Money Mantra: प्रश्न १: एनपीए म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या कर्जाचे व्याज अथवा मुद्दल किंवा दोन्हीही यांची परतफेड देय तारखेपासून ९० दिवसात होत नाही, त्यावेळेस असे कर्ज खाते एनपीए(नॉन पर्फोरमिंग अ‍ॅसेट) अनुत्पादित कर्ज म्हणून ठरविले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रश्न २: कर्ज खाते एनपीए झाल्याचा कर्जदारावर व बँकेवर काय परिणाम होतो?

कर्ज खाते एनपीए झाल्याने त्यावर मिळणारे व्याज बँकेस उत्पन्न म्हणून धरता येत नाही शिवाय अशा खात्याच्या नावे रकमेवर बँकेला १०% ते १००% पर्यंत (एनपीएच्या वर्गवारी व तारणाच्या बाजार मुल्यानुसार) तरतूद करावी लागते असा दुहेरी फटका बसतो व यामुळे बँकेच्या नफ्यावर विपरीत परिणाम होतो. तर खाते एनपीए झाल्यावर बँकेकडून उपलब्ध सर्व मार्गाने वसुलीसाठी कार्यवाही केली जाते. तसेच एका बँकेत खाते एनपीए असताना दुसऱ्या बँकेकडून अथवा दुसऱ्या कुठल्या वित्त संस्थेकडून कर्ज मिळत नाही.

हेही वाचा… Money mantra: आश्वासक मिडकॅप फंड

प्रश्न ३: कर्जखाते एनपीए झाल्यानंतरही कर्जदारास अधिकार असतात का? कोणते?

१) थकीत कर्जदाराची मालमत्ता जप्त करण्यापूर्वी तशी नोटीस देणे बँकेवर बंधनकारक असते व या कर्जदाराला परतफेडीसाठी नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांची मुदत देणे आवश्यक असते, तसेच या कालावधीत परतफेड झाली नाही आणि मालमत्ता विक्रीस काढली तर आणखी ३० दिवस मुदत देणे आवश्यक असते.
२) बँकेने मालमत्ता ताब्यात घेत असल्याची नोटीस दिल्यापासून ७ दिवसांच्या आत कर्जदार योग्य ते कारण देऊन त्यास विरोध करू शकतो.
३) मालमत्तेच्या विक्रीतून आलेल्या रकमेतून संपूर्ण कर्ज रक्कम वसूल होऊन काही रक्कम उरली तर त्या रकमेवर कर्जदाराचा अधिकार असतो.

प्रश्न ४ : ओटीएस (वन टाइम सेटलमेंट) म्हणजे काय ?

ओटीएस म्हणजे जेंव्हा कर्जदार संपूर्ण कर्ज रक्कम भरू शकत नाही अशावेळी व्याजात/ प्रसंगी मुदलात काही प्रमाणत सूट देऊन एकरकमी कर्ज परतफेडीचा पर्याय दिला जातो. यामुळे वसुलीच तगादा थांबतो, तसेच बँकेची एनपीएची रक्कम तेवढ्या प्रमाणात कमी होते व कर्ज खात्यावर बँकेस तरतूद करावी लागत नाही. असे असले तरी बँक सरसकट ओटीएससाठी तयार होत नाही तसेच दिली जाणारी सवलत सबंधित बँकेच्या याबाबतच्या धोरणानुसारच दिली जाते. ओटीएसचा लाभ घेणाऱ्या कर्जदाराचा सिबील स्कोर एकदम कमी होऊन नवीन कर्ज मिळणे शक्य होत नाही. फसवणूक अथवा गैरव्यवहारामुळे एनपीए झालेल्या कर्जखात्यास ओटीएसचा लाभ घेता येत नाही.

हेही वाचा…Money Mantra : आर्थिक फसवणूक कशी टाळाल?

प्रश्न ५:सूक्ष्म व लघु उद्योग (एमएसएमई ) अंतर्गत असलेले कर्ज खाते एनपीए झाल्यास ओटीएस बाबत काही लवचिक धोरण आहे का ?

होय , एनपीएची वर्गवारी, एनपीएचा कालावधी व तारण असलेल्या मालमत्तेचे बाजारमूल्य विचारता घेऊन ओटीएसचा पर्याय दिला जातो.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra what is npa what are the rights of the borrower in case of npa mmdc psg
First published on: 16-03-2024 at 21:09 IST