बालेवाडीच्या स्टेडियममध्ये जिथे क्रीडापटू ऑलिम्पिकची स्वप्ने बाळगत सराव करत असतात, तिथे गेल्या आठवडय़ात आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड भरले होते. यंदा ही स्पर्धा भारतात- पुण्यात झाली. ३८ देशांतील मिळून २२८ मुले आणि भारत होस्ट असल्याने आपल्या देशाची १२ मुले त्यात सहभागी झाली होती. त्यासाठी बालेवाडीच्या एका स्टेडियममध्ये क्युबिकल रचली होती. या क्युबिकलमध्ये विज्ञानाचे काही प्रयोग मांडले होते. आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या टीमचे प्रयोग करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी तेच प्रयोग करून बघण्याची अपूर्व संधी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक पारितोषिक मिळालेल्या मुलांनाही मिळाली. मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे (एम.एस.टी.ए.) दरवर्षी इयत्ता सहावी व नववीच्या मुलांसाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा घेतली जाते. या स्पध्रेत गेल्या दोन-तीन वर्षांत सुवर्ण किंवा रौप्य पदक मिळवून विज्ञानातील रुची सिद्ध केलेल्या आणि आता नववी, दहावी किंवा अकरावीत शिकत असलेल्या मुलांसाठी ही एक अनोखी संधी एम.एस.टी.ए.तर्फे उपलब्ध करून देण्यात आली होती.
गेल्या आठवडय़ात सुमारे १०० विद्यार्थी, मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनचे शिक्षक, इंटरनशनल ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडचे परीक्षक तसेच त्या चमूना मार्गदर्शन करणारे शिक्षक असे आम्ही एका वेगळ्याच शैक्षणिक सहलीला गेलो होते. सर्वजण आधी बालेवाडीला पोहोचलो. तेथे मुलांनी तीन तास वेगवेगळे प्रयोग केले. जे प्रयोग आदल्या दिवशी ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडच्या स्कॉलर मुलांनी केले, ते आपल्याला करायला मिळताहेत, म्हणून मुले खूश होती आणि ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडचे मार्गदर्शक याही मुलांना तितक्याच उत्साहाने मार्गदर्शन करत होते.
बालेवाडीहून मग ही सहल पुण्याच्या आयसर संस्थेत गेली. आय. आय. टी.च्या धर्तीवरची ही विज्ञान संशोधन संस्था आहे. पाच वर्षांपूर्वी ‘आयसर’ सुरू झाली. त्या संस्थेचे संचालक डॉ. नातू यांनी स्वत: मुलांना ‘आयसर’ची तसेच विज्ञान-संशोधन या करिअरची माहिती दिली. विज्ञानप्रेमी मुलांसाठी संशोधन हे चांगले करिअर होऊ शकते आणि त्यासाठी ‘आयसर’ ही उत्तम शिक्षणसंथा आहे, हे त्यांनी मुलांना विशद केले. ‘आयसर’च्या अत्याधुनिक वर्गखोलीत, इंटरनॅशनल ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडच्या मुलांना जो थिअरीचा पेपर होता, तो या बालवैज्ञानिक मुलांना सोडवायला दिला गेला. तो अर्थातच कठीण होता. हा पेपर कसा सोडवायचा, याचे मार्गदर्शन तिथे मुलांना करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड ही जागतिक पातळीवरची स्पर्धापरीक्षा असते. ती दरवर्षी डिसेंबरदरम्यान होते. कोणताही एक देश यजमान असतो. विविध देशांतील विज्ञान-निपुण मुलांचे चमू तिथे जमतात. त्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा होते. त्यातून अंतिम विजेते निवडले जातात.
अलीकडे, नोव्हेंबर महिन्यात भारतभरात सुमारे ८५० विविध केंद्रांवर ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडची पहिली परीक्षा झाली. त्यातून सुमारे ३५० मुले निवडली जातात. त्यांची आणखी एक फेरी जानेवारीत होते. त्यातून सुमारे ३५-४० मुले निवडली जातात. या निवडक मुलांचा सुमारे २० दिवसांचा प्रशिक्षण वर्ग मुंबईच्या होमी भाभा विज्ञान केंद्रात मे महिन्यात होतो. तेथे त्यांना २५-३० तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते. त्यातून सहा जणांचा चमू निवडला जातो, जो आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडसाठी भारताचे प्रतिनिधित्व करतो. या प्रतिनिधी मुलांना तज्ज्ञांचे विशेष प्रशिक्षण मिळते.
ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडची ओळख बालवैज्ञानिक मुलांना करून देणे, हा या सहलीच्या आयोजनाचा हेतू होता. या परीक्षेला महाराष्ट्रातून अजून पुरेसे स्पर्धक नसतात. अधिकाधिक मुलांनी ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडला बसावे, याची जाणीव करून देणारी ही सहल मुलांसाठी फारच काही शिकवणारी ठरली.
आता आठवी-नववी इयत्तेत असलेले विद्यार्थी येत्या नोव्हेंबरमध्ये ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडला बसू शकतात. ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडला बसण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचा मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनचा मानस आहे. इच्छुकांनी मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनच्या मालाड येथील कार्यालयाशी  संपर्क साधावा.                                        
मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन
balvaidnyanik@gmail.com
http://www.msta.in