News Flash

पशुसंवर्धन शास्त्रातील संधी

हजारो वर्षांपासून पशुसंवर्धन व्यवसाय हा शेती व्यवसायाला पूरक म्हणून केला जातो. आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी पूर्वीपासूनच हे एक उपजीविकेचे साधन राहिले आहे.

| May 19, 2014 01:02 am

हजारो वर्षांपासून पशुसंवर्धन व्यवसाय हा शेती व्यवसायाला पूरक म्हणून केला जातो. आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी पूर्वीपासूनच हे एक उपजीविकेचे साधन राहिले आहे. गेल्या काही वर्षांत मात्र हे क्षेत्र एक स्वतंत्र उद्योगक्षेत्र म्हणून उदयाला येत आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक नव्या संधी या कार्यक्षेत्रात निर्माण झाल्या आहेत, मात्र त्यासाठी उमेदवाराकडे योग्य प्रशिक्षण आणि पुरेसा अनुभव गाठीशी असणे आवश्यक ठरते.
पशुसंवर्धन विषयातील पदवी तुम्हाला पशुधन आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या प्राणिज उद्योगाच्या निरनिराळ्या अंगांची ओळख करून देते. हे शिक्षण प्राप्त केलेले विद्यार्थी दुग्धशाळा, अश्वशाळा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करू शकतात तसेच पशुधनाचा व्यापारही करू शकतात. पाळीव प्राणीपालन, पाळीव प्राण्यांची पैदास आणि त्यांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल सखोल आणि र्सवकष ज्ञान पशुसंवर्धन शिक्षणक्रमातून मिळतेच, मात्र त्याचबरोबर शिकताना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता आला तर या व्यवसायातील खाचाखोचा अधिक बारकाईने समजून घेता येतील.
पशुसंवर्धन ही संज्ञा गाय, शेळी, बकरी, कोंबडय़ा, डुकरे आणि घोडे आदी पाळीव प्राण्यांना लागू होते. या पशुधनाची दैनंदिन निगा राखणे, त्यांना चारापाणी पुरवणे, प्राण्यांच्या राहण्याची जागा स्वच्छ ठेवणे, प्राण्यांच्या नवजात पिल्लांची योग्य काळजी घेणे, कत्तलीसाठी किंवा गुरांच्या बाजारात विक्रीसाठी उपयोगात येणाऱ्या प्राण्यांचे आवश्यकतेनुसार पोषण करणे अशा अनेक कामांचा यात समावेश होतो. यातील आणखी एक कठीण काम म्हणजे पाळलेल्या गुरांना कोणत्याही संसर्गजन्य आजारांपासून दूर ठेवणे आणि आजारी गुरांवर योग्य ते वैद्यकीय उपचार करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे.
खरे पाहता पशुपालनातील बरीचशी कामे ‘रँच हँड्लर’च करतो. याव्यतिरिक्त त्या व्यक्तीला अनेक गोष्टी कराव्या लागतात. दूरदर्शन किंवा सिनेमांतून दिसणारे पशुपालन हे कितीही आकर्षक वाटले तरी प्रत्यक्षात मात्र, पशुपालनाच्या कामात अनेक जबाबदाऱ्या अंतर्भूत असतात. सर्वाना माहिती असलेले आणि त्याबद्दल उत्सुकता, आवड असलेले पशुपालनाचे काम रांगडय़ा स्वरूपाचे आहे. यासाठी कामाचा अनुभव तर हवाच, पण प्राण्यांशी जवळीक साधण्याचे तंत्रही जमायला हवे.
या व्यक्तींना पशुपालनाशी संलग्न अशी अनेक कामे करावी लागतात. मुख्य म्हणजे पशुपालन प्रकल्पाला भेट देणाऱ्या अभ्यागतांना मार्गदर्शन करावे लागते. व्यावसायिकरीत्या पशुपालन करताना निरनिराळी कौशल्ये अवगत असलेल्या अनेक व्यक्तींची गरज भासते.  घोडेपालनाचे काम करणाऱ्या व्यक्तींना बव्हंशी खेडवळ जागी काम करावे लागते, मात्र अन्य पशुपालनातील कामाच्या जागा शहरी वातावरणातही असू शकतात. स्वयंरोजगार म्हणून तसेच ग्राहकांचा ओढा स्थानिक आणि जैविक खाण्याकडे वाढत असल्याने कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, बकरीपालन असे कमी जागेत शक्य असणारे व्यवसाय करण्याकडे छोटय़ा व्यावसायिकांचा कल वाढत आहे.
संशोधकांच्या मते, ‘अॅनिमल बिहेविअरिस्ट’ व्यक्तींना  पाळीव प्राण्यांच्या वर्तनात निरनिराळे प्रयोग करून काही महत्त्वपूर्ण वैज्ञानिक निष्कर्ष किंवा सत्य शोधण्याचे काम जमणे आवश्यक आहे. या गोष्टींचा उपयोग प्राण्यांना योग्य प्रकारे वाढवण्यासाठी तसेच प्राण्यांची काळजी घेण्यासाठी होतो. ‘अॅनिमल बिहेविअरिस्ट’ व्यक्तींना पाळीव प्राण्यांबद्दल आपुलकी, प्रेम वाटणे गरजेचे आहे. प्राण्यांची कोणतीही वेगळी हालचाल त्यांच्या नजरेला टिपता आली पाहिजे. त्यामागील कारणही शोधता यायला हवे. प्राण्यांची देखभाल, आरोग्याची काळजी याबाबतीत जर काही त्रुटी असतील तर त्यात वेळीच बदल करण्याची जबाबदारीही त्यांना घेता यायला हवी.
अॅनिमल न्युट्रिशनिस्ट
प्राण्यांचे योग्य तऱ्हेने पोषण होऊन त्यांच्या प्रकृतीत जोमाने वाढ होणे हे अॅनिमल न्युट्रिशनिस्ट या व्यावसायिकाचे मुख्य ध्येय असते. प्राण्यांच्या वाढीची तसेच इतर आरोग्य लक्षणे पाहून त्यांना कोणकोणत्या प्रकारचा आहार दिवसातून किती वेळा देणे आवश्यक आहे, हे ठरवले जाते. अॅनिमल न्युट्रिशनिस्टना विज्ञान आणि जैवविज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कोणत्या पोषणमूल्यांमुळे प्राण्यांच्या वाढीवर कोणता परिणाम होतो, याची जाण त्यांना असणे गरजेचे आहे. प्राण्यांच्या आहार योजनेत सतत प्रयोग करून या व्यावसायिकांना एका ठोस निष्कर्षांपर्यंत पोहोचता यायला हवे. प्राण्यांच्या मोठय़ा समूहातील प्रत्येकाच्या तब्येतीचे वेगळेपण लक्षात घेऊन प्रभावी आहारयोजना करता येणे आवश्यक असते.
प्राणी संशोधक
डेअरी सायंटिस्ट, पोल्ट्री सायंटिस्ट, अॅनिमल ब्रीडर्स आणि याच क्षेत्रातील इतर अॅनिमल सायंटिस्ट हे पाळीव शेतकी प्राण्यांचे अनुवंशशास्त्र, पोषण, प्रजोत्पादन आणि वाढ यांचा अभ्यास करतात. पशुपालन उद्योगातून उत्पादने (मटण, अंडी, दूध) मिळविण्याच्या अधिकाधिक सक्षम, योग्य पद्धती शोधण्याचे काम या क्षेत्रातील संशोधक करतात. काही अॅनिमल सायंटिस्ट पशुखाद्याच्या दर्जा तपासणीचे आणि काम करतात, तर काहीजण शेतकी उद्योगातील व्यावसायिकांना पाळीव प्राण्यांच्या निवासव्यवस्थेतील सुधारणा, प्राण्यांमधील मृत्युदर कमी करणे, प्राण्यांनी उत्सर्जित केलेल्या मलमूत्राची योग्य विल्हेवाट, तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ करण्याबद्दल मार्गदर्शन करतात.
प्राणी प्रशिक्षक
रक्षणासाठी, घोडेस्वारीसाठी, अपंग किंवा वयोवृद्ध लोकांना मदतनीस अशा वेगवेगळ्या उद्देशांकरिता या व्यवसायातील व्यक्ती प्राण्यांना शिकवून सक्षम बनवतात. मनुष्याच्या आवाजाशी आणि स्पर्शाशी प्राण्यांची ओळख करून देतात आणि दिलेल्या आज्ञेला प्रतिसाद देण्यास शिकवतात. माणसाळवून ज्यांना शिकवले जाते ते प्राणी म्हणजे कुत्रे, घोडे आणि डॉल्फिनसारखे समुद्री सस्तन प्राणी. प्राण्यांना शिकवण्यासाठी प्रशिक्षकांना बरीच वेगवेगळी तंत्रे, युक्त्या यांचा वापर करावा लागतो. सध्याच्या नवीन पद्धतीनुसार, प्राण्यांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या कर्मचारीवर्गाशी त्यांना सहकार्याने वागण्यास शिकवले जाते. म्हणूनच मग प्राणी प्राण्यांच्या  डॉक्टरला आरोग्य तपासणीत लक्षणीय सहकार्य करताना आढळतात. उदा. रक्त तपासणीसाठी रक्त देणे, एक्स-रे, अल्ट्रासॉनिक आणि दंत परीक्षा वैगरे.
एम्ब्रयोलॉजिस्ट
या व्यक्ती प्राण्यांच्या अंडय़ाचा अभ्यास करतात आणि अंडय़ातील एम्ब्रयोची वाढ व प्रजोत्पादक कोशिकांचे एकत्रीकरण अभ्यासतात. या वाढीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करतात. याचबरोबर एम्ब्रयोच्या अस्वाभाविक वाढीच्या कारणांचा अभ्यास करतात.
अनुवंशशास्त्रज्ञ
हे शास्त्रज्ञ रेण्वीय अनुवंशशास्त्रज्ञ जनुकांचा अभ्यास करतात. यातीलच पॉप्युलेशन जेनेटिस्ट या विषयाची व्याप्ती जीवशास्त्रापासून प्रयोगशाळांतील तपासण्या, मॅथेमॅटिकल मॉडेल बिल्िंडग आणि कॉम्प्युटर सिम्युलेशनपर्यंत विस्तारलेली आहे.
पशुमांस शास्त्रज्ञ
हे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती मांस प्रक्रिया उद्योग, विद्यापीठे यांतून खाद्यपदार्थ निर्मिती आणि सुधारणा यावर सातत्याने संशोधनाचे काम करतात. पशुमांस शास्त्रज्ञ हे रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि विज्ञानाच्या इतर शाखांतील ज्ञानाचा उपयोग करून पशुमांस टिकवणे, प्रक्रिया, वेष्टनीकरण, साठवण यांच्या नवनवीन पद्धती शोधण्याचे काम करतात. या पद्धती औद्योगिक आणि सरकारी नियमांनुसार असल्याची दक्षता घेतली जाते. पशुमांसाचा दर्जा आणि ग्राहकांचे समाधान या दृष्टीने संशोधन केले जाते.
पशुचिकित्सा तंत्रज्ञ
या व्यक्ती प्राण्यांच्या रोगाचे निदान करण्याच्या कामात मदत करतात आणि परवानाधारक पशुचिकित्सकाच्या हाताखाली काम करतात. प्राण्यांच्या वैद्यकीय तपासण्या, मूत्रचिकित्सा, रक्त तपासणी, दंत सुरक्षा, टिश्यू सॅम्पल, रक्ताची चाचणी, पशुचिकित्सकांना त्यांच्या कामात मदत करणे आदी कामांचा यात समावेश असतो. काही पशुचिकित्सा तंत्रज्ञ हे आजारी प्राण्याच्या पूर्वीच्या आजारांची नोंद ठेवतात. एक्स-रे आणि रेडिओग्राफ काढण्याचेही काम करतात, आजारी प्राण्याची शुश्रूषाही करतात. काही अनुभवी तंत्रज्ञ, लहान पाळीव प्राणी आणि मोठय़ा प्राण्यांच्या आरोग्याच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी मदत करू शकतात.  
युवावर्गाने विविध करिअर संधी आणि रोजगार क्षमता असलेल्या पशुसंवर्धनासारख्या उद्योगक्षेत्राचा विचार नक्की करायला हवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 1:02 am

Web Title: opportunities in animal science
Next Stories
1 आयुष्य परिपूर्ण करण्यापेक्षा अधिक साहसी बनवा!
2 एमपीएससी (मुख्य) परीक्षा दूरसंवेदन
3 घटनात्मक प्रक्रिया व कारभार प्रक्रियेतील समकालीन घटकांची तयारी
Just Now!
X