इव्हेण्ट मॅनेजमेंट क्षेत्रातील कामाचे स्वरूप आणि संधी याविषयी सविस्तर माहिती –
इव्हेण्ट मॅनेजमेंट हे सध्या उत्तम मागणी असणारे क्षेत्र आहे. विशेष म्हणजे इव्हेण्ट मॅनेजमेंटमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांना कोणत्याही विद्याशाखेतील पदवीची गरज नसल्याने किमान बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही यामध्ये करिअर करू शकतात. वयाचीही अट नसल्याने कोणत्याही वयातील व्यक्ती सहज या क्षेत्राचे ज्ञान घेऊ शकतात. या क्षेत्रामध्ये पदवीपेक्षा प्रत्यक्ष अनुभवाला महत्त्व आहे. अगदी छोटय़ाशा वाढदिवसाच्या समारंभापासून ते मोठमोठय़ा सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत आज इव्हेण्ट मॅनेजमेंटची गरज भासत आहे. इतकंच काय, सर्वाच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या लग्नसमारंभांतही अलीकडे हमखास इव्हेण्ट मॅनेजमेंटचा वरचष्मा दिसत आहे.
सध्या पाहिले गेले तर अगदी बारशापासून लग्नापर्यंत तसेच मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम, कॉर्पोरेट सेमिनार यासाठी इव्हेण्ट मॅनेजमेंटची गरज असते. अशा कार्यक्रमांमध्ये स्टेज डेकोरेशनपासून ते येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत ते भोजनव्यवस्थेपर्यंत अनेक व्यवस्था पाहावी लागते.
सजावटीबरोबरच ज्यांना संगीत, प्रकाशयोजना, आदरातिथ्य, व्यवस्थापन अशा क्षेत्रांची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा करिअरचा उत्तम पर्याय आहे. या विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण असल्याचे प्रामुख्याने कारण म्हणजे एक तर हे क्षेत्र ग्लॅमरस आहे. तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमांना, कल्पनांना यात वाव आहे.
प्रशिक्षण देणाऱ्या संस्था तसेच महाविद्यालये, युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, सिंबॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ जर्नालिझम अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, पुणे तसेच सेंट झेविअर्स कॉलेज ऑफ कम्युनिकेशन मुंबई, इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेण्ट मॅनेजमेंट, मुंबई यासारख्या महाविद्यालयांतून इव्हेण्ट मॅनेजमेंट अभ्यासक्रम विद्यार्थी पूर्ण करू शकतात.
आवश्यक कौशल्ये : भाषेवर प्रभुत्व, उत्तम संवादकौशल्य, सजावटीची आवड, कल्पकता, सृजनशीलता, विपणन क्षेत्राचे ज्ञान या गुणांवर आपण या क्षेत्रात आपले प्रभुत्व गाजवू शकता.
 संधी : सध्याची इव्हेण्ट मॅनेजमेंटची स्थिती पाहता भविष्यकाळात या क्षेत्राला मोठी मागणी मिळणार असल्याचे दिसत आहे. सुमारे ३०० हून अधिक इव्हेण्ट मॅनेजमेंट कंपन्या सध्या देशात कार्यरत आहेत. बऱ्याच महाविद्यालयात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुभवासाठी एखाद्या इव्हेण्ट मॅनेजमेंट कंपनीत काम करण्याची संधी दिली जाते. त्या अनुभवावर विद्यार्थ्यांला कोणत्याही कंपनीत काम मिळू शकते, तसेच ज्यांना या क्षेत्रात स्वतचा व्यवसाय सुरू करायचा अशांनाही या क्षेत्रात प्रचंड वाव आहे.
सध्याचा कल बघता अगदी लहान संस्थांपासून मोठमोठय़ा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा इव्हेण्ट मॅनेजमेंटसाठीचा वाढता कल दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सध्या कार्यरत असणाऱ्या इव्हेण्ट कंपन्यांमार्फत लहान कार्यक्रमांपासून अगदी मोठय़ा प्रमाणातील कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे अशा कंपन्यांना काम देणाऱ्या कंपन्यांनाही कार्यक्रमाचे नियोजन करणे सोपे जाते. या क्षेत्रात असणारी वैविध्यता लक्षात घेऊन तरुण पिढी मोठय़ा संख्येने या क्षेत्राकडे आकर्षति होताना दिसते.
इव्हेण्ट मॅनेजमेंटमध्ये काम करताना सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपल्या संभाषण कौशल्याद्वारे उत्तम संवाद साधून कोणतीही संस्था अथवा कंपनीकडून काम मिळवणे. येथे आपल्यातील विपणन कौशल्याचा कस लागतो. काम मिळवून अर्धी बाजी जिंकली असली तरी मिळालेले काम वेळेत पूर्ण करणे व संभाव्य खर्चाबाबत संबंधितांना पूर्वसूचना देणेही गरजेचे असते. काम वेळेत पूर्ण करताना प्रत्येक दिनाचे योग्य नियोजन करून संबंधितांवर कामाची जबाबदारी सोपवावी लागते.
जबाबदारी सोपवल्यावर त्यांच्याकडून नेमून दिलेले काम वेळेत पूर्ण होते की नाही यावर लक्ष ठेवावे लागते. तसेच पूर्ण झालेल्या अथवा उर्वरित कामाचा सविस्तर तपशील वेळोवेळी आयोजकांना देणेही आवश्यक असते. यामुळे परस्परसंबंधांत विश्वास निर्माण होतो.
नियोजित कार्यक्रमाच्या दिवशीचे व्यवस्थापन करताना वेळेच्या मर्यादेत सर्व गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. ऐनवेळी काही समस्या उद्भवल्यास त्याचा कार्यक्रमात अडथळा येऊ नये, या दृष्टीने तयारी ठेवावी लागते. उदा. एखाद्या कार्यक्रमात सहा हॅलोजन्सची गरज भासत असेल तर ऐनवेळी एखादा न चालल्यास अथवा त्यात काही बिघाड झाल्यास ठरल्यापेक्षा जास्तीचे हॅलोजन्स ठेवल्यास सोयीचे जाते.
कामाचे स्वरूप : इव्हेण्ट मॅनेजमेंटशी निगडित असणारी कामे प्रत्येक कंपनीत सारखीच असली तरी कंपनीनुसार कामाची पद्धत वेगळी असते. संबंधित कंपनीचे संचालक अथवा पदाधिकाऱ्यामार्फत कंपनीच्या कामाची रूपरेषा ठरवली जाते. त्यानुसार विपणन पद्धती ठरवणे, प्रायोजक मिळवणे, तांत्रिक बाबींकडे लक्ष देणे (उदा. स्टेजचा आकार, प्रकाशयोजना, ध्वनियोजना) स्थळनिश्चिती, निमंत्रण पत्रिका तयार करणे, त्याची छपाई करणे, संबंधितांपर्यंत त्या पोहोचवणे, कलाकारांची वेळ निश्चित करणे, येणाऱ्या-जाणाऱ्यांची वाहन व्यवस्था बघणे आदी महत्त्वपूर्ण बाबींवर काम केले जाते. कार्यक्रमाचे स्वरूप मोठे असल्यास काही वेळा मोठय़ा इव्हेण्ट कंपन्यांमार्फत छोटय़ा कंपन्यांचीही मदत घेतली जाते.
उत्पन्न : पसे कमावण्याच्या दृष्टीनेही इव्हेण्ट मॅनेजमेंट हे एक उत्तम क्षेत्र आहे. एकदा या क्षेत्राचा पुरेसा अनुभव आल्यास २० ते ३० हजारांपर्यंतचे उत्पन्न मिळवणे सहज शक्य होते. या क्षेत्रात आपण कोणते काम करता यांवरही आपले उत्पन्न अवलंबून असते. उदा. तुम्ही लग्नसमारंभाचे नियोजन या प्रकाराची निवड केली असल्यास तुम्ही ३० ते ४० हजापर्यंतचे उत्पन्न सहज कमवू शकता. तसेच कालांतराने स्वतची कंपनीही सुरू करू शकता.
या क्षेत्रात येण्यासाठी : इव्हेण्ट मॅनेजमेंटची पदवी घेत असतानाच एखाद्या इव्हेण्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्ही कामाला सुरुवात करू शकता. यामुळे केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कामाचे स्वरूप व काम करण्याची पद्धत याचा अंदाज तुम्हाला येतो. एकदा हा अनुभव प्राप्त झाल्यास तुम्ही आपल्या आवडीच्या पर्यायाची
निवड करू शकता. उदा. काहींना लग्न, वाढदिवस समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे नियोजन करण्यात रस असेल तर काहींना कॉर्पोरेट क्षेत्रांशी निगडित मोठे कार्यक्रम, परिषदा, शिबिरे, प्रशिक्षण केंद्र आदी प्रकारांत करिअर करण्याची इच्छा असेल. या अनुभवाच्या जोरावर तुम्ही या क्षेत्रात आपले वेगळेपण सिद्ध करू शकता. कामाचे बदलते स्वरूप, ट्रेंड यानुसार आपल्या काही वैविध्यपूर्ण कल्पनाही सुचवू शकता. कल्पनाशक्ती, सृजनशीलता, वैविध्यपूर्णता, व्यवस्थापन व नियोजन यांवर प्रामुख्याने आधारित असणाऱ्या या क्षेत्रात करिअरच्या असंख्य संधी असल्याने करिअरची वेगळी वाट म्हणून या तुम्ही जरूर या क्षेत्राचा विचार करावा.

career opportunities in the field of creative design after engineering degree
डिझाईन रंग-अंतरंग : अभियांत्रिकी पदवीनंतर ‘क्रिएटिव्ह डिझाईन’ क्षेत्रातील आकर्षक करिअर संधी…
IIIT Nagpur job Vacancy 2024
IIIT Nagpur recruitment 2024 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे नोकरीची संधी! माहिती पाहा
Investment opportunities in FMCG
बदलत्या बाजाराचे लाभार्थी; ‘एफएमसीजी’मधील गुंतवणूक संधी
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार