scorecardresearch

Premium

‘कितीदा नव्याने तुला आठवावे!’

निफ्टीने २१,०००च्या उच्चांकाचा आनंदही साजरा केला. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळूया.

Nifty reached a high
‘कितीदा नव्याने तुला आठवावे!’ (image – financial express/file photo)

निसर्गनियमाप्रमाणे सूर्योदयानंतर सूर्यास्त, भरतीनंतर ओहोटी येते, तद्वत तेजीनंतर मंदी स्वाभाविकच. निफ्टी निर्देशांक २०,२००चा नवीन उच्चांक मारून १८,८०० पर्यंत खाली घसरतो, तेव्हा २०,२००च्या आनंदी, प्रसन्न वातावरणातील दिवसांना… ‘कितीदा नव्याने तुला आठवावे.’ अशा तेजीच्या आठवणी मंदीत काढून झुरत बसायचे. जेव्हा मंदीचे दिवस सरून पुन्हा तेजीच्या दिवसांत, निफ्टी निर्देशांक २०,२००चा उच्चांक पार करत २१,०००च्या नवीन उच्चांकाच्या भारलेल्या दिवसांतील सुखद आठवणींच्या उजळणीतच, मंदीच्या दिवसांतील कटू भावनांच्या आठवणींचा बांध फुटून डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे. हे आनंदाश्रू टिपून अत्तरासारखे निफ्टीने गुंतवणूकदारांवर शिंपडून पुन्हा सारा आसमंत सुगंधाने दरवळून टाकला आहे. इतकेच नाही निफ्टीने २१,०००च्या उच्चांकाचा आनंदही साजरा केला. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स : ६९,८२५.६० / निफ्टी : २०,९६९.४०

PM Narendra Modi
”नव्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलासाठी ८०० कोटी मंजूर”, मोदी म्हणाले, ”नवीन संसद भवनाप्रमाणे…”
man killed his friend who come to save during suicide and injured his brother
दोन भावांसाठी मित्र ठरला कर्दणकाळ; एकाचा गेला जीव, दुसरा गंभीर जखमी
bombay hc quashes fir against college student for rash driving that killed stray dog
वाहनाखाली चिरडून भटक्या श्वानाचा मृत्यू; आरोपी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम नको, न्यायालयाकडून गुन्हा रद्द
Loksatta explained Vultures on the verge of extinction What conservation efforts
विश्लेषण: गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर? संवर्धनासाठी कोणते प्रयत्न? गिधाडांची उपयुक्तता काय?

या स्तंभातील १४ ऑगस्ट आणि ९ ऑक्टोबरच्या लेखात, निफ्टी निर्देशांकाचे २०,८००च्या वरच्या लक्षाचे सूतोवाच केलेले, जे सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी २१,००० चा उच्चांक मारत निफ्टीने साध्य केले. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर ३०० ते ५०० अंशांची हलकी-फुलकी घसरण गृहीत धरून निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २१,३०० ते २१,७०० असेल. या स्तरावरून हजार ते दोन हजार अंशांची घसरण संभवते.

हेही वाचा – किर्लोस्कर समूहातील बँकेतर वित्तीय कंपनीचे गुंतवणूकदारांना साकडे; अपरिवर्तनीय रोख्यांच्या विक्रीतून ३०० कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य

शिंपल्यातील मोती

आरती इंडस्ट्रीज लिमिटेड

(शुक्रवार, ८ डिसेंबर, भाव – ५६९.३५ रुपये)

आंतरराष्ट्रीय स्तरावर विशिष्ट प्रकारच्या रसायनांचे उत्पादन करून ते औषध कंपन्या, कृषी-रासायनिक, रंगद्रव्य, पॉलिमर कंपन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची रसायन पुरवणारी ‘आरती इंडस्ट्रीज लिमिटेड’ हा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’असणार आहे. जसे गेल्या वेळेला आपण रसायन उद्योगातील ‘नोसिल’ या कंपनीचा आढावा घेतला तीच परिस्थिती आरती इंडस्ट्रीजबाबतीत आहे. रसायन उद्योगाला गेल्या दोन वर्षांपासून मंदीचा सामना करावा लागत आहे. आर्थिक आघाडीवर, दोन आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील तुलनात्मक आढावा घेतल्यास विक्री १,६८५.९१ कोटींवरून, १,४५० कोटी, करपूर्व नफा १५१.५९ कोटींवरून, ८२ कोटी तर, निव्वळ नफा १२५.५९ कोटींवरून ९१ कोटींवर घसरला आहे. ही आकडेवारी मंदीची साक्ष देत आहे. समाधानाची बाब म्हणजे हे क्षेत्र मंदीने जरी ग्रासले असले तरी ‘आरती इंडस्ट्रीज लिमिटेड’ ही कंपनी नफ्यात आहे.

‘आरती इंडस्ट्रीज लिमिटेड’ या समभागाचे आलेख वाचन करता समभागाने आपल्याभोवती ५१०… ५४०… ५७०… ६०० असा ३० रुपयांचा परीघ (बँण्ड) निर्माण केलेला आहे. आता चालू असलेल्या तेजीत हा समभाग ५१० रुपयांवरून ५८६ रुपयांपर्यंत अल्पावधीत वाढल्याने, भविष्यातील घसरणीत हा समभाग ५४० ते ५१० रुपयांदरम्यान प्रत्येक घसरणीत २० टक्क्यांच्या पाच तुकड्यात हा समभाग खरेदी करावा. आरती इंडस्ट्रीज लिमिटेडचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य हे अनुक्रमे ६०० ते ६३० रुपये, तर दीर्घमुदतीचे प्रथम वरचे लक्ष्य ९०० रुपये तर द्वितीय लक्ष्य १,१०० रुपये असेल. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला ४४० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

महत्त्वाची सूचना : वरील समभागात लेखकाची स्वतःची, अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचा तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेले आहे.

चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ संकल्पनेची

‘शिंपल्यातील मोती’ या सदराचा मुख्य उद्देश हा दीर्घमुदतीत समभाग गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करणे हा आहे. ज्यायोगे गुंतवणूकदार आपल्या भविष्यकालीन आर्थिक गरजांची तरतूद करू शकतील. यात निवृत्तीनंतरची आर्थिक तरतूद, मुलांच्या उच्च शिक्षणाची, गृह कर्जफेडीची तरतूद अथवा स्वेच्छानिवृत्तीचे नियोजन (व्हीआरएस) हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सदराची मांडणी केलेली आहे. आता दीर्घमुदतीचा कालावधी हा किमान तीन ते पाच वर्षे गृहीत धरावा लागतो यातील ‘ग्यानबाची मेख’ म्हणजे समभागाच्या बाजारभावाची वाटचाल ही तिमाही वित्तीय निकालावर अवलंबून असते. तिमाही निकाल उत्कृष्ट असेल तर समभाग आपली तेजीच्या दिशेने वाटचाल कायम राखणार अन्यथा त्या समभागाच्या बाजारभावाची दशा ठरलेली. गेले वर्षभरात ‘शिंपल्यातील मोती’ सदरात जे समभाग सुचवले आहेत त्यांची आताची स्थिती कशी आहे? (गेल्या १२ महिन्यांत पुलावरून खूप पाणी वाहून गेले असल्याने) आर्थिक क्षेत्रात गुंतवणूकदारांना सजग, अद्ययावत ठेवून संपत्ती निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश सफल करणे हा त्या मागचा मुख्य उद्देश ‘घार उडते आकाशी तिचे लक्ष्य पिलांपाशी’ ही उक्ती निकालपूर्व विश्लेषणातून साधायचा प्रयत्न केला आहे. याचा दुहेरी फायदा दीर्घमुदतीचे गुंतवणूकदार आपले समभाग भविष्यात निश्चिंतपणे राखून ठेवतील, तर या महागाईच्या दिवसात अल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी पर्यायी उत्पनाच्या तरतुदीचा तो प्रयत्न असेल.

या पार्श्वभूमीवर एक वर्षापूर्वी ७ नोव्हेंबरला ‘शिंपल्यातील मोती’ सदर सुरू झाले. ‘आनंदराठी वेल्थ लिमिटेड’हा समभाग या सदरातील प्रथम फलंदाज होता. ७ नोव्हेंबरला समभागाचा बाजारभाव ७१२ रुपये होता. या स्तंभातील ९ ऑक्टोबर २०२३ च्या लेखात याच कंपनीचे निकालपूर्व विश्लेषण करण्याची संधी मिळाली. तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख ही १२ ऑक्टोबर होती. ६ ऑक्टोबरचा बंद भाव १,८१९ रुपये होता आणि निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर १,६५० रुपये होता. जर निकाल उत्कृष्ट असेल तर १,६५० रुपयांचा स्तर राखत २,२५० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. १२ ऑक्टोबरला जाहीर झालेला वित्तीय निकाल उत्कृष्ट असल्याने लेखात नमूद केलेले २,२५० रुपयांचे वरचे लक्ष्य २० नोव्हेंबरला २,३८७ रुपयांचा उच्चांक मारत साध्य झाले. अल्पमुदतीच्या गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत २३ टक्क्यांचा परतावा त्याने मिळवून दिला. सरलेल्या सप्ताहातील शुक्रवार, ८ डिसेंबरचा बंद भाव २,४९६ रुपये आहे. दीर्घमुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी वर्षभरापूर्वी अवघ्या ७१२ रुपयांना हा समभाग सुचवला होता. रशिया-युक्रेन, इस्रायल हमास युद्ध, अमेरिकेत सरकारी कर्जरोख्यांचा (बाॅण्डचा) चढा व्याजदर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरकपात या निराशाजनक स्थितीत मुद्दल तरी सुरक्षित राहील का? हे प्रश्न प्रत्येक मंदीत कितीदा नव्याने आठवावे (विचारावेत) या स्वरूपाचे आहेत. वर्षभरानंतर निफ्टी निर्देशांक २१,००० च्या नव्या उच्चांकावर तर आनंदराठी वेल्थ लिमिटेड ७१२ रुपयांवरून २,७०० रुपयांवर झेपावला. म्हणजेच जीवनाच्या कसोटीच्या प्रसंगातून ‘तावूनसुलाखून बाहेर पडल्यावर’, कसोटीच्या दिवसांतील कटू भावनांच्या आठवणींचा बांध फुटून या उच्चांकावर डोळ्यातील आनंदाश्रूप्रमाणे वाहण्यासारखेच आहे.

हेही वाचा – शेअर बाजारातील उत्साहानं बँक निफ्टी निर्देशांकाने गाठला उच्चांक, नवा इतिहास रचला

पुढील लेखात शिंपल्यातील मोती सदरातील ‘पीसीबीएल, झेन्सार टेक्नॉलॉजी, परसिस्टंट सिस्टिम’ या समभागांचा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’संकल्पनेतून आढावा घेऊया (क्रमशः)


लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nifty reached a high of 21000 thousand stocks for long term investment print eco news ssb

First published on: 10-12-2023 at 09:37 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×