23 April 2019

News Flash

शब्दबोध

‘काय वय झालेल्या पोक्त व्यक्तीप्रमाणे बोलत आहेस’

|| डॉ. अमृता इंदुरकर

पोक्त

‘काय वय झालेल्या पोक्त व्यक्तीप्रमाणे बोलत आहेस’ आपल्या अगदी परिचयातले हे वाक्य. या वाक्यातून पोक्त म्हणजे वयस्कर हा प्राथमिक अर्थबोध होतोच. पण केवळ वयाने मोठे असणे म्हणजे पोक्त असे मात्र नाही. पोक्त या शब्दामध्ये वयस्कर या अर्थाची झाक असली तरी अजून बऱ्याच अर्थछटा अंतर्भूत आहेत. म्हणजे वय मोठे असणे हा एकच निकष नाही. मूळ फारसी शब्द ‘पुख्ता’ वरून पोक्त हा शब्द तयार झाला. आजही हिंदी- उर्दूमिश्रित बोलताना ‘बडा ही पुख्ता इन्सान था वो’ असे वाक्य ऐकायला मिळते. फारसीमध्ये ‘पुख्ता’ म्हणजे अनुभवाने पक्व, समजुतदारीने प्रौढ, थोर, मनाने मजबूत, पक्का आणि कोणत्याही परिस्थितीला सदसद्विवेकाने तोंड देण्यास सज्ज असा. इतिहासाचार्य राजवाडेंनी उल्लेख केलेल्या वाक्यावरून हे अधिक स्पष्ट होते – ‘जो मन्सबा करणे तो पोक्ताच करावा.’ शिवाय काही ऐतिहासिक किरकोळ प्रकरणांमध्ये पुढील नोंद आहे- ‘तुम्ही पोख्त; बहुत पाहिलेले असे असोन अशा गोष्टी कशा होऊ  दिल्या?’ वरील दोन्ही वाक्यांवरून एक गोष्ट लक्षात येते की शिवकाळात पोख्त/पोक्त दोन्ही शब्दांचा वापर होता. पण कालांतराने पुख्त/पोख्त हा मराठीतून गळून पडला व पोक्तच रूढ झाला. सुप्रसिद्ध मराठी कवी आरती प्रभूंनी मात्र ही अर्थव्याप्ती लक्षात घेऊन प्रेयसीच्या वर्णनासाठी ‘तू हिरवी -कच्ची, तू पोक्त सच्ची’ अशी चपखल ओळ लिहिली. पोक्त किंवा पोख्तचे स्त्रीलिंगी रूप पोक्तगी/पोख्तगी म्हणजे पक्वता, कायमी असे देखील आहे.

बहर 

मराठी साहित्यातील अतिशय लाडका शब्द म्हणजे बहर. हा शब्द नुसता ऐकला तरी मन आनंदाने, उत्साहाने बहरून आल्याची अनुभूती येते इतका बोलका. समस्त कवींच्या काव्याला बहार आणणारा हा शब्द. फारसीमध्ये बसन्त ऋतूला उद्देशून ‘बसन्त बहार’ असा शब्द आहे. ज्याचा अर्थ आहे हंगाम, विपुलता, तारुण्याचा तजेला, भर (भरास आले याअर्थी) तर केवळ ‘बहार’ शब्दाचा अर्थ मौज, सौंदर्य, कमनीयता असा आहे. यावरूनच फारसीमध्ये सुखी, संपन्न यासाठी ‘बहरामन्द’ असा शब्द आहे.

मराठी काव्याचा काळ लक्षात घेता मात्र हा ‘बहर’ कधी कमी झालाच नाही हे लक्षात येते. ज्ञानेश्वर माऊलींनी देखील आपली सतचित्आनंदावस्था ‘फुले वेचिता बहरू, कळियांसि आला’ अशा शब्दांमधून व्यक्त केली. तर शाहिरी काळात प्रभाकरने ऐन भरात आलेल्या तारुण्याचे ‘रून्द छातीवर बुन्द गेन्द जणू गुलाब बहरामधि फुलती’ असे वर्णन केले. ना. वा. टिळकांनी ‘स्वर्गात दिव्य वृक्षास, बहर ये खास’ अशी कल्पना केली. तर आरती प्रभूंची ‘तू’ बहरांच्या बाहुंची झाली.

amrutaind79@gmail.com

First Published on August 11, 2018 12:26 am

Web Title: the history of marathi world