लहानपणी एक कविता अभ्यासक्रमात होती; “पिस्टन, व्हॉल्व्हस, व्हिल्स अँड गिअर्स दॅट्स द लाईफ ऑफ इंजिनीयर्स” असे एकही क्षेत्र नाही की, ज्यामध्ये यंत्रांचा सहभाग नाही. सकाळच्या पहिल्या गजरापासून रात्री सुखाचा थंडगार वाऱ्याचा झोत देणाऱ्या वातानुकूलित यंत्रापर्यंत सगळे तयार करण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या कंपन्या हाच आजच्या लेखाचा विषय. या आठवड्याचा क्षेत्र अभ्यास अभियांत्रिकी -भांडवली वस्तूंवर.

अर्थव्यवस्था वाढीस लागते म्हणजे काय? तर या क्षेत्रातील प्रत्येक कारखाना आणि प्रत्येक व्यवसाय जोमदारपणे कार्यरत असतो. गृह बांधणी, संरक्षण, वाहतूक, बँकिंग, संदेशवहन या सर्व क्षेत्राला अप्रत्यक्षरीत्या जोडून ठेवण्याचे काम भांडवली उद्योग म्हणजेच अभियांत्रिकी कंपन्या करतात. पाच उदाहरणांच्या सहाय्याने आपण या क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व समजून घेऊया.

हेही वाचा : Money Mantra : व्हर्च्युअल कार्ड काय असतं? ते कसं काम करतं?

  • मेट्रो रेल्वे, मोनो, बुलेट ट्रेन कोणतेही साधन असो आपला प्रवासाचा वेळ कमी होतो पण ही वाहतुकीची साधने कशी जन्माला येतात? एखाद्या कारखान्यात यंत्राचा वापर करून तयार झालेल्या पोलादापासून रेल्वेचे रूळ बनतात. याच पोलादाला ताणून आणि ओढून विजेच्या तारा बनतात, ॲल्युमिनियमपासून पत्रे बनतात. अशाच एखाद्या कारखान्यात फायबर, पंखे बनवण्यासाठी लागणारी छोटी छोटी यंत्र बनतात.
  • रेल्वे प्रत्यक्षात धावण्यासाठी लागते ती वीज, या वीजनिर्मिती केंद्रात जर जनित्र, रोहित्र, बॉयलर नसेल तर वीज निर्माण होऊ शकणार नाही. वातानुकूलित रेल्वेने जात असाल तर ते यंत्रही कॉम्प्रेसर तयार केला नाही तर कसे चालेल !
  • नवी कोरी गाडी विकत घेतल्यावर त्याबरोबर कुटुंबीयांचा फोटो काढण्याआधी हे अवश्य लक्षात ठेवा की गाडीचे इंजिन बनवण्यासाठी, चाके, टायर बनवण्यासाठी कोणत्यातरी कारखान्यात आधी यंत्र तयार झालेली असतात.
  • डिजिटल युगात एखाद्या स्टुडिओमध्ये गाणे तयार होताना जी सॉफ्टवेअर वापरली जातात ती चालण्यासाठी जे हार्डवेअर लागते त्याच्या निर्मितीतील सिंहाचा वाटा एखाद्या तळहातावर मावेल इतक्या छोट्याशा चीप सर्किटचा असतो.
  • चॉकलेट, आईस्क्रीम, पाकीट बंद खाद्यपदार्थ विकत घेताना त्याचे पॅकिंग ज्या अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने केले जाते ते विसरून चालणार नाही.
    अशक्यप्राय वाटणाऱ्या शस्त्रक्रिया सुलभ झाल्या आहेत त्या अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानामुळेच. डॉक्टरांचे कौशल्य निर्विवादच आहेच, पण तो रोबोटिक हात तयार करणारा कारखाना आपल्याला विसरून चालणार नाही.

आता तुमच्या लक्षात आले असेल की, अभियांत्रिकी क्षेत्राचे व्यवस्थेतील महत्त्व किती आहे ते.

हेही वाचा : Money Mantra : आर्थिक वर्ष संपत आले; व्यवहार पूर्ण करताना ‘ही’ काळजी घ्या

हे क्षेत्र अन्य क्षेत्रापेक्षा वेगळे कसे?

अभियांत्रिकी आणि भांडवली वस्तूंच्या उद्योगात आणि इतर कुठल्याही उद्योगात सर्वात मोठा फरक असतो तो म्हणजे भरीव पैशाच्या गुंतवणुकीचा. वर उल्लेखलेले सगळे उद्योग पैशाचे समर्थ भांडवल पाठीशी असल्याशिवाय चालूच शकत नाहीत. एखादा महाकाय कारखाना एकदा सुरू झाल्यानंतर वस्तूंची लीलया निर्मिती करतो. पण तो प्रत्यक्षात डिझाइनमधून जमिनीवर उभा राहण्यासाठी अनेक वर्षे आणि हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते. हेच या क्षेत्राच्या प्रगतीतील रहस्य आहे आणि प्रमुख अडथळा आहे. भांडवली उद्योग स्थापित करताना जे नफ्या-तोट्याचे गणित आखले जाते ते सर्वस्वी अर्थव्यवस्थेच्या भरभराटीवर अवलंबून असते. जर तयार वस्तूंना मागणी नसेल तर त्या वस्तू तयार करणाऱ्या यंत्रांची मागणी कशी वाढेल?

गेल्या दशकभराच्या काळात भारतात हाच बदल आपण अनुभवतो आहोत. देशांतर्गत राष्ट्रीय उत्पादनाची अर्थात ‘जीडीपी’ची आकडेवारी करोना काळातील कठीण वर्षे वगळता उजवी राहिलेली आहे. अर्थव्यवस्थेला उभारी आली तर ज्या क्षेत्राचे भले होते त्यामध्ये या क्षेत्राचा उशिरा का होईना पण क्रमांक लागतो.

हेही वाचा : Money Mantra: ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीचे काम काय?

कोणत्या प्रकारचे उद्योग या क्षेत्रात येतात ?

आम्ही फक्त इंजिनच बनवत नाही तर अर्थव्यवस्थेचे इंजिन चालावे यासाठी प्रयत्न करतो असे एका जाहिरातीमध्ये म्हटले होते, हे शब्दशः सत्य आहे. अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्रात पुढील क्षेत्रांचा समावेश होतो. अवजड यंत्रसामग्री, बॉयलर, जनित्र, रोहित्र, ओतकाम करण्याची यंत्रसामग्री, धातूंना विविध आकार देण्याची यंत्रसामग्री, तारा बनवण्याची यंत्रसामग्री, वीजपुरवठा करण्याचे जाळे निर्माण करण्यातील यंत्रसामग्री, घरगुती वापराची उपकरणे तयार करण्यात करताना लागणारी विद्युत सामग्री.

या क्षेत्राला सुगीचे दिवस का?

भारतातील नागरीकरणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता नवा शहरी भारत निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मिती करावी लागणार आहे. स्मार्ट सिटी, पीएम गतिशक्ती योजना अशा महत्त्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून ज्या सुविधांची निर्मिती होऊ घातली आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तंत्र कौशल्याची गरज भासणार आहे व हेच या क्षेत्रातून दिले जाते. ‘मेक इन इंडिया’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत भारतात परदेशी कंपन्यांचा वावर वाढू लागला आहे, त्याचा थेट फायदा या क्षेत्रातील कंपन्यांना होतो.

हेही वाचा : Money Mantra: एनपीए म्हणजे काय? एनपीए झाल्यास कर्जदाराचे अधिकार कोणते?

‘ऑर्डर बुक’चे गणित

या क्षेत्रातील कंपन्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर कशा ठरतील याविषयी विचार करताना कंपन्यांकडे हातात किती वस्तू आणि सेवांची मागणी आहे? याचा विचार करावा लागतो. कारण या क्षेत्रातील कंपन्या कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या नसतात, त्यामुळे कंपन्यांचे ऑर्डर बुक किती दमदार आहे याचा अंदाज घ्यावा लागतो. उदाहरणच घ्यायचे झालं तर, ‘लार्सन अँड टुब्रो’ या कंपनीच्या गेल्या तिमाहीच्या निकालांमध्ये कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, एकंदरीत ऑर्डर बुक साडेचार लाख कोटी रुपये एवढे आहे व यातील ३९ टक्के ऑर्डर परदेशातून मिळाल्या आहेत. याचा सोपा अर्थ या सगळ्या ऑर्डर पूर्ण करून कंपनीला भविष्यात नफा होणार यात शंकाच नाही. व्यापार चक्रामध्ये (बिझनेस सायकल) अर्थव्यवस्था वाढीच्या स्थितीमध्ये असेल, तर बाजारात उत्साहाचे वातावरण असते. कंपन्या आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक गुंतवणूक करतात, म्हणजेच नवीन कारखाने उभारले जातात आणि याचा फायदा भांडवली वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांना होतो.

हेही वाचा : Money mantra: आश्वासक मिडकॅप फंड

‘बीएसई कॅपिटल गुड्स’या निर्देशांकात २७ कंपन्यांचा समावेश केला गेला आहे. एबीबी इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, हनीवेल ऑटोमेशन, लार्सन अँड टुब्रो, सिमेंन्स, थरमॅक्स, प्राज इंडस्ट्रीज, ग्रींडवेल, लक्ष्मी मशीन या निवडक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना कायमच गुंतवणुकीवर उत्तम परतावा दिला आहे. पुढील आठवड्यातील लेखात या कंपन्यांच्या व्यवसायाविषयी सविस्तरपणे समजून घेऊ.

लेखक अर्थ अभ्यासक आणि वित्तीय मार्गदर्शक आहेत.

joshikd282@gmail.com