त्यांची कला फुलली ती त्यांच्या नृत्यातून. जिम्नॅस्टिकसारख्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवल्यानंतर त्या नृत्यकलेकडे वळल्या आणि कलाजगत जिंकून घेतले. अशा गुणी नृत्यांगना म्हणजे फुलवा खामकर.

शाहीर अमर शेख यांची नात आणि लेखक अनिल बर्वे यांची मुलगी या नात्याने कला आणि साहित्याचा वारसा फुलवा यांना घरातूनच मिळाला. फुलवा यांच्या आईनेही भरतनाटय़मचे शिक्षण घेतले होते. शाहीर अमर शेख यांच्या कलापथकात त्यांचा सहभाग असायचा. त्यामुळे नृत्याची आवड फुलवाला घरातूनच मिळाली. बालमोहन शाळेतून दहावी झाल्यानंतर पदवीपर्यंतचे पुढील शिक्षण आर. ए. पोद्दार वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयातून झाले. श्री समर्थ व्यायाम मंदिर येथून जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण त्यांनी विद्यार्थी दशेत घेतले. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धामध्ये त्यांनी जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकाराचे प्रतिनिधित्वही केले. याच क्रीडा प्रकारातील योगदानासाठी त्यांना राज्य शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी नृत्याची आवड जोपासली. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामधून त्या सहभागी व्हायला लागल्या. जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षणाचा वापर नृत्यकलेतही त्या खुबीने करत होत्या. महाविद्यालयीन जीवनानंतर त्यांनी रीतसर नृत्य शिकायला सुरुवात केली. आशाताई जोगळेकर यांच्या अर्चना नृत्यालयात प्रवेश घेतला आणि कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. एकीकडे जिम्नॅस्टिक्सही सुरू होतेच. एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांना अपघात झाला आणि साहजिकच जिम्नॅस्टिक्सवर मर्यादा आल्या. त्या वेळी मग त्यांनी पुढील करिअर नृत्यामध्ये करायचे ठरवले.

महाविद्यालयात असताना ‘बुगी वुगी’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या एका चमूसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले. तसेच त्यांच्या पहिल्या पर्वातल्या त्या विजेत्याही ठरल्या. बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘ताल’ चित्रपटासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण देण्याची संधीही त्यांना मिळाली. या दरम्यान त्यांना पुन्हा एका मोठय़ा अपघाताला सामोरे जावे लागले. त्या काही महिने अंथरुणाला खिळून होत्या. केवळ नृत्य किंवा नृत्य दिग्दर्शिका म्हणून काम करणे, स्पर्धा आणि रिअ‍ॅलिटी शोसाठी नृत्य बसविणे या पलीकडे जाऊन नृत्यकलेचे शिक्षण देणारा अभ्यासक्रम तयार करावा, नृत्य प्रशिक्षण देणारी संस्था सुरू  करावी, असा विचार त्यांच्या मनात आला. हा अभ्यासक्रम तयार करताना त्यात जिम्नॅस्टिक्सलाही कसे प्राधान्य देता येईल याकडेही त्यांनी लक्ष दिले आणि फुलवा स्कूल ऑफ डान्स अ‍ॅण्ड जिम्नॅस्टिक्स या संस्थेची स्थापना केली.

विविध स्पर्धा, नृत्याचे रिअ‍ॅलिटी शो यासाठी त्यांचे नृत्य दिग्दर्शन सुरू  होतेच. नृत्य सादरीकरण आणि नृत्य दिग्दर्शन क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करून या क्षेत्रावर आपली नाममुद्राही उमटविली. गेल्या २० वर्षांहून अधिक काळ त्या या क्षेत्रात आहेत. ‘नटरंग’ चित्रपटापासून चित्रपट नृत्य दिग्दर्शक म्हणून त्यांची सुरुवात झाली. ‘नटरंग’ची सर्व गाणी गाजली, लोकप्रिय ठरली. यामुळे कॅमेऱ्याचे माध्यम आणि त्याचे तंत्र याच्याशीही त्यांची  ओळख झाली. रंगमचावर नृत्य सादर करणे, रंगमंचावरील कार्यक्रमांसाठी नृत्य बसविणे आणि चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शन करणे खूप वेगळे आहे. तो अनुभव त्यांना मिळाला. पुढे ‘झपाटलेला’, ‘पोस्टर गर्ल’, ‘पोस्टकार्ड’, ‘प्रियतमा’, ‘आयडियाची कल्पना’, ‘क्लासमेट’, ‘मितवा’, ‘हंपी’ आदी मराठी चित्रपटासाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शन केले. ‘हॅप्पी न्यू इयर’ या हिंदी चित्रपटासाठी फराह खान यांना साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले. काही पंजाबी चित्रपटांसाठीही नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम पाहिले. वैयक्तिक नृत्य सादरीकरणासाठी त्यांना रंगमंच अधिक भावतो तर नृत्यदिग्दर्शिका म्हणून चित्रपटासाठी काम करायला जास्त आवडते. माहेर आणि सासर दोन्हींकडून या क्षेत्रात काम करण्यासाठी नेहमीच सकारात्मक पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ‘एकापेक्षा एक’, ‘डान्स महाराष्ट्र डान्स’, ‘ढोलकीच्या तालावर’ आदी कार्यक्रमांसाठी त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.

या क्षेत्राविषयी त्या म्हणतात, नृत्यकला क्षेत्रात खूप मोठी स्पर्धा असून दररोज नवीन नृत्यदिग्दर्शक येथे येत असतात. त्यामुळे तुम्हाला स्वत:ला सतत नवीन शिकत राहणे, नवीन नृत्यशैलींचा अभ्यास करणे, या क्षेत्रात नवीन काय चालले आहे त्याची माहिती घेणे आवश्यक ठरते. नवीन तंत्र आणि बदलही तुम्हाला आत्मसात करता आले पाहिजेत. नाहीतर स्पर्धेत टिकाव लागणे कठीण असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. या क्षेत्रात स्वत:शी संघर्ष करून यश-अपयश दोन्हीही पचवावे लागते. येथे मेहनतही प्रचंड आहे. ‘नाही’ ऐकायचीही तयारी असली पाहिजे. नृत्यकलेला उज्ज्वल भविष्य आहे. वैयक्तिक नृत्य सादरकर्ता/कर्ती, नृत्यदिग्दर्शक, नृत्य प्रशिक्षक, विविध स्पर्धा, कॉर्पोरेट इव्हेंट, दूरचित्रवाहिन्यांवरील नृत्यविषयक स्पर्धात्मक कार्यक्रम, लग्नसमारंभातील संगीत-नृत्य आणि इतर बरेच काही या क्षेत्रात करता येण्यासारखे आहे. वेगवेगळ्या नृत्यशैलीपैकी तुम्हाला काय आवडते? तुम्ही काय करू शकता? तुमची क्षमता काय? याचा विचार जरूर करावा असा सल्लाही फुलवा यांनी या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणाईला दिला.

shekhar.joshi@expressindia.com