रामनारायण रुईया महाविद्यालयातही ‘साज मराठी’ हा संस्कृती दर्शन करणारा कार्यक्रम सादर केला. विशेष म्हणजे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून साकारला गेला. शिक्षकांच्या अंशत: मार्गदर्शनावर विद्यार्थ्यांनी कलेच्या आणि मेहनतीच्या जोरावर कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमात लोकसंस्कृतीसोबतच लोकभाषा आणि आदिवासी परंपरेलाही स्पर्श करण्यात आला. बोलीभाषेतील उतारे, साहित्य विद्यार्थ्यांसमोर आणले गेले. वासुदेव, जात्यावरच्या ओव्या, जागरण गोंधळ, कोळी गीत, संस्कृतीवर भाष्य करणाऱ्या कविता; मालवणी गीते तसेच विदर्भ, खान्देश प्रांतातील स्त्रियांच्या भावना व्यक्त करणारी ग्रामीण गीते, शेतकरी गीत आणि अखेरीस सादर झालेल्या तारपा नृत्याने लोकांना वेड लावले. गीतनृत्यनाटय़ असा वेगळा आविष्कार भाषादिनी पाहायला मिळणं म्हणजे पर्वणीच होय. या कार्यक्रमासाठी मराठी वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिल्पा नेवे यांचे विशेष आणि मोलाचे मार्गदर्शन मुलांना लाभले. मराठी विभाग आणि मराठी पत्रकारिता विभाग अशा दोन विभागांचा सहभाग या कार्यक्रमात होता.