-तृप्ती राणे

आजचा विषय निवडला तेव्हा आमच्या घरातील मंडळींकडून वेगवेगळे प्रतिसाद मिळाले. अर्थात ते अपेक्षित होतं, कारण आम्ही तीन पिढ्या एकत्र राहतो. त्यात एकाच पिढीअंतर्गत वयाचा फरक सुद्धा जास्त असल्याने कोणत्याही बाबतीत सहा प्रतिक्रिया असतात! तर सर्वात लहान पिढीचा आर्थिक नियोजनाबरोबर संबंधच नाही. फक्त कुठे जायचं एवढंच सांगायचं. मधली पिढी मग कसं जायचं, काय करायचं, कसं जमवायचं याची जमवाजमव करते. सगळ्यांच्या परीक्षा/सुट्ट्या, आरक्षण, बँक बॅलन्स इत्यादी बघून मग ठरवते. तर सर्वात वरिष्ठ पिढी किती लांब जायचंय, किती पायपीट करावी लागणार, हवामान कसं आहे, धार्मिक स्थळं कोणती आहेत, भटकंती दरम्यान सण-वार आहेत का आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खर्च किती होणार यावर ठरवते जायचं की नाही. त्यात देशात फिरायचं की देशाबाहेर जायचं, थंड हवेची ठिकाणं की समुद्रकिनारा की जंगल सफारी आणि चित्तथरारक साहसी खेळ (ऍडव्हेंचर स्पोर्ट्स) असे कितीतरी पर्याय समोर असतात. पण एकाच वेळी सगळ्या सदस्यांना प्रत्येकाच्या मनाप्रमाणे फिरायला आणि मौजमजा करायला मिळेल असं फार क्वचितच घडतं. तेव्हा आमच्या घरी भटकंतीसाठी आर्थिक नियोजन तर करावंच लागतं. मात्र त्याचबरोबर भावनिक नियोजन सुद्धा सांभाळावं लागतं बरं!

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
loksatta anvyarth Five students were brutally beaten up while offering namaz in the hostel of Gujarat University
अन्वयार्थ: परदेशी विद्यार्थ्यांना मारहाण, म्हणून?

मुळात आज हा विषय निवडण्याचं कारण आपल्या देशात वाढणारी भटकंती आहे. करोनापश्चात जर आपण पाहिलं तर वर्षभर लोकांची भटकंती सुरू असते. आधी जिथे ४-५ वर्षांत एकदा किंवा दोनदा साधारण कुटुंबं फिरायला जायची, तिथे आज प्रत्येक महिन्यात आणि काही ठिकाणी तर दर आठवड्याला फिरायला जाणं हे जणू जगण्याचा भाग बनलं आहे. युरोप आणि अमेरिका बघण्यासाठी निवृत्तीची वाट पाहणारी पिढी, आता तिशी-चाळिशीच्या तरुण जोडप्यांना मागे टाकत आहेत. मुळात सध्याच्या काळात मित्र-मैत्रिणी घेऊन किंवा सोलो भटकंती करणं हे सामान्य झालेलं आहे. हातात खुळखुळणारा पैसा, समाजमाध्यमातून होणारा जाहिरातींचा आणि इतरांच्या अनुभवांचा भडिमार, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि क्रेडिट कार्ड या सर्वांमुळे आज निरनिराळ्या ठिकाणी फिरायला जाणं खूप सहज होऊन गेलंय. वर्षाच्या कुठल्याही वेळेला बघा – हॉटेल, रेल्वे, विमानं प्रवाशांनी भरभरून वाहत असतात. अर्थात या सर्वातून आनंद मिळवणं हे जरी ध्येय असलं तरीसुद्धा त्यामुळे आर्थिक परिस्थितीला इजा होत नाही हे पाहणं आवश्यक आहे.

हेही वाचा…Money Mantra : क कमॉडिटीचा : कडधान्य व्यापाऱ्यांची ‘ऐशीतैशी’; आत्मनिर्भरतेचा चंग

एका छोट्या उदाहरणातून आपण हे समजून घेऊ या.

काही दिवसांपूर्वी एका कुटुंबाच्या निवृत्ती निधीसाठी मी त्यांची पुढच्या १५ वर्षांची मिळकत, खर्च आणि गुंतवणुकीची जमवाजमव याचा आढावा घेत होते. एकंदर सगळं पाहिल्यावर लक्षात आलं की, आज आहे तसं चालू राहिलं तर त्यांच्याकडील पैसे हे त्यांना वयाच्या सत्तरीपर्यंतच पुरतील. त्या जोडप्याच्या खर्चाची यादी तपासली तर असं लक्षात आलं की, त्यांना भरपूर फिरण्याची हौस असल्यामुळे त्यांचे खर्च कमी करणं शक्य नव्हतं. एक गोष्ट मात्र करता येण्याजोगी वाटली – त्यांचं ॲसेट ॲलोकेशन जर बदललं तर त्यांचा निवृत्तीनिधी वाढू शकतो. सध्या त्यांच्याकडे कर्मचारी निर्वाह निधी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, विमा पॉलिसी, जमीन-जुमला आणि मुदत ठेवींचं प्रमाण ७० ते ८० टक्के होतं. दरवर्षी कुटुंबाची वार्षिक मिळकत जरी चांगली असली, तरी खर्चसुद्धा भरपूर असल्याने गुंतवणुकीचं प्रमाण कमी होतं. त्यात शेअर बाजारातील गुंतवणुकीचं प्रमाण अजून कमी. म्हणून अनेक वर्षं सातत्याने गुंतवणूक करून सुद्धा येणाऱ्या काळातील महागाईच्या अंदाजानुसार पुरेशी रक्कम तयार होत नव्हती. आज त्यांच्या हातात वेळ असल्याने जर त्यांचं ॲसेट ॲलोकेशन बदललं तर त्यांच्या समस्येचं समाधान करता येण्याजोगं आहे.

वरील ठिकाणी मिळकत चांगली असल्यामुळे आणि मुळात गुंतवणुकीसाठी दीर्घकाळ असल्याने राहणीमान तेच ठेवून भटकंती करणं शक्य होतं. परंतु प्रत्येकाच्या बाबतीत असं असेल असं नसतं. शिवाय जिथे मोठ्या आर्थिक जबाबदाऱ्या असतील तिथे तर दीर्घकाळच्या मिळकत आणि खर्चाचा आराखडा बांधून मग पहावं की कितपत भटकंतीचे खर्च परवडण्याजोगे आहेत. अनेकदा असं लक्षात येतं की, कोणतीही कौटुंबिक जबाबदारी नसणाऱ्या कमावत्या व्यक्तींना भटकंतीचे खर्च सहज पेलतात. परंतु या खर्चांमुळे जर भविष्यातील खर्चांची गैरसोय होणार असेल तर ते नुकसान आजच्या आनंदापेक्षा कितीतरी मोठं असेल. आजची पिढी “YOLO-You Live Only Once” अशा मानिसिकतेमध्ये जगतेय. म्हणून इतरांचा आनंद बघून आणि उद्याची पर्वा न करता खर्च करणारे अनेक जण आपण आपल्या आसपास पाहतोय. याच्या अगदी विरुद्ध आहे या आधीची पिढी जी स्वतःच्या इच्छा आकांक्षांना बाजूला ठेवून पुढच्या पिढीसाठी संपत्ती वाचवतेय. तसं बघायला गेलं तर आनंद सर्वांना हवा आहे. परंतु तो उद्याच्या गरजेतून पुरवायचा की पुढच्यांना मिळावा म्हणून आज त्यावर पाणी सोडायचं याचा सुवर्णमध्य साधता येतो आर्थिक नियोजनातून.

हेही वाचा…Money Mantra : दिवस तुझे हे फुलायचे…

इथे दोन प्रकारे आपण काम करू शकतो. वार्षिक मिळकतीतून नियमित गुंतवणूक करून, त्यातून भटकंतीचे खर्च काढायचे. जेणेकरून मिळकत चांगल्या पद्धतीने वाढवता येईल आणि आज जरी खर्च नाही करता आला, तरी काही वर्षांनी जमा झालेल्या गुंतवणुकीतून तो होईल. म्हणून दरवर्षीच्या आर्थिक नियोजनातून एक ठरावीक रक्कम ही भटकंती फंड म्हणून जमा करायची आणि तिथे जितकी रक्कम असेल तेवढाच खर्च करायचा, असं झाल्यास इतर आर्थिक ध्येयांसाठी पैसे जमा होत राहतील. दुसरं, थोडं कठीण आहे पण करून बघण्याजोगं आहे. आजकाल राहणीमानाच्या खर्चांमध्ये खूप वाढ झाल्याचं लक्षात येतं. मॉल, ऑनलाइन खरेदी, खादाडी, ओला-उबरचे प्रवास, या सर्व प्रकारांमुळे खूप खर्च होतो. एकीकडे घरी आचारी असतो पण दुसरीकडे बाहेर सारखी खादाडी. पैसे दोन्हीकडे खर्च होतात. मग अशा वेळी एक खर्च टाळून जर भटकंतीची सोय करता आली तरीसुद्धा चालेल. एखादा असा व्यवसाय किंवा छंद जोपासावा जो वरकमाई देऊ शकेल आणि त्यातून भटकंती करणं शक्य होईल. थोडी कल्पनाशक्ती वापरून खर्च कमी केले किंवा मिळकत वाढवली तर निभावणं शक्य होईल.

वरिष्ठ निवृत्त गुंतवणूकदारांना तर मी नेहमीच सांगते की, त्यांनी स्वतःच्या इच्छा पहिल्या पुऱ्या कराव्यात. भटकंतीसाठी तब्येत चांगली लागते. तेव्हा जोवर व्यवस्थित फिरता येतंय तोवर बाकीचं निवृत्ती नियोजन करून भटकंती करून घ्यावी. पुढे वयोमानानुसार आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या की, हे सगळं करणं एकतर कठीण होतं किंवा करताच येत नाही. तुमच्या कमाईतून तुमचा आनंद मिळवा आणि मग काही उरलं तर ते पुढच्यांना मिळेलच.

हेही वाचा…Money Mantra : माझा पोर्टफोलियो :  पोर्टफोलियोची शान.. एशियन पेंट्स लिमिटेड

भटकंतीचे खर्च नेहमीच्या महागाईच्या तुलनेत जास्त दराने वाढतात. शिवाय परदेश प्रवास असेल तर तिथे प्रकिया चलनवाढीचीसुद्धा जोखीम असते. तेव्हा दीर्घकाळच्या खर्चाची सोय करताना जास्त सुरक्षा मार्जिन ठेवावं. शक्यतो शेवटच्या क्षणाची मोहीम ना ठरवता वेळ घेऊन नीट नियोजन करावं. जेणेकरून तिकिटाचे पैसे वाचतात. आधीच बुकिंग केल्यास कधी कधी हॉटेलंसुद्धा स्वस्त मिळतात. टूर कंपनीकडून कोणती कामं करून घ्यायची आणि कोणती आपण स्वतः करायची हेसुद्धा नीट ठरवावं.

सरतेशेवटी एवढंच म्हणेन की, आर्थिक आराखड्यामधे योग्य पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीतून आणि ॲसेट ॲलोकेशनने भटकंतीचे खर्च करून सुद्धा चांगल्या प्रकारे निवृत्तीनिधी बनवता आणि नंतर सांभाळता येऊ शकतो. फक्त गरज आहे ती शिस्त, चिकाटी आणि दूरदृष्टीची!

trupti_vrane@yahoo.com

प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.