scorecardresearch

मुदत विम्याची ‘ती’ची पहिली खरेदी

महिलांनी शुद्ध मुदत विमा अर्थात टर्म प्लॅन खरेदीच्या काही हितकर गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. जीवनातील अनिश्चिततेपासून स्वत:चे आर्थिक संरक्षण करण्यासाठी होणारी त्यांची ही पहिली खरेदी विचारपूर्वकच हवी…

insurance
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

-विघ्नेश शहाणे

मजबूत, निर्भिड, दृढनिश्चयी आणि स्वतंत्र… आजच्या महिलांना ही विशेषणे बिनदिक्कत लागू पडतात. चांगले शिक्षण मिळवून, करिअरमध्येही निरंतर प्रगतीची पायरी चढण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या महिला या कुटुंबासाठी समान योगदानकर्त्या बनल्या आहेत. किंबहुना नोकरीसोबतच त्या घर चालवतात, मुलांची काळजी घेतात आणि घरातील वृद्धांचा सांभाळही करतात. एकुणातच घराचा केंद्रबिंदू असल्याने, स्त्रीला जीवन विम्याचे संरक्षण मिळणे पुरुषाप्रमाणेच अत्यावश्यक आहे. बाजारात विविध प्रकारच्या योजना अस्तित्वात असल्या तरी, शुद्ध मुदत विमा अर्थात टर्म प्लॅनचा तिने विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण ते सर्वात परवडणाऱ्या प्रीमियमवर भरीव जीवन विम्याचे कवच प्रदान करते. जीवनातील अनिश्चिततेपासून स्वत:चे आर्थिक संरक्षण करण्यासाठी खरेदी केली गेलेली ही ‘ती’ची पहिली आर्थिक मालमत्ता आहे.

टर्म प्लॅनचे महिला खरेदीदारांना खालील फायदे मिळतात:

आर्थिक सुरक्षितता
अधिकाधिक स्त्रिया कमावत्या झाल्या असल्याने आणि घरच्या उत्पन्नात योगदान देत असल्याने त्यांनाही विम्याचे कवच गरजेचे ठरते. अविवाहित आणि एकल माता असलेल्या स्त्रीसाठी हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण तिच्या पश्चात तिचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संरक्षित राहील, याची खात्री टर्म प्लॅन देते.

लवकर खरेदीचा फायदा
आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात टर्म प्लॅन खरेदी केल्याने पुरेसे आणि परवडणारे जीवन विमा संरक्षण मिळविले जाण्याव्यतिरिक्त अनेक फायदे आहेत. वय लहान असल्याने कमी प्रीमियम भरावे लागते, कारण त्या वयात आरोग्य चांगले असण्याची शक्यता असते आणि विस्तृत वैद्यकीय चाचण्यांची आवश्यकता नसते. इतकेच नाही तर ते अल्पसे प्रीमियम हे विमा योजनेच्या संपूर्ण कालावधीत समान राहते.

करिअर नियोजनांत सुरक्षा कवच म्हणून मदतकारक
आजच्या स्त्रिया खूप जास्त उपक्रमशील आहेत; त्या त्यांचे छंद जोपासतात, आवडी-निवडींना मुरड न घालता त्यांचे नेटाने अनुसरण करतात आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी होणाऱ्या गुंतवणुकीमुळे त्यांचे काहीसे कर्ज-दायीत्व तयार होऊ शकते. कर्जाची ठरावीक कालावधीत परतफेड आवश्यकच असते. जर या कालावधीत, महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला, तर तिच्या प्रियजनांवर या कर्जाचे ओझे येईल. टर्म प्लॅन असल्याने तिच्या कुटुंबाला या अनपेक्षित परिस्थितीत हे कर्ज फेडण्यास मदत होईल.

अधिक किफायतशीर
महिलांसाठी जीवन विमा देखील अधिक किफायतशीर ठरतो. कारण सर्वसाधारणपणे महिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त असते. त्यामुळे साधारणपणे स्त्रियांसाठी कमी प्रीमियमही निश्चित केला जातो.

गंभीर आजारपणात फायदे
धकाधकीची जीवनशैली आणि ताणतणावाच्या वाढत्या पातळीमुळे स्त्रिया काही मोठ्या आजारांना बळी पडत आहेत. गंभीर आजाराच्या ‘रायडर’ची निवड करणे अशा स्थितीत आर्थिकदृष्ट्या मदतकारक ठरेल. जर असा ‘रायडर’ घेतला असल्यास, एकरकमी लाभ दिला जातो, ज्यातून उपचार खर्च आणि आजारपणामुळे गमवावे लागलेल्या उत्पन्नाची भरपाई होण्यास मदत होते.

कर लाभ
प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत, मुदत विमा पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर १.५ लाख रुपयांर्यंतच्या करकपातीचा दावा करता येऊ शकतो. या कर लाभासंबंधी अधिक माहितीसाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे उचित ठरेल.

मुदत विम्याच्या खरेदीचा विचार करताना, महिलांनी लक्षात घ्यावयाचे घटक –

१. पुरेसे जीवन कवच
मुदत विमा म्हणजेच टर्म प्लॅन खरेदी करताना, मिळविलेले जीवन कवच हे तुमच्या अवलंबितांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे याची खात्री करा. तुमच्या पश्चात कुटुंबाचे नियमित घरगुती खर्च भागवण्यास मदतच केवळ नव्हे, तर थकीत कर्जाचे हफ्ते, मुलांच्या उच्च शिक्षणासारख्या भविष्यातील प्रमुख गरजा देखील या विमा कवचातून पूर्ण होतील, हे देखील पाहिले गेले पाहिजे.

२. योजनेची वैशिष्ट्ये
तुमच्या गरजेनुसार, आर्थिक कुवत आणि उद्दिष्टांनुसार प्रीमियम भरण्याची लवचीकता आणि कालावधी यासारख्या विमा पॉलिसीच्या वैशिष्ट्यांचे काळजीपूर्वक परीक्षण करा.

३. अतिरिक्त रायडर्स
टर्म प्लॅनमध्ये जोडल्या जाऊ शकणाऱ्या रायडर्सच्या स्वरूपात विमा घेऊन तुम्ही अपघात किंवा गंभीर आजार यासारख्या इतर जोखमींसाठी देखील संरक्षण सज्जता करू शकता. प्रीमियममध्ये नाममात्र वाढीसह अतिरिक्त कवच मिळू शकते.

४. खरेदीची पद्धत
टर्म प्लॅन ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी केला जाऊ शकतो. ऑनलाइन टर्म प्लॅन म्हणजे ग्राहकाने थेट विमा कंपनीच्या संकेतस्थळ किंवा मोबाइल ॲपद्वारे तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाशिवाय खरेदी केलेला असतो. दुसरीकडे, ऑफलाइन टर्म प्लॅन म्हणजे विमा कंपनीच्या वितरण वाहिन्यांद्वारे जसे, एजन्सी, बँकअश्युरन्स, विक्री प्रतिनिधी, अँग्रीगेटर यांच्या मार्फत होणारी खरेदी असते. दोन्हीत एकसमान टर्म प्लॅनची खरेदी होत असली तरी, ऑनलाइन योजना सामान्यत: थोड्या कमी किमतीत येते, कारण त्यात दलाली अथवा सेवा शुल्काचा समावेश नसतो. तथापि, ऑफलाइन खरेदी करताना, विमा सल्लागार संपूर्ण प्रक्रियेत मदत करेल आणि तुम्हाला पॉलिसीची वैशिष्ट्ये, अटी आणि शर्ती आणि इतर तपशिलांबद्दल आवश्यक सल्लाही देईल.

एका महिलेसाठी, योग्य आर्थिक नियोजन आवश्यक आहे जेणेकरून ती तिच्या आयुष्यातील सर्व ध्येये आणि टप्पे गाठू शकेल. सर्वसमावेशक आर्थिक योजना तयार करताना, टर्म प्लॅन हा त्या योजनेचा भक्कम आधारस्तंभ बनतो ज्यावर भविष्यातील गरजांसाठी इच्छित संपत्तीचे स्मारक निर्धोकपणे उभारले जाऊ शकते.
(लेखक, एजीस फेडरल लाइफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी)

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 11:23 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या