News Flash

एमपीएससी मंत्र : भारतीय राज्यव्यवस्था (विश्लेषणात्मक अभ्यास)

या लेखामध्ये भारतीय राज्यव्यवस्था व प्रशासनातील विश्लेषणात्मक व गतिशील मुद्दे यांच्या अभ्यासाचे धोरण कसे असावे ते पाहू.

(संग्रहित छायाचित्र)

फारूक नाईकवाडे

भारतीय राज्यव्यवस्था घटकाच्या मूलभूत आणि संकल्पनात्मक भागाच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये भारतीय राज्यव्यवस्था व प्रशासनातील विश्लेषणात्मक व गतिशील मुद्दे यांच्या अभ्यासाचे धोरण कसे असावे ते पाहू.

राजकीय यंत्रणा – कार्यकारी घटक

यामध्ये प्रत्यक्ष प्रशासन व शासन धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा व त्यासंबंधी विविध घटकांचा समावेश होतो. संकल्पनात्मक भाग समजून घेतल्यावर स्थानिक शासनाच्या अंमलबजावणीतील अडचणी या वृत्तपत्रीय लेख, वृत्तवाहिन्यांवरील चर्चा यांमधून समजून घ्याव्यात. प्रमुख नागरी व ग्रामीण विकास योजना किंवा कार्यक्रमांचा टेबलमध्ये अभ्यास पेपर ४ मध्येही करता येईल.

कायद्याचे राज्य, प्रशासकीय स्वेच्छानिर्णय, नसíगक न्यायाचे तत्त्व या संकल्पना वेगवेगळ्या उदाहरणांच्या मदतीने समजून घेता येतील. प्रशासनिक न्यायाधिकरणे, त्यांची रचना, स्वरूप, काय्रे, अधिकार, केंद्र व राज्य शासनाचे विशेषाधिकार व त्याबाबतची साक्षीपुरावा कायद्यामधील कलमे (१२३ व १२४) या तथ्यात्मक बाबी लक्षात ठेवतानाच याबाबत चिंतन व विश्लेषण करणे गरजेचे आहे.

राजकीय यंत्रणा – गतिशील घटक निवडणूक प्रक्रिया

राजकीय पक्षांच्या कामगिरीचा अभ्यास निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणूनच करणे व्यवहार्य ठरेल. केंद्रीय निवडणूक आयोगाची रचना, सदस्यत्वासाठीचे निकष, आयोगाची काय्रे, अधिकार इत्यादी तथ्यात्मक बाबी लक्षात असायला हव्यात. आयोगाची वाटचाल, आजवरचे निर्णय, नियम या बाबींचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे गरजेचे आहे. राज्य निवडणूक आयोगाबाबतही या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य शासनाचे महत्त्वाचे निर्णय समजून घ्यावेत.

आदर्श आचारसंहिता, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर या संबंधांतील ठळक घडामोडींचा आढावा घ्यावा. निवडणुकांच्या काळात या बाबींवर जास्त भर देणे अपेक्षित आहे. मतदारावर प्रभाव टाकणारे घटक, आयोगासमोरील समस्या या बाबींवर वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यातून होणाऱ्या चर्चा या आधारे स्वत:चे विश्लेषण व चिंतन करणे गरजेचे आहे.

राजकीय पक्ष आणि दबाव गट    

राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठीचे निकष, यामध्ये झालेले बदल, पक्षांचे वित्तीय व्यवहार इत्यादी मुद्दय़ांचा विचार करावा. राष्ट्रीय पक्षांची स्थापना, संस्थापक, अजेंडा, त्यांच्या वाटचालीतील ठळक टप्पे, महत्त्वाच्या घटना व मुद्दे या आधारावर ६ राष्ट्रीय पक्षांचा अभ्यास करावा. सर्व राष्ट्रीय पक्ष व ठळक / महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष यांचे नेते, निवडणूक चिन्ह, प्रभाव क्षेत्रे यांचा आढावा घ्यायला हवा व टेबलमध्ये त्यांच्या नोट्स काढाव्यात. महाराष्ट्रातील मुख्य प्रादेशिक पक्षांबाबत पक्षांचा अजेंडा, निवडणुकांमधील कामगिरी, प्रभाव क्षेत्र, महत्त्वाचे नेते, वाटचालीतील ठळक टप्पे व सद्य:स्थिती या बाबी व्यवस्थित समजून घ्याव्यात.

राजकीय पक्ष आणि दबाव गट (pressure groups) यांमधील फरक व्यवस्थित समजून घ्यावा. दबाव गटांचे प्रकार व त्यांचे हितसंबंध समजून घेणे आवश्यक आहे. देशातील व महाराष्ट्रातील महत्त्वाचे व प्रभावी दबावगट माहीत असायला हवेत. त्यांचे अध्यक्ष, स्थापनेचा हेतू, कार्यपद्धती, लक्षणीय कामगिरी इत्यादी बाबी लक्षात घ्यायला हव्यात.

शिक्षण

शिक्षणाबाबतच्या समस्या, कारणे, उपाय हा पेपर ३ चाही भाग आहे. तर जागतिकीकरण व शिक्षणविषयक योजना हा पेपर ४ चा भाग आहे. शिक्षणविषयक आयोग व समित्यांचा आधुनिक भारताच्या इतिहासातील भागही अभ्यासायचा आहे. त्यामुळे या घटकाचा त्या त्या पेपरशी संबंधित मुद्दय़ांबाबतच्या संकल्पना त्या त्या पेपरच्या अभ्यासामध्ये समजून घेणे सोयीचेही आहे व त्यामुळे त्या संकल्पना नीट समजूनही घेता येतील. यामुळे वेळही वाचेल.

या घटकातील मुद्दे मुख्य परीक्षेच्या सर्व पेपर्सवर Overlap होतात. मात्र ‘शिक्षण’ हा विषय मनुष्यबळ विकासाशी जास्त सुसंबद्ध असल्याने याचा अभ्यास पेपर ३ च्या अभ्यासाबरोबर केल्यास जास्त व्यवहार्य ठरेल. अभ्यास कोणत्याही विषयाचा घटक म्हणून केला तरी परीक्षेच्या कालखंडात पेपर २, ३ व ४ या तिन्ही पेपर्सच्या वेळी या विभागाची उजळणी करणे आवश्यक ठरेल.

उपरोक्त संपूर्ण भाग व्यापक संकल्पना, तथ्ये व त्यांच्या विश्लेषणाचा आहे. संकल्पना समजून घेणे, तथ्ये लक्षात ठेवणे व आजवरच्या ठळक घटना तसेच संबंधित चालू घडामोडी यांच्या आधारे विश्लेषण करणे या प्रकारे या भागाचा अभ्यास करावा लागेल. राज्यव्यवस्था घटकाच्या तयारीची चर्चा आतापर्यंत करण्यात आली. पुढील लेखामध्ये समर्पक कायदे या घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2018 1:25 am

Web Title: mpsc mantra useful article
Next Stories
1 ‘प्रयोग’ शाळा : अक्षर मशागत
2 संशोधनाचे पक्के रस्ते 
3 राज्यव्यवस्था : मूलभूत व संकल्पनात्मक अभ्यास
Just Now!
X