रा ज्य शासनाच्या तंत्रज्ञान संचालनालयातर्फे राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना २०१३-२०१४ या शैक्षणिक सत्रात तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत-
’    अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील असावेत व ते मुस्लीम, शीख, बुद्धिस्ट, ख्रिस्ती वा पारसी धर्मातील असावेत.
’    अर्जदारांच्या संबंधित परीक्षेच्या गुणांची टक्केवारी ५० टक्क्य़ांहून अधिक असावी.
’    अर्जदारांनी संबंधित कालावधीत अन्य कुठल्याही प्रकारची वा स्वरूपाची शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.
’    अर्जदारांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
योजनेंतर्गत सामील विषय : या योजनेंतर्गत उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी बीई, बीटेक, एमई, एमटेक, सिमेंट टेक्नॉलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी, फार्मसी, टाऊन प्लॅनिंग, हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, अप्लाईड आर्टस्, एमसीए, एमबीए, एमएमएस, आरोग्य विज्ञान, कायदा, पशुवैद्यक, चार्टर्ड अकाऊंटन्सी, कॉस्ट अकाऊंटन्सी, कंपनी सेक्रेटरीशिप यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष सूचना : एकूण उपलब्ध शिष्यवृत्तींपैकी ३० टक्के शिष्यवृत्ती महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.
शिष्यवृत्तीची रक्कम आणि तपशील : योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रम कालावधीत २० हजार रु. शैक्षणिक शुल्कासाठी देण्यात येतील. याशिवाय वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १० हजार रु. इतरांना पाच हजार रु. अतिरिक्त शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येतील.
ज्या विद्यार्थ्यांना वर नमूद केल्यानुसार शिष्यवृत्ती देण्यात येत आहे त्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणासाठी वेगळा अर्ज करावा लागेल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : या शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी राज्य सरकारच्या तंत्रज्ञान संचालनालयाच्या दूरध्वनी क्र. ०२२-२२६१७९६९ वर संपर्क साधावा अथवा तंत्रज्ञान संचालनालयाच्याhttp://www.dte.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख :
संगणकीय पद्धतीने राज्य शासनाच्या www.momascholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१३. राज्यातील सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे अल्पसंख्याक समुदायाच्या पात्रताधारक विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेसह तंत्रज्ञान व व्यवसायविषयक शिक्षण घेण्यासाठी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल.