|| प्रथमेश आडविलकर

वाचक मित्रमैत्रिणींनो, गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये आपण भारतातल्या विद्यापीठ विश्वाची सफर केली. या वर्षी आपण परदेशातल्या उत्तमोत्तम विद्यापीठांची माहिती ‘विद्यापीठ विश्व’ या सदरातून घेणार आहोत. प्रत्येक मंगळवारी एक नवे विद्यापीठ आणि नवी माहिती.

विद्यापीठाची ओळख:

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जगातले पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ असलेल्या अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यापीठाची स्थापना दि. १० एप्रिल १८६१ रोजी झाली. एमआयटी या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या मॅसॅच्युसेट्स शहरातील या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे, ‘माइंड अ‍ॅण्ड हँड’. अतिशय बोलके व विद्यापीठाची विचारधारा अधोरेखित करणारे हे ब्रीदवाक्य आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी जीवनात आमूलाग्र बदल करण्याच्या विद्यापीठाच्या हेतूंना अधिक बळकट करणारे आहे. १८६१ मध्ये सुरुवातीला एमआयटी तत्कालीन अमेरिकी समाजातील समस्या निवारण करण्यासाठी एकत्र आलेल्या समविचारी विज्ञानप्रेमी लोकांचा एक छोटासा समुदाय होता. आज मात्र एमआयटीमध्ये सुमारे एक हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून अकरा हजारांहूनही जास्त पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करीत आहेत. एमआयटी आता एक स्वतंत्र, सहशैक्षणिक, खासगी मान्यताप्राप्त विद्यापीठ असून पाच प्रमुख स्कूल्सच्या (विभाग) – आíकटेक्चर अ‍ॅण्ड प्लॅनिंग, अभियांत्रिकी, मानववंशशास्त्र, कला आणि सामाजिक विज्ञान, व्यवस्थापन व विज्ञान माध्यमातून आपले विद्यादानाचे कार्य करत आहे. आजदेखील अभिनव शैक्षणिक कल्पनेचा सिद्धांत एमआयटीच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा अविभाज्य घटक आहे. एमआयटी विद्यापीठाच्या शिक्षण-संशोधनातील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे इथल्या प्राध्यापक-विद्यार्थिवर्गाने कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान अनुकूलता, एचआयव्ही, कर्करोग आणि दारिद्रय़ निर्मूलनासारख्या विविधांगी विषयांतील संशोधनात मोलाचे योगदान दिलेले आहे. याआधीसुद्धा एमआयटी विद्यापीठाने केलेल्या महत्त्वाच्या संशोधनात रडार तंत्राचा विकास, मॅग्नेटिक कोअर मेमरीचा शोध आणि विस्तारित विश्वाची संकल्पना इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

अभ्यासक्रम:

एकोणिसाव्या शतकामध्ये अमेरिकेतील वाढत्या औद्योगिकीकरणाची गरज म्हणून एमआयटी विद्यापीठाने ‘युरोपियन पॉलिटेक्निक युनिव्हर्सटिी मॉडेल’चा अवलंब केला. म्हणूनच हे विद्यापीठ अभियांत्रिकी आणि भौतिकशास्त्र विषयांतील शिक्षण-संशोधनासाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र अलीकडे विद्यापीठाने जीवशास्त्र, अर्थशास्त्र, भाषा आणि व्यवस्थापन या विभागांमध्येही उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधींचे आहेत. एमआयटीमधील शैक्षणिक विभाग हे पाच वेगवेगळ्या स्कूल्सच्या माध्यमातून विभागलेले आहेत. स्कूल ऑफ आíकटेक्चर अ‍ॅण्ड प्लॅनिंग, स्कूल ऑफ इंजिनीयिरग, स्कूल ऑफ ह्यूमॅनिटीज – आर्ट्स अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस, स्कूल ऑफ सायन्सेस व स्कूल ऑफ मॅनेजमेंट या पाच स्कूल्सच्या अंतर्गत एकूण ३२ पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक आणि संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना ‘न्यू इंग्लंड असोसिएशन ऑफ स्कूल्स अँड कॉलेजेस’ या संस्थेची मान्यता मिळालेली आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि स्प्रिंग या दोन सत्रांमध्ये चालतात, तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या-त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे. विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ आíकटेक्चर अ‍ॅण्ड प्लॅनिंगच्या अंतर्गत सेंटर फॉर रियल इस्टेट, मीडिया आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस, अर्बन स्टडीज अ‍ॅण्ड प्लॅनिंग हे विभाग, तर स्कूल ऑफ इंजिनीअिरग अंतर्गत एअरोनॉटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोनॉटिक्स, बायोलॉजिकल इंजिनीअिरग, केमिकल इंजिनीअिरग, सिव्हिल अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअिरग, इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्स, हार्वर्ड-एमआयटी हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, इन्स्टिटय़ूट फॉर डेटा, सिस्टम्स अ‍ॅण्ड सोसायटी, मटेरियल्स सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरग,मेकॅनिकल इंजिनीअिरग, न्यूक्लिअर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरग हे विभाग येतात. याशिवाय स्कूल ऑफ ह्यूमॅनिटीज, आर्ट्स अ‍ॅण्ड सोशल सायन्सेसअंतर्गत कम्पॅरटिव्ह मीडिया स्टडीज, इकोनॉमिक्स, हिस्टरी, अँथ्रॅपॉलॉजी-सायन्स-टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सोसायटी, लिग्विस्टिक अ‍ॅण्ड फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्स, सायन्स रायटिंग इत्यादी विभाग, स्कूल ऑफ सायन्सेसअंतर्गत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स, ब्रेन अ‍ॅण्ड कॉग्निटिव्ह सायन्स, अर्थ, अ‍ॅटमॉस्फिरिक अ‍ॅण्ड प्लॅनेटरी सायन्स तर स्कूल ऑफ मॅनेजमेंटअंतर्गत एमआयटी स्लोआन एक्झिक्युटिव्ह एमबीए प्रोग्रॅम, एमआयटी स्लोआन फेलोज एमबीए प्रोग्रॅम, एमआयटी स्लोआन एमबीए प्रोग्रॅम, एमआयटी स्लोआन पीएचडी प्रोग्रॅम, एमआयटी स्लोआन मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅनॅलिटिक्स, एमआयटी स्लोआन मास्टर ऑफ फायनान्स, एमआयटी स्लोआन मास्टर ऑफ सायन्स इन मॅनेजमेंट स्टडीज इत्यादी अभ्यासक्रम आणि विभाग आहेत.

सुविधा

एमआयटी विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा उपलब्ध असून, विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या आवारात व आवाराबाहेर मात्र विद्यापीठाजवळ, विवाहित व अविवाहित विद्यार्थ्यांना अशा वेगवेगळ्या गरजांनुसार ही सुविधा बहाल करण्यात येते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्ज प्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाची विषयांनुसार स्वतंत्र अशी एकूण पाच अत्याधुनिक ग्रंथालये आहेत. विद्यापीठाच्या संपूर्ण आवाराचा व वास्तूंचा अपंग विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून विचार करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हेल्थ इन्शुरन्स व वैद्यकीय सुविधा काही अटींवर विद्यापीठाकडून दिल्या जातात. एमआयटी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बारा संग्रहालये आणि गॅलरीज आहेत. या संग्रहालयास प्रत्येक वर्षी जवळजवळ सवा लाख पर्यटक भेट देतात.

वैशिष्टय़

एमआयटीच्या अनेक माजी विद्यार्थी वैज्ञानिक संशोधन, सार्वजनिक सेवा, शिक्षण आणि व्यवसाय इत्यादी क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर चमकलेले आहेत. ऑक्टोबर २०१८ पर्यंतच्या सांख्यिकीनुसार, आतापर्यंत संस्थेमधून एकूण ९३ नोबेल पारितोषिक विजेते आणि २५ टय़ुिरग पुरस्कार विजेते तयार झालेले आहेत. याशिवाय ६५ मार्शल स्कॉलर्स, ४५ रोड्स स्कॉलर्स, ३८ मॅकअर्थर फेलोज, ३४ अंतराळवीर आणि कित्येक संस्थांमधील मुख्य शास्त्रज्ञ एमआयटीशी संलग्न आहेत. येथील विद्यार्थी साठहून अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत, नाटय़, लेखन आणि नृत्य स्पर्धामध्ये घेतात, तर एमआयटीतील अनेक प्राध्यापक पुलित्झर पुरस्कार विजेते आणि गुगेनहेम फेलोज आहेत.

संकेतस्थळ  http://www.mit.edu/

itsprathamesh@gmail.com