स्वाती केतकर- पंडित

विशीबाविशीत आपण काय करतो? तर स्वत:च्या भविष्यासाठी, नोकरीसाठी आपली धडपड सुरू असते; पण याच वयात लातूरच्या गजानन जाधव या तरुण शिक्षकमित्राची धावपळ सुरू होती ती रायगड जिल्ह्य़ातील कातकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी! गजानन यांनी बनवला आहे, मराठी-कातकरी बोलीभाषेतील शब्दकोश.

गजानन जाधव मूळचे लातूरचे. मराठवाडा दुष्काळी भाग. लवकर लवकर शिकून नोकरी पटकवायची आणि कुटुंबाला हातभार लावायचा. या जाणिवेतूनच बारावीनंतर डीएड करून ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागले. २००६ला म्हणजे जेमतेम एकविस वर्षांचे असताना त्यांना पहिली शाळा मिळाली ती रोहा तालुक्यातील पालेखुर्द शाळा. ही शाळा होती, ३०-४० कातकरी घरांच्या वाडीवरची. संपूर्ण आदिवासी समाज. गावात जायला रस्ता नाही. मुख्य रस्त्यापासून दूर दोन किमीवर डोंगरामध्ये शाळा.

गजानन म्हणतात, पहिली दीड-दोन र्वष खरोखरच गोंधळाची गेली. शाळा चौथीपर्यंत, पण खोली एकच. तीच कार्यालयाची खोली नी तीच वर्गखोली. सगळ्या इयत्ता एकत्रच बसायच्या. वस्तीच्या मधोमध ही खोली. मग शिकवता शिकवता पार्श्वसंगीत असायचे ते आसपासच्या झोपडय़ांतील भांडणाचे, पाळीव प्राण्यांच्या आवाजाचे, कोंबडय़ाच्या कलकलाटाचे. सुरुवातीला तर काहीच सुचायचे नाही. त्यात वस्तीतला गोंगाट, त्यांची भांडणे, वागणे या सगळ्याची तर गजानन यांना अगदी सुरुवातीला जराशी भीतीच वाटायची. महत्त्वाचे म्हणजे भाषेची अडचण होती. विद्यार्थी त्यांच्या भाषेत बोलायचे ते गजानन यांना कळायचे नाही आणि गजानन काय शिकवायचे ते विद्यार्थ्यांच्या डोक्यात शिरायचे नाही; पण गजानन यांना हार मानायची नव्हती. त्यांनी सुरुवातीला अभ्यासाच्या सक्तीपेक्षा विद्यार्थ्यांशी दोस्ती केली. कुणाला औषध आणून दे, कुणाला आणखी काही दे, अशा प्रकारे समाजकार्य करत हळूहळू गावात नव्या गुर्जीह्णचा चांगला जम बसू लागला. एकदा तर एका व्यक्तीला साप चावला तेव्हा गजानन यांनी स्वत:च्या गाडीने त्यांना दवाखान्यात नेले. तेव्हापासून तर गावकरी गजानन यांना चांगलेच मानू लागले.

लवकरच गजानन यांच्या लक्षात आले की, प्रमाण मराठीचा हट्ट धरला तर या विद्यार्थ्यांचे शिक्षण काही व्हायचे नाही. मग त्यांनी कातकरी बोलीभाषा शिकून घ्यायला सुरुवात केली. गजानन यांनी विद्यार्थ्यांकडून त्यांची भाषा शिकायला सुरुवात केली आणि पोरांना एकदम भारी वाटू लागले. नवे गुरुजी आपल्याकडून काही शिकताहेत म्हटल्यावर विद्यार्थीही सुखावले. गजानन यांनी या शब्दांचा आणि बोलीचा वापर करून शिकवायला सुरुवात केली आणि त्यामुळे अभूतपूर्व फरक दिसला. आपल्या भाषेतले शिक्षण मुले आनंदाने आणि तल्लख बुद्धीने ग्रहण करू लागली. मग या कातकरी आणि मराठी शब्दांचा एक लहानसा शब्दकोश बनवावा, असे गजानन यांच्या मनात आले नि त्यांनी १०० शब्दांचा एक शब्दकोश सुरुवातीला बनवला. २०११-१२ पर्यंत त्यांनी हा उपक्रम राबवला. दिवसेंदिवस त्यात नव्या शब्दांची भर पडली. गजानन विद्यार्थ्यांना चक्क कातकरी बोलीभाषेतूनच शिकवू लागले. पाठय़पुस्तकातल्या अनेक कथा, लहान धडे, कविता त्यांनी कातकरी बोलीभाषेत रूपांतरित केल्या आणि शिकवू लागले.

swati.pandit@expressindia.com