हल्लीची मुले वाचत नाहीत. त्यांना शिक्षणाची गोडी नाही. त्यांना पुस्तकांचा कंटाळा येतो, असे आपण म्हणतो; पण असे होऊ नये यासाठी काय करतो?  मनीषा उगले ही तरुण शिक्षिका मात्र यासाठी नक्कीच प्रयत्न करते आहे. तिच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद शाळा, गुळवंच इथल्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची, भाषेची गोडी लागली आहे.

एखादी भाषा शिकवणे म्हणजे केवळ त्या भाषेचे त्या इयत्तेसाठी ठरवून दिलेले पाठय़पुस्तक शिकवणे नव्हे. भाषेचे विविध पदर, सौंदर्य लक्षात घेत तिची गोडी लागणे, हेच खरे तर मराठीच्या अभ्यासामागचे महत्त्व; पण अनेक शाळांमध्ये नेमके तेच हरवलेले दिसते. मग मराठी हा फक्त ‘कमी गुण देणारा विषय’ बनून जातो. मनीषा उगले या तरुण शिक्षिकेला मात्र भाषेची हेळसांड बघवत नव्हती. तिने ठरवले, आपण आपल्यापरीने जेवढे करू शकतो तेवढे करायचे. त्यासाठी तिच्यासोबत होती, जिल्हा परिषद शाळा गुळवंच इथली बालसेना. मनीषाच्या या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग भरतात. आपल्याला आपली भाषा जितकी गोड वाटते, तितकीच विद्यार्थ्यांना वाटायला हवी, या भावनेतून मनीषाने वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात केली.

duvartanacha vedh marathi book
वर्तन कारणांचे उत्खनन
Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र

सर्वात पहिली अडचण होती ती भाषेचीच. ग्रामीण भागातल्या मुलांची बोलण्याची भाषा आणि लिहिण्याची भाषा वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांना प्रमाण भाषेतून शिकताना, लिहिताना अडचणी येतात. खरे तर त्यांना प्रमाणभाषेची भीतीच वाटते; पण मनीषाने असे बोलीभाषेतले शब्द मराठीच्या तासाला एकत्र केले. आपल्या रोजच्या जगण्यातले, आपल्याला माहिती असलेले शब्द आपल्या बाईंनाही माहिती नाहीत, याची विद्यार्थ्यांना भारी गंमत वाटली आणि त्यांची भीती हळूहळू दूर होऊ लागली. भाषेतील शब्द, गाणी, म्हणी, उखाणे आणि वाक्प्रचार यामुळे भाषेचे सौंदर्य वाढते. विद्यार्थ्यांना त्याची ओळख करून देण्यासाठी मनीषा सतत प्रयत्नशील असते.

अनेक चांगली पुस्तके, त्यातील उतारे, कथा, कविता ती मुद्दामहून वर्गात वाचून दाखवत असते. या साहित्यामध्ये केवळ शहरी साहित्य नसते, तर ग्रामीण साहित्यही असते. आपल्या जगण्यातले शब्द पुस्तकात पाहून विद्यार्थ्यांना आपल्या बोलीबद्दल गोडी वाटते. त्यांचा संकोच दूर होतो.

विद्यार्थी अनेक बडबडगीते, बालगीते म्हणतात. काही पुस्तकातली असतात, तर काही घरीच कुणी तरी शिकवलेली. गावाप्रमाणे, जिल्ह्य़ाप्रमाणे बालगीते, त्यांची भाषा बदलत जाते. यातली अनेक गीते कुठेच लिहिलेली नसतात. ती काळाच्या ओघात नष्ट होऊ नये म्हणून मनीषाने दुसरीतल्या विद्यार्थ्यांसोबत प्रकल्प राबवला. त्यामध्ये मुलांचे काही गट तयार केले. गटातील प्रत्येकाला आपल्या ओळखीच्या प्रत्येकाकडून अशी बालगीते जमवायला सांगितली. आठवडय़ाच्या कालावधीत त्यांनी बरीच गाणी जमवली. या गाण्यांचा ‘कट्टीकट्टी बालबट्टी’ नावाचा पीडीएफ संग्रह मनीषाच्या विद्यार्थ्यांनी तिच्या साहाय्याने बनवला. आता या संग्रहानंतर मनीषाला गावकुसातील गाणी, पारंपरिक गीतांचाही संग्रह करायचा आहे.

सध्या मनीषा राबवत असलेला उपक्रम आहे- अभिवाचनाचा. बरेचदा विद्यार्थी अतिशय रटाळ पद्धतीने वाचन करतात, कारण ‘वाचावे कसे’ याचे प्रत्यक्ष उदाहरण त्यांना कोणी दाखवलेले नसते. मग मनीषाने मुलांच्या वयोगटाला अनुरूप अशा अनेक दर्जेदार कथा, ललितनिबंध आणि नाटय़छटा यांचे अभिवाचन सहकाऱ्यांच्या मदतीने वर्गात करून दाखवले. अभिवाचन आणि एकसुरी यांत्रिक वाचन यांच्यातील फरक मुलांना दाखवून दिल्यामुळे त्यांना वाक्यातील स्वराघातांचे महत्त्व समजले. विरामचिन्हांची गरज लक्षात आली. भाषेतील सौंदर्यपूर्ण शब्द, प्रतिमा यांकडे मुलांचं आवर्जून लक्ष वेधले गेले. या सगळ्यातून कळत नकळत भाषेची ओढच विद्यार्थ्यांना लागली. एरवी आपण जे बोलतो, लिहितो ते आणखी सुंदर शब्दांत व्यक्त करता येऊ  शकतं हे यानिमित्ताने विद्यार्थ्यांना समजले. ‘वाचू आनंदे’ या संपादित पुस्तकाचा त्यांना खूप फायदा झाला. त्याचसोबत स्मिता पाटील यांच्या ‘स्मिताताईच्या गोष्टी’ या ऑडिओ मालिकेतील गोष्टी विद्यार्थ्यांना त्यांनी वर्गात ऐकवल्या आणि त्या त्यांना फारच आवडल्या. या सर्व प्रयत्नांतून ‘चांगला कान’ तयार झालेल्या मुलांच्या वाचण्याच्या पद्धतीत आता लक्षणीय बदल दिसून येतो आहे. विरामचिन्हे, स्वराघात यांचा विचार करून मुलं सुश्राव्य वाचन करू लागली आहेत.

मराठीच्या पेपरमध्ये कमी गुण मिळण्याचे कारण म्हणजे निबंध आणि पत्रलेखनासारखे प्रश्न. कधीही व्यक्त होण्याची सवय नसेल तर विद्यार्थी इथे कमी पडतात. म्हणूनच मनीषाने अगदी दुसरीतल्या विद्यार्थ्यांसोबत पत्रलेखनाचा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी एकमेकांना पत्रे लिहिली. पालकांना, शिक्षकांना अनौपचारिक पत्रे लिहिली. त्यानंतर हळूहळू त्यांना पत्रलेखनाचे कारण उमजले. त्यातील वाक्यरचना, शब्दयोजना याविषयी आपोआपच विद्यार्थी सजग होऊ लागले. शिवाय आपल्या भावना शब्दात उतरवण्याच्या या सरावामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वासही वाढीला लागला. मनीषाला तिच्या कामात अ‍ॅक्टिव्ह टीचर्स फोरमसारख्या गटाची खूपच मदत झाली. त्यांचा आणि वर्षां सहस्रबुद्धे यांचा ती विशेष उल्लेख करते. या उत्तम मार्गदर्शनामुळेच तिला निरनिराळे उपक्रम राबवण्याची प्रेरणा तिला मिळाली.

तिच्या या कष्टाचे फळ हळूहळू दिसत आहे. नुकतेच तिच्या चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वत:साठी दिवाळीची खरेदी म्हणून पुस्तके घेतली. तेही आपल्या खाऊ, खेळण्यांचे आणि कपडय़ांचे पैसे वाचवून. एका भाषाप्रेमी शिक्षकाला याहून अधिक चांगली भेट काय असेल!

संकलन – स्वाती केतकर-पंडित