बहुतेक सर्वच कर्मचाऱ्यांना बढतीची आकांक्षा असते. कर्तबगार कर्मचारी अनुभव, कसब व ज्ञान वाढेल तसे विकसित होतातच, पण साऱ्यांनाच बढती (प्रमोशन) मिळत नाही. कारण जसजसा कर्मचारी वरच्या हुद्दय़ांवर जातो तसतशी वरच्या अधिकाऱ्यांची संख्या कमी होत जाते. वरच्या हुद्दय़ांची संख्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते.
कारखान्यात आठ ते २० कामगारांवर एक पर्यवेक्षक  असतो तर कार्यालयांमध्ये एक अधिकारी चार ते आठजणांच्या कामावर देखरेख करतो. वरच्या दर्जाच्या व्यवस्थापकांना दोन ते चार उपव्यवस्थापकांच्या कामावर देखरेख करावी लागते.
बढती म्हणजे जास्त पगार व सवलत, वरचा हुद्दा, अधिक जबाबदारी व अधिकार म्हणून महत्त्वाकांक्षी कर्मचारी बढतीसाठी आपली क्षमता वाढवतात. वरच्या हुद्दय़ासाठी आवश्यक ते गुण जोपासतात.
त्यासाठी अष्टपैलूपणा वाढवावा लागतो. तुम्ही ज्यांच्यावर देखरेख करणार त्या साऱ्यांची कामे तुम्हाला व्यवस्थित करता आली पाहिजेत. तुम्ही कारखान्यात यंत्र चालवत असाल तर भविष्यातील तुमच्या कनिष्ठांची यंत्रे चालवता यायला हवीत. तुम्ही इतरांना ती यंत्रे चालवायला शिकवू शकलात तर दुधात साखर.
तीच गोष्ट कॉर्पोरेट कार्यालयांची. एखादा कर्मचारी अनुपस्थित असेल तर पर्यवेक्षकाला एखाद्या प्रशिक्षणार्थीला (ट्रेनीला) शिकवून त्याच्याकडून अनुपस्थिताचे काम करवून घेता यायला हवे.
बँकिंग क्षेत्रात तर पदोन्नतीच्या परीक्षा देऊन ज्ञान वाढवल्याशिवाय बढती अशक्यच. जवळजवळ साऱ्याच पांढरपेशा क्षेत्रांत संगणक (कॉम्प्युटर) वापर आता अटळ झाला आहे. तेव्हा  यासंबंधित एखादा चांगला अभ्यासक्रम पूर्ण करून संगणक वापरायला शिका.
सहसा बढतीनंतर तुम्हाला कनिष्ठांच्या कामावर देखरेख करावी लागते. तेव्हा पर्यवेक्षणाचा किंवा व्यवस्थापनाचा एखादा छोटा-मोठा अभ्यासक्रम पूर्ण करा. त्याने तुमचे पर्यवेक्षण कौशल्य निश्चित वाढेल.
थोडक्यात, मुद्देसूद, बोलायला शिका. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाण्यापूर्वी त्यांना काय सांगायचे यावर विचार करा. तुमचे म्हणणे तीन-चार वाक्यांत सांगायला शिका. वरिष्ठ काय प्रश्न विचारतील, याचा विचार व त्यांच्या संभवनीय प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा. तुमच्या साहेबाचा वेळ दवडू नका.
तुमच्या वरिष्ठाला तुम्हाला बढती देण्यासाठी प्रेरित करण्यासाठी वरिष्ठ करतात, ती कामे शिका. आपले काम वेळेत आटोपून अधिकची काम करण्याची तयारी दाखवा. ते काम शिकण्याची उत्कट इच्छा दाखवा. आवश्यक वाटल्यास त्यासाठी तुमची कामाची वेळ संपल्यावर थांबा व वरिष्ठ करतात ती सारी कामे शिका. तुमच्या वरिष्ठांच्या अनुपस्थितीत त्यांची कामे करण्याची तयारी दाखवा. तुम्ही वरिष्ठाची कामे व्यवस्थित करू शकता, याची त्यांना खात्री झाली की, तुमची बढतीची तयारी जवळपास पूर्ण झाली.
तुम्हाला बढती हवी असेल तर थोडाफार अधिक वेळ काम करायची तयारी हवी. घडय़ाळाच्या काटय़ांकडे पाहून काम करता येणार नाही.
कारखान्यात काम करणाऱ्यांना पाळी संपल्याचा भोंगा वाजताच यंत्र बंद करून घरी जाता येते. पण देखरेख करणाऱ्या पर्यवेक्षकाला दिवसभरात किती काम झाले, याचा अहवाल (रिपोर्ट) तयार करावा लागतो. यंत्रालयात शिफ्टमध्ये काम चालत असेल तर पुढच्या पाळीच्या पर्यवेक्षकाला कामाची स्थिती व पुढचे नियोजन  समजावून सांगावे लागतात. तसेच पुढच्या पाळीच्या पर्यवेक्षकाला पाळी सुरू व्हायच्या थोडे अगोदर येऊन पुढे काय काम करायचे हे समजावून घ्यावे लागते.
कचेऱ्यांतसुद्धा पर्यवेक्षकाला दिवसभरात झालेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी व पुढच्या कामाच्या नियोजनासाठी कामाची वेळ संपल्यावर अर्धा तास तरी थांबावे लागते. तुम्ही जर संस्थेला थोडाफार जास्त वेळ देऊ शकत नसाल तर बढतीची आशा करू नका.
संस्था तुम्हाला वरिष्ठाला कामात मदत करण्यासाठी वेतन देते. त्यालाच तुमच्या कामाची दखल घेण्याचा अधिकार असतो. वरिष्ठाला तुम्ही व तुमचे काम आवडल्याशिवाय तुम्हाला बढती मिळणे अशक्यच.
अधिकाऱ्यांच्या सूचना लक्षपूर्वक ऐका. मीटिंगच्या वेळेस त्यातील महत्त्वाचे मुद्दे टिपण्यासाठी पेन व वही बाळगा. सर्वाचेच स्मिताने स्वागत करून तुमची सदिच्छा प्रकट करा.
बढती मिळवण्याचे तंत्र आत्मसात केल्यावर तुमचा प्रगतीचा वेग वाढेल. तरी तुमच्या क्षमतेची मर्यादा ओलांडू नका. नाही तर विफलतेला तोंड द्यावे लागेल.
जसजसा कर्तबगार माणूस पुढे जातो तसतसे त्याच्या हाताखालचे लोकही पुढे सरकतात. मात्र, क्षमतेच्या पल्याड गेल्यावर नेत्याची प्रगती कुंठते. अशा वेळेस त्याच्या कनिष्ठांच्या टीमचीही प्रगती थांबण्याचा संभव असतो.
आपल्या अकार्यक्षमतेच्या जाणिवेने मनात वैफल्य येते. आपले कनिष्ठ, वरिष्ठ व सहकारी आपल्याला तुच्छ लेखतात, या विचाराने मन खिन्न होते.
म्हणून स्वत:च्या क्षमतेच्या मर्यादा ओळखणारे हुशार लोक आपल्या क्षमतेच्या पलीकडची बढती नाकारतात व आपल्या कर्तृत्वाला साजेशा हुद्दय़ावर थांबतात. ते इतरांच्या आदराला मुकत नाहीत. ते सुज्ञतेने आपल्या हाताखालील आपल्यापेक्षा अधिक कर्तृत्ववान कनिष्ठाची दुसऱ्या खात्यात बदली करण्याची शिफारस करून त्याच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करतात. थोडक्यात बढतीसाठी-
१. अष्टपैलू बनून आपली क्षमता वाढवा.
२. संगणकाचे व व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घ्या.
३. संक्षिप्त, मुद्देसूद बोलायला शिका.
४. तुमचे वरिष्ठ अधिकारी करत असलेली कामे शिका.
५. संस्थेला जास्त वेळ द्या.
६. वरिष्ठांचे अनुकरण करा.
७. तुमच्या क्षमतेच्या पलीकडच्या बढत्या नाकारा.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!