‘‘जेव्हा शेवटी मी एखादा परिणाम मिळवण्यायोग्य आहे असे ठरवतो तेव्हा मी त्यावर काम करणे सुरू करतो आणि तो परिणाम मिळेपर्यंत एकापाठोपाठ एक प्रयत्न करत राहतो.’’
– थॉमस एडिसन.
काही वर्षांपूर्वी कान्सास शहरातील मेनिन्जर इन्स्टिटय़ूटने एकविसाव्या शतकात यश आणि आनंदासाठी असे कोणते गुण महत्त्वपूर्ण आहेत, हे निश्चित करण्यासाठी एक सर्वेक्षण केले. व्यापक संशोधनानंतर त्यांनी असा निष्कर्ष काढला की, वेगाने बदल होणाऱ्या या काळात तुम्ही विकसित करावा असा गुण आहे, तो म्हणजे लवचिकता.
लवचिकतेच्या विरुद्ध असतो ताठरपणा. नवीन माहिती आणि परिस्थितीनुसार बदलण्याबाबतची अनिच्छा. लवचिक विचारांच्या विरुद्ध आहे पक्की किंवा यांत्रिक विचारसरणी. मोकळय़ा मनाने आयुष्याला सामोरे जाण्याच्या विरुद्ध आहे, प्रत्येक परिस्थितीला स्वयंचलितपणे आणि आधीच अंदाज करता येईल अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणे. म्हणूनच तुम्हाला जर सरासरी कुवतीच्या व्यक्तीपेक्षा जास्त काही बनायचं, करायचं किंवा हवं असेल तर लवचीकतेचा गुण मूलभूत आहे.
परिवर्तनाचा वेग हा आज तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारा बहुधा सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. मानवी इतिहासात पूर्वी कधीही झालं नसेल इतक्या वेगाने घडणाऱ्या युगात आपण जगत आहोत. आणि परिवर्तनाच वेग वर्षांगणिक वाढतच आहे.
आज होणारे परिवर्तन हे फक्त वेगवानच नाही, तर खंडितही आहे. ते सरळ रेषेत होत नाही. ते सुरू होते, थांबते आणि अंदाज वर्तवता न येण्यासारख्या दिशेने जात आहे. परिवर्तन आपल्याकडे सर्व बाजूंनी आणि इतक्या वेगवेगळय़ा प्रकारांनी येत आहे की, पुढे काय होईल याचा अंदाज बांधणे बहुतेक वेळा अशक्य ठरत आहे.
गोल्स – ब्रायन ट्रेसी, अनुवाद – गीतांजली गीते, साकेत प्रकाशन,
पृष्ठे – २५६, मूल्य – २२५ रु.