|| डॉ. श्रीराम गीत

मी बी.कॉम.ला आहे. माझी श्रवणक्षमता ७० टक्के कमी आहे. तसे प्रमाणपत्रही माझ्याकडे आहे. याद्वारे मला करिअरच्या कोणत्या संधी खुल्या असतील? सी.ए. होण्याचेही स्वप्न आहे. मात्र सध्या नोकरीची गरज आहे. मी काय करू?     – शुभम कुंभार, राहुरी

आपण डी.टी.एल. पूर्ण करावे. मिळाली तर नोकरी करावी, अन्यथा टॅक्सेशनमधील अनेक नोकऱ्यांत आपला प्रवेश होऊ शकतो. आपल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचा उपयोग फक्त सरकारी नोकरीसाठी आहे, हे लक्षात घ्या. त्यासाठीचा रस्ता हा स्पर्धा परीक्षांमार्फतच जातो.

माझ्या मुलीला ९३ टक्के दहावीत मिळाले होते. तिला मेडिकल करायचे आहे. मी तिला खगोलशास्त्राचा पर्याय सुचवला आहे. आम्ही दोघेही द्विधा मन:स्थितीत आहोत. कृपया मार्गदर्शन करावे.    – संजय दळवी, कर्जत

आपल्या दोघांची द्विधा मन:स्थिती व्हायची गरजच नाही. कारण  बारावी पी.सी.एम.बी. घेऊन नंतरच तिला पुढचा विचार करायचा आहे. इयत्ता दहावीचे मार्क विसरून जाऊन अकरावी, बारावीमध्ये किमान ऐंशी टक्के टिकवणे हा पुढला टप्पा. नंतर नीटची प्रवेश परीक्षा देऊन मिळाला तर मेडिकलचा प्रवेश, अन्यथा फिजिक्स हा विषय घेऊन मास्टर्स व नंतर खगोलशास्त्र असा हा रस्ता आहे. नीटद्वारे मेडिकल प्रवेश किंवा मास्टर्सनंतर अ‍ॅस्ट्रोनामी व अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये प्रवेश हे दोन्ही अत्यंत कठीण, परिश्रमसाध्य आहेत. दोन्हीसाठी उपलब्ध जागासुद्धा खूप कमी आहेत. म्हणून सध्या फक्त बारावीच्या अभ्यासावर पूर्णत: लक्ष देणे एवढेच लक्ष्य ठेवावे, ही विनंती.