वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्याच विषयाशी संबंधित पुढील शिक्षण न घेता त्यांची पावले संगीत क्षेत्राकडे वळली. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्रवेश घेऊन त्यांनी संगीतविषयक काही पदविका अभ्यासक्रम पूर्ण केले. खासगी अल्बम, चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांच्या शीर्षकगीतांतून त्यांनी संगीतकार म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली ते नीलेश मोहरीर आजच्या करिअर कथेचे मानकरी आहेत.

मित्रांमुळे, कधी आई-वडिलांनी सांगितले म्हणून, तर कधी समाजमान्यता म्हणून आपण दहावीनंतर कोणत्या क्षेत्राकडे जायचे ते ठरवितो. यात आपल्या स्वत:ला काय वाटते, निवडलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आपल्याला रस आहे की नाही याचा विचार केला जात नाही. त्यामुळे कधी अपयशाला सामोरे जावे लागते, तर कधी शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या चक्रात गुरफटून घ्यावे लागते. आपली आवड बाजूलाच राहते. पदव्युत्तर शिक्षण एका विषयात आणि पुढील करिअर आपल्या आवडत्या आणि मनाजोगत्या क्षेत्रात करण्याचे भाग्य फारच कमी जणांच्या वाटय़ाला येते; पण अशी संधी जेव्हा मिळते तेव्हा काही जण जिद्द, मेहनतीच्या जोरावर त्या संधीचे सोने करतात. संगीतकार नीलेश मोहरीर यांच्याबाबतीतही असेच म्हणता येईल. वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्या विषयाच्या अनुषंगाने पुढील शिक्षण न घेता नीलेश यांची पावले संगीत क्षेत्राकडे वळली. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात त्यांनी प्रवेश घेऊन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. संगीतकार म्हणून खासगी अल्बम, चित्रपटांतील गाणी आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांच्या शीर्षकगीतांतून आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली.

up pharmacy college latest news
पेपरमध्ये लिहिलं ‘जय श्रीराम, पास होऊ देत’, विद्यार्थी ५६ टक्क्यांनी उत्तीर्ण! दोन प्राध्यापकांची झाली गच्छंती
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

विलेपार्ले येथील माधवराव भागवत शाळेत इंग्रजी माध्यमातून त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे म.ल. डहाणूकर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी मिळविली. पदवी प्राप्त केल्यानंतर पुढे याच शाखेत पदव्युत्तर शिक्षणही घेतले. शाळा-महाविद्यालयात असताना स्नेहसंमेलनातून गाणी म्हणणे तसेच संगीतसाथ करण्यात त्यांचा सहभाग असायचा. नीलेश यांच्या घरी वडिलांकडून किंवा आईच्या माहेराहूनही कोणीही कला, संगीत क्षेत्रात नव्हते. त्यामुळे तो वारसा किंवा अमुक कोणी आदर्श नीलेश यांच्या पुढे नव्हता. कला, भाषा यांची आवड असली तरी ते केवळ छंद म्हणून जोपासावेत आणि आपले करिअर विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतूनच करावे, असा एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय समज असतो. तसाच तो नीलेशच्या घरच्यांचाही होता. त्यामुळे दहावी झाल्यानंतर साहजिकच विज्ञान किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन डॉक्टर, अभियंता, सनदी लेखापाल व्हायचे असा घरच्यांचाही सल्ला असल्याने नीलेश यांनी वाणिज्य शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

शाळा-महाविद्यालयात असताना नीलेश गायन आणि वादन करत होते. तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत असताना संगीतकार व्हावे आणि या क्षेत्रातच काम करावे, असा विचार त्यांच्या मनात रुंजी घालू लागला आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संगीत क्षेत्रात काही तरी करावे, असे त्यांनी निश्चय केला. खरे म्हणजे तोपर्यंत त्यांनी गाणेही संगीतबद्ध केले नव्हते किंवा कवितेलाही चालही लावली नव्हती. त्या वयात हिंदूी चित्रपट संगीताने त्यांना झपाटले होते. दूरचित्रवाहिन्यांवरील संगीतविषयक कार्यक्रम पाहणे, हिंदी चित्रपटातील आणि खासगी म्युझिक अल्बमधील गाणी ऐकण्यावर त्यांचा सर्वाधिक भर होता. शाळेत असताना तेव्हा प्रदर्शित झालेल्या ‘रोझा’ चित्रपटातील ए. आर. रहेमान यांच्या संगीतानेही ते भारावून गेले होते. संगीत, गाणे याची ऊर्मी काही स्वस्थ बसू देत नव्हती. संगीत क्षेत्रातच पुढील वाटचाल करण्याचा निर्णय घरी आई-वडिलांना सांगितला. सुरुवातीला त्यांनाही थोडा धक्का बसला; पण एकदा मनाशी ठरविले की तेच करायचे असा नीलेश यांचा स्वभाव घरच्यांनाही माहिती होता. त्याला जिथे आनंद, समाधान मिळेल, त्याच क्षेत्रात तो जाईल हे घरच्यांनाही माहिती होते. त्यामुळे नीलेश यांच्या संगीत क्षेत्राकडे वळण्याच्या निर्णयाला घरच्यांनीही पाठिंबा दिला.

संगीत क्षेत्रात काही तरी करायचे तर त्या विषयाची माहिती आणि ज्ञान असणे आवश्यक होते. त्यामुळे वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षणानंतर संगीत क्षेत्रातील ज्ञान संपादन करण्याच्या उद्देशाने नीलेश यांनी मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातून संगीतविषयक काही पदविका अभ्यासक्रम पूर्ण केले. दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमात नीलेश यांनी संगीतविषयक ज्ञान आणि तांत्रिक माहिती आत्मसात केली. स्टुडिओतील संगीत याचाही अभ्यास केला. त्या दरम्यान गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून तेव्हा उदयोन्मुख असलेल्या आणि आत्ताच्या प्रसिद्ध पाश्र्वगायिका वैशाली सामंत तसेच अन्य काही गायकांना त्यांनी कार्यक्रमातून संगीतसाथही केली.

ध्वनिफीत कंपन्यांसाठी वेगवेगळे खासगी अल्बम संगीतबद्ध करण्यापासून नीलेश यांच्या संगीत कारकीर्दीला सुरुवात झाली. नीलेश यांचे नाव या क्षेत्रत हळूहळू ओळखीचे झाले. ‘यंदा कर्तव्य आहे’ हा संगीतबद्ध केलेला त्यांचा पहिला चित्रपट. ‘आभास हा छळतो तुला’ हे संगीतबद्ध केलेले त्यांचे पहिले गाणे. वैशाली सामंत, राहुल वैद्य यांनी गायलेले आणि अश्विनी शेंडे यांनी लिहिलेले हे गाणे लोकप्रिय झाले. ‘कळत नकळत’ मालिकेच्या शीर्षकगीताने नीलेश यांच्या मालिकांच्या शीर्षकगीतांना संगीतबद्ध करण्यााचा प्रवास सुरू झाला. ‘कळत नकळत’ मालिकेच्या शीर्षकगीतानेही अमाप लोकप्रियता मिळविली. आजवरच्या प्रवासात नीलेश यांनी सुमारे वीस चित्रपट, पन्नासहून अधिक मालिकांची शीर्षकगीते आणि तीसहून अधिक अल्बममधील गाणी संगीतबद्ध केली आहेत.

या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना ते सांगतात, संगीत दिग्दर्शन, संगीत संयोजन, स्टुडिओ ध्वनिमुद्रण आणि याच्याशी संबंधित सर्वच गोष्टींत खूप मोठे बदल झाले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे यात आली आहेत. त्यामुळे सर्वप्रथम तंत्रज्ञानाशी खूप चांगली मैत्री करा. नवे तंत्रज्ञान तुम्ही आत्मसात  केले नाही तर आत्ताच्या काळात या क्षेत्रात निभाव लागणे कठीण जाईल.

जीवनात काही मिळवायचे असेल तर अमुकच क्षेत्रात शिक्षण घेतले आणि करिअर केले तर ते प्रतिष्ठेचे आणि एखाद्या कलेत किंवा संगीत, नृत्य क्षेत्रात काही करायचे ठरविले तर ते प्रतिष्ठेचे किंवा समाजमान्य नाही, असा जो गैरसमज आहे तो सर्वप्रथम बाजूला सारा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला नक्की काय करायचे आहे, आपण काय करू शकतो, याचा विचार करून जो निर्णय घ्याल त्याच्याशी ठाम राहा आणि तुमचा आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करून जीवनातील पुढील वाटचाल सुरू करा, असा मित्रत्वाचा सल्लाही नीलेश यांनी दिला.

shekhar.joshi@expressindia.com