अधिक नुकसान झाल्याचे वृत्त आहे. सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांना याची झळ बसली आहे. पुढील काळात मध्य आणि उत्तर भारतातील गहू, मोहरी, हरभरा या पिकांना मोठा धोका आहे. त्यामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे ते मार्च महिनाअखेरपर्यंत तसेच राहील.
वर पाहिलेले अनेक घटक परस्परविरोधी असल्यामुळे त्याचा किमतीवर काय परिणाम होईल हे सांगणे कठीण आहे. खरे तर अमेरिकी कृषी खात्याच्या अहवालानंतर सोयाबीनमध्ये मोठी तेजी येणे अपेक्षित होते. मात्र सुरुवातीच्या मजबुतीनंतर अमेरिकेत भाव कमी झाले आहेत. अमेरिकेतील आणि काही अंशी भारतातील गहू व मका किमतीतील जोरदार घसरणीमुळे बाजारातील भाव खराब होऊन त्याचा फटका सोयाबीन आणि कापसाला बसला असावा. काही दिवसांत कापसाचा भाव ४०० रुपये कमी होऊन प्रतीक्विंटल ८,००० रुपयांच्या आसपास आला आहे. तर सोयाबीन ५,३००-५,४०० रुपयांच्या कक्षेत फिरत आहे. हरभरा ४,७००-४,८०० रुपये म्हणजे हमीभावापेक्षा १०-१२ टक्के मंदीत आहे. नाही म्हणायला तूर फक्त तेजीत आहे. परंतु सरकारी हस्तक्षेपाची टांगती तलवार असल्यामुळे किंमत ८,२००-८,४०० रुपयांच्या पलीकडे जायला तयार नाही. अर्थात सध्याच्या परिस्थितीत हा भावदेखील चांगलाच आहे. मका अजूनही २,२०० रुपयांवरच असला तरी अमेरिकेतील कल पाहता १००-१५० रुपये स्वस्त होऊ शकेल.
एकंदरीत पाहता बाजाराची दिशा स्पष्ट होईपर्यंत नवीन वित्तीय वर्ष म्हणजे एप्रिल उजाडेल.
हेही वाचा – ‘पोर्टफोलियो’साठी शेअर्स निवडताना…
(लेखक वस्तू बाजार विश्लेषक / ksrikant10@gmail.com)
अस्वीकरण : कमॉडिटी बाजार हा मुख्यत: जोखीम व्यवस्थापनासाठी असून वरील लेख या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातील गणित विशद करून सांगण्यासाठी आहे, लेखाला गुंतवणुकीचा सल्ला मानण्यात येऊ नये.