करिअरमंत्र

दोन्ही परीक्षांमध्ये अतिशय तीव्र स्पर्धा असते.

मी सध्या मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षांला आहे. मला यूपीएससी द्यायची आहे. त्याचा अभ्यास आत्तापासूनच सुरू करू की, इंजिनीअरिंग झाल्यावर त्याचा अभ्यास करू की गेट या परीक्षेची तयारी करू?     

उमेश शिंदे

मित्रा उमेश, नागरी सेवा परीक्षा आणि गेट या दोन्ही परीक्षा अतिशय कठीण आहेत. दोन्ही परीक्षांमध्ये अतिशय तीव्र स्पर्धा असते. त्यामुळे दोन्ही परीक्षेत उत्तम गुण मिळाले तरच चांगली मनाजोगती संधी मिळू शकते. त्यामुळे कोणत्याही एकाच परीक्षेवर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरू शकते. एकाच वेळी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करून तुझी अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी होऊ शकते. कारण या दोन्ही परीक्षांचे उद्देश वेगवेगळे आहेत. गेट परीक्षेतील गुण हे प्रामुख्याने दर्जेदार शिक्षण संस्थांमधील इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी व काही सार्वजनिक कंपन्यांमधील नोकरीसाठी ग्राह्य़ धरले जातात. तर नागरी सेवा परीक्षेतील गुणांमुळे  तुम्हाला थेट उच्च श्रेणीची नोकरी प्राप्त होते. त्यामुळे तुम्हाला नेमका कोणता पर्याय स्वीकारायचा हे निश्चित झाले तर बरे. त्यासाठी तुम्ही तयारीही करू शकता. यूपीएससीसाठी तयारी आत्ताच सुरू करा. नक्कीच फायदा होईल.

 

मला उपजिल्हाधिकारी पद मिळवायचे आहे. त्यासाठी कशा प्रकारे तयारी करावी लागेल?

नंदू धाडसे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेमार्फत विविध अधिकारी पदे भरली जातात. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी पदाचाही समावेश असतो. ही परीक्षा प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत अशी तीन स्तरीय असते. प्राथमिक परीक्षेचा उपयोग हा मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी केला जातो. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित अंतिम निवड केली जाते. प्राथमिक आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीचे प्रश्न विचारलेले असतात. या पेपरचा दर्जा पदवीस्तरीय असतो. या परीक्षेसाठी विस्तृत अभ्यासक्रमानुसार विषयवार यादी आयोगाने तयार केली आहे. ती तुम्हाला आयोगाच्या (www.mpsc.gov.in) या संकेतस्थळावर मिळू शकेल.

 

मी बीएससीच्या द्वितीय वर्षांला असून यानंतर एमपीएससीच्या कोणत्या परीक्षा देता येतील

ललितकुमार देशमुख

उत्तर – तुम्ही पोलीस उपनिरीक्षक/ विक्रीकर निरीक्षक/ साहाय्यक या परीक्षेसोबतच राज्य नागरी सेवेतील उपजिल्हाधिकारी/ उपपोलीस अधीक्षक/ विक्रीकर अधिकारी/ तहसीलदार/ उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांसारख्या पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा देऊ  शकता.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Career guidance