मी मेकॅनिकल इंजिनीयरिंगच्या शेवटच्या वर्षांला आहे. मला नागरी सेवा परीक्षेची (यूपीएस्सी) तयारी मराठीतून करायची आहे. त्यासाठी मला मराठी माध्यमातील कोणत्या पुस्तकांची यादी उपयुक्त ठरेल?

सिद्धेश्वर खडतरे

नागरी सेवा परीक्षा मराठीतून देण्याचा तुझा विचार चांगला आहे. मात्र या परीक्षेसाठी मराठीपेक्षा इंग्रजीमधूनच उत्तम व दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे. त्याचाच वापर करणे संयुक्तिक ठरेल. शिवाय तुला ऐच्छिक विषयही निवडावा लागेल.=

मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेत आहे. मी एमपीएससी देऊ  शकतो का?

सुनील गायकवाड

अनेक जण हा प्रश्न वारंवार विचारत असतात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे इतर अधिकृत विद्यापीठांच्या समकक्ष आहे. या विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेचा दर्जासुद्धा इतर मान्यताप्राप्त विद्यापीठांइतकाच आहे. जेव्हा तुम्ही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तेव्हाच या संस्थेच्या माहितीपुस्तिकेमध्ये ही बाब तुम्ही वाचली असेल. नसेल तर पुन्हा वाचा. त्यामुळे मनात कोणतीही शंका आणू नका आणि एमपीएससीची परीक्षा द्या. इतकेच नव्हे तर तुम्ही सर्व शासकीय स्पर्धा परीक्षासुद्धा देऊ शकता.

मी एक सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. माझ्याकडे २ वर्षांचा अनुभव आहे. पण मला सरकारी नोकरीच करायची इच्छा आहे. त्यासाठी मी नोकरी सोडली आहे. प्रयत्नांना सुरुवातही केली आहे. पण हे सारे कितपत योग्य आहे? मी मन लावून केल्यास वर्षभरात मी ते मिळवू शकेन का? माझ्या क्षेत्रामध्ये सरकारी नोकऱ्या आहेत का?

गणेश कवाळे

राजपत्रित अधिकारी पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेद्वारे दर वर्षी साधारणत: १५० ते २०० वा त्याहून कमी पदे भरली जातात.

प्राथमिक परीक्षेला एक लाखाहून अधिक उमेदवार बसतात. त्यातील १० ते २० हजारांच्या आसपास मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात. यातूनही निम्मे वा त्यापेक्षाही कमी मुलाखतीसाठी निवडले जातात. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांवर आधारित अंतिम निवड केली जाते. या सगळ्या गोष्टींतून या परीक्षेतील स्पर्धा किती प्रचंड आहे, हे तुझ्या लक्षात येईल. ज्यांची निवड होत नाही त्या अनेक उमेदवारांची संधी एक वा दोन अशा गुणांनीसुद्धा हुकलेली असते. त्यामुळे नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सगळे टाळायचे असेल तर आपल्याकडे आपला प्लॅन बी तयार असणे, आवश्यक आहे. उमेदवाराकडे दुय्यम प्रतीची का होईना, रोजगार किंवा नोकरी असायला हवी. ज्यामुळे सगळेच काही संपले नाही, हा विश्वास मिळू शकेल; परंतु जर तुला प्रचंड आत्मविश्वास असेल तर तू एक वर्ष काही न करता केवळ अभ्यास करू शकतोस. संगणक अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या उमेदवारांना राज्यसेवेशिवाय शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये नोकरी मिळू शकते.

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा  career.vruttant@expressindia.com