* रूपांतरण   -गौरी खेर
करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल करणे अपरिहार्य ठरते. त्याअनुषंगाने मार्गदर्शन करणारे
हे मासिक सदर..

अनेक महाविद्यालयांमध्ये शेवटच्या वर्षांला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्लेसमेन्ट्स प्रक्रिया सुरू आहे. शेवटच्या वर्षांतील विद्यार्थ्यांसाठी हा घोर चिंतेचा काळ असतो. नोकरी मिळेल की नाही, वेतन किती असेल, पद कुठले असेल याबाबत विद्यार्थी संभ्रमात असतात. पहिल्याच दिवशी ज्यांची प्लेसमेन्ट होते, त्यांचा इतरांना हेवा वाटत असतो. कोणाला किती सी.टी.सी. (cost to company) ची नोकरी मिळाली, हा संपूर्ण महाविद्यालयात चच्रेचा विषय होतो. या सगळ्या गोंधळात असेही काहीजण असतात, ज्यांचे पुढे आपण काय करावं, हे अगदी पदवीधर होईपर्यंत निश्चित झालेले नसते. नक्की काय नको/ किंवा काय नाही करायचं हे जरी माहिती असलं तर पुढचा मार्ग निवडण्यास मदत होते.
वर्षभरानंतर उत्तम प्लेसमेंट मिळालेले विद्यार्थी महाविद्यालयामध्ये पुन्हा डोकावून ‘ओपिनग’ची चौकशी करतात. त्याविषयी अधिक जाणून घेतलं तर यासंबंधीचा उलगडा होतो. ज्या नोकरीने आणि सी.टी.सी.ने भुरळ घातली होती, त्याची मोहिनी लवकरच उतरून वस्तुस्थितीची जाणीव झाल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात येते. कामाचा दबाव पेलण्यापलीकडचा तरी असतो किंवा आणखी महत्त्वाचे म्हणजे हे काम आपल्याला रुचणारे नाही, याची त्यांना जाणीव होते. जेव्हा या गोष्टीचा उलगडा त्यांना होतो तेव्हा कामाचा बोजा अधिकच जड वाटू लागतो. आपण आपल्या आयुष्याची पुढील ४० र्वष जर काम करणार असू तर जर आपल्याला आवडणारे काम केले तर तो काळ अगदी जलद गतीने सरतो. मन गुंतवून काम करताना वेळ कसा जातो, हे कळत नाही. पण मेख अशी की, अमुक एक काम माझ्यासाठी नाही, हे प्रत्येकाला कसे कळणार?
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट होगन यांचा व्यक्तिमत्त्व आणि व्यावसायिक परिणामकारकता यावर सखोल अभ्यास आहे. त्यांच्या मते, आपल्या व्यक्तिमत्त्वाचे मुख्यत: दोन पलू असतात – व्यक्तिगत आणि सामाजिक. आपण आपल्याला किती जाणतो आणि स्वत:कडे कसे बघतो, त्यावरून एक तर  आपल्या इतरांसोबतच्या दैनंदिन वर्तणुकीतून आपलं दुसरं व्यक्तिमत्व घडत असतं. मात्र सामाजिक व्यक्तिमत्त्वात आपला व्यक्तिगत स्वभावही डोकावत असतो. या दोन पलूंमधील तफावत जेव्हा सर्वात कमी असते तेव्हा कामाच्या बाबतीत जुळवून घेताना त्रास होत नाही. पण हे सर्व आपल्याला कसं कळू शकतं?
निरनिराळा पेशा स्वीकारण्यासाठी वेगवेगळी मनोवृत्ती आवश्यक ठरते. आपल्या स्वभावानुसार, व्यवसाय निवडल्यास पुढे येणाऱ्या व्यावसायिक अडचणींना सामोरे जाण्यास कठीण जात नाही. उदा. अबोल, घुम्या प्रकारची व्यक्ती पब्लिक रिलेशन्स, इव्हेण्ट मॅनेजमेंट, ग्राहक सेवा यांसारख्या व्यवसायात कितपत रमू शकेल? ज्या व्यक्तीने  कधीही हिशोबच केला नसेल अथवा खर्चाचा ताळेबंद ठेवला नसेल किंवा आकडय़ांसोबत ३६चं नातं असेल, अशा व्यक्तीला अकाउंट्समध्ये करिअर करणं कितपत जमेल? मुळात कितीजणांना आपल्या स्वभावाची आणि व्यवसायाची सांगड कशी घालावी, हे नक्की माहिती असतं?
याचं उत्तर शोधण्यासाठी आजच्या कॉर्पोरेट विश्वात  ‘बिहेव्हिअरल असेसमेन्ट’ची मदत घेतली जाते. काही कामांसाठी विशिष्ट स्वभाव गुणांची गरज असते. ते गुण उमेदवारात आहेत की नाहीत हे जोखून घेण्यास उमेदवारांना सायकोमेट्रिक टूल्सच्या आधारे एक टेस्ट द्यावी लागते,  जेणेकरून एक निष्पक्ष अहवाल तयार होतो आणि त्यातून उमेदवाराचे स्वभावगुण आणि क्षमतेची झेप कळून येते.
उत्साही, जाणकार विद्यार्थी प्लेसमेंटच्या आधीच स्वखर्चाने स्वत:ची असेसमेंट करून घेतात. लीडरशिप, टीम वर्क, भावनिक बुद्धिमत्ता असे लेटेस्ट ‘बझ वर्ड्स’ असलेल्या क्षमतांवर चाचणी अहवाल अनुकूल असला की, तो उमेदवाराच्या सी.व्ही.ला जोडला जातो. यामुळे उमेदवाराच्या बायोडेटाला वजन प्राप्त होतं. नोकरी देणाऱ्या कंपनीला उमेदवाराच्या स्वभावगुणांची आणि क्षमतेची पुरेशी कल्पना येते आणि उमेदवाराला नोकरी द्यायची अथवा नाही यासंबंधीचा निर्णय घेण्यास मदत होते. प्रतिकूल अहवाल असल्यास आपण कशात कमी पडतो, हे होतकरू उमेदवारांना कळून येते.
यात चांगला निकाल आणि वाईट निकाल असे अगदीच नसते. आपला स्वभावधर्म कोणत्या घडीत बसतो आणि त्यामुळे आपल्या कामात कशी मदत होऊ शकते, हे मुख्यत: कळते. विशेष प्रसंगी आपण असे का वागतो, याचा एकतर्फी निर्णय न घेता असेसमेंटद्वारे उत्तर मिळू शकते.