23 September 2020

News Flash

नेत्रतंत्रज्ञ व्हायचंय?

नेत्रतंत्रज्ञ होण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध अभ्यासक्रम आणि करिअर संधींची सविस्तर माहिती-

| June 16, 2014 01:07 am

नेत्रतंत्रज्ञ होण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध अभ्यासक्रम आणि करिअर संधींची सविस्तर माहिती-
आपल्या देशातील लक्षावधी लोक अंध व डोळ्यासंबंधित विकारांनी बाधित आहेत. याला जबाबदार असलेल्या वेगवेगळ्या कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याकडे असलेली नेत्रतंत्रज्ञांची- अर्थात ऑप्टोमेट्रिस्टची कमतरता. यामुळे देशाच्या ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये अर्हताप्राप्त नेत्रतंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाची आणि उपचारांची मोठी उणीव जनतेला भासते.
अभ्यासक्रम
बॅचलर इन ऑप्टोमेट्री  – बी. ऑप्टोम  हा नेत्रतंत्रज्ञ विद्याशाखेतील चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. यामध्ये सुरुवातीची तीन वर्षे शैक्षणिक असतात तर शेवटचे वर्ष इंटर्नशिप (प्रत्यक्ष कौशल्य सरावाचे) असते. बारावीची परीक्षा विज्ञान विद्याशाखेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित उत्तीर्ण असलेले विद्यार्थी पात्र ठरतात. अध्ययनात इंग्रजी विषयाचा समावेश आवश्यक ठरतो.
डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री – बारावी विज्ञान विद्याशाखेतून पूर्ण केल्यानंतर नेत्रतंत्रज्ञ विद्याशाखेतील डी. ऑप्टोम हा अडीच वर्षांचा अभ्यासक्रम करता येतो. यापैकी सुरुवातीची वर्षे शैक्षणिक असतात आणि त्यानंतर इंटर्नशिप करावी लागते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पीसीएम किंवा पी. सी. बी. यापैकी कोणत्याही ग्रुपचे विषय आवश्यक मानले जातात.
डिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक टेक्निकल असिस्टंट – किमान पात्रता- दहावी शास्त्र विषयासह उत्तीर्ण होणे आवश्यक मानले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी बी. ऑप्टोमच्या प्रथम वर्षांला प्रवेश मिळू शकतो.
मास्टर इन ऑप्टोमेट्री – बी. ऑप्टोम पूर्ण केल्यानंतर हा दोन वर्षांचा पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम आहे. यानंतर तुम्हांला पीएच.डी.सुद्धा करता येते आणि करिअरमध्ये उत्तम यश संपादन करता येते. यानंतर संशोधन क्षेत्रामध्ये तसेच नवनिर्मिती क्षेत्रामध्ये विविध दालने उपलब्ध आहेत.
ऑप्टोमेट्री क्षेत्राचे स्वरूप
ऑप्टोमेट्री हे दृष्टिसंवर्धनाचे एक उत्तम करिअर आहे. देश-विदेशामध्ये उत्तम नोकरीची आणि सन्माननीय पदे या व्यवसायात संपादन करता येतात.
ऑप्टोमेट्री ही डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे तंत्रशुद्ध शिक्षण देणारी विद्याशाखा आहे. यामध्ये दृष्टिचाचणी केली जाते. नेत्रतंत्रज्ञ रुग्णाला त्याच्या दृष्टीबाबत वैद्यकीय आवश्यकतेप्रमाणे व निष्कर्षांनुसार विविध प्रश्न विचारतात. विविध नेत्रतंत्र संसाधनाचा आणि उपकरणांचा उपयोग करून (उदा. अ‍ॅटोरिफ्रॅक्टोमीटर, लेन्सोमीटर, रेटिनोस्कोप) योग्य दृष्टीचा नंबर काढला जातो. आवश्यकतेनुसार, रुग्णांना दृष्टिसंवर्धनाबाबत योग्य मार्गदर्शन केले जाते. याबरोबरच योग्य चष्मा, फ्रेम्स निवडण्यासाठीही मार्गदर्शन केले जाते. महत्त्वाचे म्हणजे चष्म्याचे भिंग निवडण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन फारच मोलाचे ठरते. कॉन्टॅक्ट लेन्सेसची माहिती व आवश्यकतेनुसार त्याचे फिटिंग्ज याबाबतचे प्रशिक्षणही दिले जाते. डोळ्यांच्या विविध आजारांबाबत मार्गदर्शन, योग्य सल्ले व उपचारपद्धतींची माहिती दिली जाते.
एकंदरीत दृष्टिसंवर्धन या महत्त्वाच्या विषयात ऑप्टोमेट्रिस्टस्चे स्थान महत्त्वाचे असून, दृष्टी सुधारण्यासाठीचा नंबर काढण्याबरोबरच या विषयात सर्वागीण मार्गदर्शन आणि समुपदेशन शास्त्रीय ज्ञानाधारित पद्धतीने केले जाते.

करिअर संधी
एक कुशल नेत्रतंत्रज्ञ म्हणून वैद्यक क्षेत्रातील आदर आणि सन्मान प्राप्त होतो. विविध देशी-विदेशी कंपन्यांमध्ये ऑप्टोमेट्रिस्ट म्हणून काम करण्याची आणि या क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी उपलब्ध होते. विविध नामांकित खासगी तथा सरकारी रुग्णालयामध्ये काम करता येते. एम. ऑप्टोमनंतर संशोधन व प्राध्यापक म्हणून नोकरीच्या संधी खुल्या होतात. या क्षेत्रात संशोधन करता येते. ग्रामीण, दुर्गम भागात जाऊन देशबांधवांची सेवा करताना आपले करिअर घडविण्याबरोबरच समाजसेवेचे समाधान तुम्ही प्राप्त करू शकता. स्वत:चे ऑप्टिकल्स शोरूम, रुग्णालय सुरू करून त्यात यश मिळवता येते. आंतरराष्ट्रीय पातळीवर या अभ्यासक्रमाला निरंतर चांगली मागणी आणि सन्मान आहे. म्हणून विदेशात जाऊन विविध पदांवर काम करून सन्मान आणि आर्थिक संपन्नता संपादन करता येते. ऑप्टोमेट्री क्षेत्रामध्ये पीएच.डी. करण्याचीही संधी असते. या क्षेत्रासंबंधित संशोधनाची दिशा निश्चित करून संशोधक म्हणून कारकीर्द घडवता येणे शक्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 1:07 am

Web Title: want to become a optometrist
Next Stories
1 एकांडय़ा शिलेदाराचा वस्तुपाठ
2 शैक्षणिक तंत्रविज्ञानात एम.ए.
3 मुंबई विद्यापीठाचा मराठी पत्रकारिता अभ्यासक्रम
Just Now!
X