बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात असे म्हटले जाते. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य यांच्या बाबतीतही तसेच घडले. त्यांनी पावले टाकायला सुरुवात केली ती नाचत नाचतच. मयूर यांची आई गीता यांना नृत्याची आवड. पण त्या काळात सुशिक्षित, पांढरपेशा आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीने नृत्य करणे कमीपणाचे मानले जाई आणि घरातूनही परवानगी नसे. त्यामुळे मयूर यांची आई नृत्य शिकू शकली नाही. नृत्याची ही आवड किंवा वारसा मयूर यांना आईकडूनच मिळाला. मयूरमध्ये नृत्यकलेची असणारी आवड आईने जोपासली. पण मुलगा म्हणून मयूरने पायात घुंगरु बांधायचे नाहीत आणि नाचायचे नाही, असे वडिलांचे म्हणणे होते. मयूरच्या नृत्याला आणि नृत्य शिकण्यालाही त्यांचा ठाम विरोध होता. लहानपणी दूरदर्शनवरील चित्रपटातील गाणी पाहून मयूर त्याप्रमाणे नाच करायचा. घरी पाहुणे मंडळी आली की मयूरला नाच करून दाखव म्हणून सांगितले जायचे आणि मयूर नाच करून दाखवायचा. पण तो नाच पाहायला त्याचे वडील मात्र तेथे बसायचे नाहीत.

एक दिवस बालमोहन शाळेच्या जवळून जात असताना दुरून घुंगुरांचा आवाज कानावर आला. शोध घेतला असता तो शाळेच्याच एका वर्गातून येत असल्याचे कळले आणि मयूर व त्याच्या आईची पावले तिकडे वळली. ज्येष्ठ नृत्यगुरू आशाताई जोगळेकर तिथे काही मुलांना नृत्याचे धडे देत होत्या. आशाताई यांचे सुंदर आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्व पाहून मयूर भारावून गेले आणि नृत्य शिकायचे तर आशाताई यांच्याकडेच असे त्यांच्या मनाने घेतले. आईने धाडसाने मयूरला त्यांच्याकडे नृत्य शिकण्यासाठी पाठवायला सुरुवात केली. घरून वडिलांचा विरोध असल्याने मयूर नृत्य शिकायला जातोय याची त्यांना काहीच कल्पना दिलेली नव्हती. वडील पेढीवरून घरी यायच्या आधी मयूर नृत्याची शिकवणी करून घरी यायचा. त्यामुळे वडिलांना काहीच कळले नव्हते. सहा महिने निर्धास्ततपणे पार पडले. एकदा मात्र वडिलांची घरी येण्याची आणि मयूरची वेळ चुकली. नेमके वडील घरी आले तेव्हा मयूर पायात घुंगरु बांधून नाचाचा सराव करत होता. ते पाहून वडील चिडले आणि त्यांनी घुंगरू उचलले घराबाहेर फेकून दिले. झाला प्रकार आशाताई आणि त्यांच्या कन्या अर्चना यांच्या कानावर गेला. अर्चना यांनी मयूर, आई आणि बाबांना नृत्यालयात येऊन भेटायला सांगितले. मयूरचे वडील त्यांना भेटायला गेले आणि काय जादू झाली ते कळले नाही; पण नृत्याला असलेला त्यांचा कडवा विरोध मावळला आणि नृत्य करायला, शिकायला त्यांनी परवानगी दिली. पुढे लोकांकडून मयूरचे कौतुक व्हायला लागले, या क्षेत्रात त्याचे नाव झाले आणि वडिलांकडून नृत्यकलेसाठी त्याला संपूर्ण सहकार्य मिळाले. घरातून वडिलांचा सुरुवातीला ठाम विरोध असूनही आईचा खंबीर पाठिंबा आणि मयूर यांची जिद्द, नृत्यकलेप्रती असलेली निष्ठा, गुरू आशाताई, त्यांच्या कन्या अर्चना यांचे आशीर्वाद यामुळे नृत्यकलेत मयूर यांनी आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली. कथ्थक नृत्याच्या विविध परीक्षा देऊन मयूर यांनी नृत्यकलेतील ‘अलंकार’ ही पदवी मिळविली आहे.

एका चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी मयूर यांना मिळाली आणि त्याच वेळी त्यांची नृत्याची परीक्षा होती. काय करायचे असा पेच त्यांच्यासमोर उभा रहिला. गुरू आशाताईंना विचारले असता समोर आलेली संधी स्वीकार. नृत्याची परीक्षा नंतरही देता येईल, असा व्यावहारिक सल्ला दिला. मयूर यांनी ती संधी स्वीकारायचे ठरविले. पण दुर्दैव म्हणजे आदल्या रात्री चित्रीकरण रद्द झाल्याचा दूरध्वनी आला आणि आता काय, असा प्रश्न पुन्हा मयूर यांच्यापुढे उभा ठाकला. आशाताई यांनी मग काय, आता उद्या परीक्षेला जायचे, असे सांगितले. त्याप्रमाणे मयूर परीक्षेला गेले आणि परीक्षेतही ते यशस्वी झाले. गुरूंचा आशीर्वाद, पाठिंबा असेल तर कोणत्याही कठीण प्रसंगातही आपण तरुन जाऊ शकतो, असा ठाम विश्वास मयूर यांना आहे.

नृत्यातील अलंकार पदवी मिळविल्यानंतर मयूरच्या करिअरला सुरुवात झाली. गुरू आशाताई यांनी त्यांना प्रशांत नांदगावकर यांना भेटायला जा सांगितले. खासगी आल्बमसाठी त्यांनी काही गाणी केली होती. तेव्हा नवोदित असलेल्या स्वप्निल बांदोडकर यांच्यावर त्या गाण्यांचे चित्रीकरण होणार होते आणि त्या गाण्यांसाठी नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी मयूर यांना मिळाली. त्यानंतर पुढे मयूर यांना अनेक संधी मिळत गेल्या आणि त्याचे चीज त्यांनी केले. मयूर यांनी लोकनृत्य, रशियन बॅले यांचेही शिक्षण घेतले आहे. वेगवेगळ्या नृत्य कार्यशाळेतूनही त्यांनी सहभाग घेतला आहे. ज्येष्ठ नृत्यगुरू पं. बिरजू महाराज यांच्या कार्यक्रमातूनही ते सहभागी झाले आहेत. ‘नटरंगी नार’, ‘इथं हवंय कुणाला प्रेम’, ‘सख्या सजणा’, ‘जादू तेरी नजर’, ‘वन टू का फोर’, ‘दिवसा तू रात्री मी’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘लव्ह स्टोरी’, ‘पुन्हा सही रे सही’ आदी ‘सुयोग’च्या नाटकांसाठी तसेच  ‘संभवामी युगे युगे’या महानाटय़ासाठी, काही गुजराथी आणि इंग्रजी रंगभूमीसाठी आणि ‘सावरिया डॉट कॉम’, ‘रणभूमी’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘बाय गो बाय’ आदी चित्रपटांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. एक कोंकणी आणि एक हिंदूी चित्रपटही त्यांच्या नावावर आहे. विविध पुरस्कार सोहळे, कार्यक्रम, दूरचित्रवाहिन्यांवरील जाहिराती, फॅशन शो, खासगी मराठी, गुजराथी आल्बम आणि ‘माझे जीवन गाणे’, ‘शब्द सुरांची नाती’, ‘स्वर संग्राम’ आदी रिअ‍ॅलिटी शो साठीही नृत्य दिग्दर्शक म्हणून आपली मोहर उमटविली आहे. ‘ढोलकीच्या तालावर’, ‘दम दमा दम’, ‘छोटे चॅम्पियन’, ‘एका पेक्षा एक-अप्सरा आली’, ‘एका पेक्षा एक-जोडीचा मामला’ या दूरचित्रवाहिन्यांवरील रिअ‍ॅलीटी शोसाठी परीक्षक म्हणूनही मयूर यांनी काम केले आहे.

जे घडून गेले त्याचा विचार करायचा नाही. जे झाले ते झाले. त्यापेक्षा उद्या आपल्याला काय करायचे आहे, काय करता येईल त्याचा विचार मी जास्त करतो. नृत्य आणि नृत्य हाच माझा श्वास आणि ध्यास असल्याचे मयूर यांनी सांगितले.

नृत्यकलाच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात मिळणारी प्रसिद्धी, यश, पैसा पाहून या क्षेत्रात येऊ नका. तर पूर्णपणे झोकून देऊन, आपले गुरू आणि कला यावर निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे काम करा. स्वत:वर, स्वत:च्या कलेवर आणि गुरूंवर श्रद्धा ठेवा. तुमची जिद्द, खडतर मेहनतच तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल. पहिल्यांदा सेवा करा आणि मग मेवा खा, असा सल्लाही त्यांनी या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना दिला.

शेखर जोशी

shekhar.joshi@expressindia.com