जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात आशियाई देशांतील कर्मचारी, प्रामुख्याने भारतीय कर्मचारी कामाच्या वेळांव्यतिरिक्त अधिक तास काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याविषयी..

 भारतीय कर्मचारी त्यांच्या कामाच्या तासाच्या व्यतिरिक्त म्हणजेच अधिक तास काम करीत असून त्यासाठी मोबाइल, संगणक यांसारख्या उपकरणांचा वापर हे कर्मचारी करतात, असे आढळून आले आहे.

‘केली सव्‍‌र्हिसेस’ या जागतिक स्तरावर उमेदवारांची निवड करण्याचे काम करणाऱ्या कंपनीतर्फे करण्यात आलेल्या एका व्यापक सर्वेक्षणात भारतीय कर्मचारी, त्यांचे कामकाज व मुख्य म्हणजे कामाचे तास यासंदर्भात पुढील मुद्दे प्रामुख्याने आढळून आले आहेत :

*     भारतातील ५५ टक्के कर्मचारी आठवडय़ाला सुमारे ५ तास अधिक काम करतात.

*     १६ टक्के कर्मचारी आठवडय़ाला ६ ते १० तास, तर १८ टक्के कर्मचारी दर आठवडय़ात सुमारे १० तास अतिरिक्त काम करीत असतात.

*     सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सर्वाधिक म्हणजेच ६१ टक्के कर्मचाऱ्यांच्या मते मोबाइल व संगणक यांसारख्या विकसित तंत्रज्ञानाचा त्यांना फायदा होत असून या उपकरणांचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कामकाजावर झाला आहे.

*     तर ३५ टक्के कर्मचाऱ्यांनी असेही नमूद केले आहे की, विकसित तंत्रज्ञान वा मोबाइलसारख्या विकसित तंत्रज्ञानामुळे त्यांच्या कामाच्या संदर्भातील ताणतणाव वाढला आहे.

सर्वेक्षणानुसार भारतीय आणि भारतीय कंपन्यांच्या संदर्भात अतिरिक्त काम आणि काम करण्याचे सर्वाधिक प्रमाण आणि टक्केवारी मध्यम व उच्चस्तरीय अधिकारी आणि व्यवस्थापकांमध्ये असून या कर्मचाऱ्यांच्या कामकाज आणि उत्पादकतेवरच संबंधित कंपनी वा कार्यालयाचे यशापयश खऱ्या अर्थाने अवलंबून असते. याशिवाय या मंडळींची भूमिका, निर्णयक्षमता फार महत्त्वाची असल्याने गरज म्हणूनही अतिरिक्त काम करावे लागणे अपरिहार्य ठरते.

वाढत्या कामांच्या तासांच्या संदर्भात मोबाइल, ई-मेल, संगणक यांसारख्या संवाद उपकरणांचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर होत असून त्याचे साधकबाधक परिणामही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतांश म्हणजेच ६१ टक्के कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञानाद्वारा विकसित व सुसज्ज झालेली उपकरणे त्यांच्या कामाला पूरक व उत्पादक वाटत असली तरी ३५ टक्के कर्मचाऱ्यांनी मात्र स्पष्टपणे असे नमूद केले आहे की, मोबाइल-ईमेलसारख्या उपकरणांमुळे त्यांना कामाचा वाढत्या तासांबरोबरच वाढत्या ताण-तणावाचाही सामना करावा लागतो, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

अशाच प्रकारच्या जागतिक संदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की, जागतिक संदर्भात २७ टक्के कर्मचारी कामांच्या तासांव्यतिरिक्त काम करताना तणाव अनुभवतात. आशियाई देशांमधील कर्मचाऱ्यांचे अशा प्रकारे अतिरिक्त कामांच्या तासांमुळे होणाऱ्या ताणतणावाच्या संदर्भात अशीच भावना असून या कर्मचाऱ्यांची टक्केवारी ३५ आहे.

भारतातील कर्मचाऱ्यांशिवाय हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया इत्यादी देशांमध्ये काम करणाऱ्या सुमारे ४० टक्के कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामांच्या तासांच्या संदर्भात अशी प्रांजळ कबुली दिली आहे की, कामांचे अतिरिक्त तास हा त्यांच्या वाढत्या कामाचाच भाग असून त्यांच्या कामासाठी आवश्यक ठरणाऱ्या जबाबदारीचाच हा भाग आहे. त्यासंदर्भात त्यांच्या मनात तक्रारीची भावना नाही.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अधिकांश कर्मचाऱ्यांच्या मते, त्यांच्या वाढत्या व अतिरिक्त कामाच्या तासांचे मूलगामी आणि खरे कारण हे ग्राहकांच्या बदलत्या आणि वाढत्या गरजांमध्ये आहे. सुमारे २८ टक्के कर्मचाऱ्यांनी या मुद्दय़ांची पुष्टी केली असून त्याखालोखाल म्हणजेच

२५ टक्के कर्मचाऱ्यांनी त्यांना कामांच्या तासांशिवाय अतिरिक्त काम करण्याचे कारण वरिष्ठ आणि त्यांच्या सूचना-नियोजन व कार्यशैली असल्याचे मोकळेपणे मान्य केले आहे. त्यानंतर १४ टक्के कर्मचाऱ्यांनी ते आपली स्वत:ची जबाबदारी म्हणून अतिरिक्त तास करीत असल्याची पुष्टी केली असून ७ टक्के कर्मचाऱ्यांनी मात्र त्यांचे इतर सहकारी अतिरिक्त तास काम करीत असल्याने आपणही त्यांचेच अनुकरण करीत जास्तीचे तास म्हणजेच कामाच्या निर्धारित तासांव्यतिरिक्त काम करीत असल्याचे मान्य केले आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळजवळ निम्म्या म्हणजेच ४९ टक्के कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष कार्यालयात वा कामाच्या ठिकाणी अतिरिक्त काम करण्याला घरून काम करून महत्त्वाच्या कामाची निर्धारित वेळेत पूर्तता करणे हा एक चांगला, व्यवहार्य व सहजगत्या करण्याजोगा पर्याय असण्याचा जोरदार पुरस्कार केला आहे. यापैकी अनेकांनी तर घरून काम करण्याला आपली संपूर्ण व मन:पूर्वक तयारी असल्याचे नमूद केले असून त्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे, हे विशेष.

या बाबींची पूर्ण कल्पना असल्याने विविध व्यवस्थापन कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी व्यावसायिक गरज व संबंधित कर्मचाऱ्याची सोय यांची व्यावहारिक सांगड घालीत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘लवचिक कामाचे तास’ या धोरणाची अंमलबजावणी यापूर्वीच सुरू केली आहे. सद्य:स्थितीत व्यवस्थापक आणि व्यवस्थापनांच्या मते, सध्या संगणकावर आधारित प्रगत अशा संवाद माध्यमांमुळे आणि उपकरणांमुळे कुणी कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्याची प्रत्यक्ष उपस्थिती पूर्वीसारखी गरजेची नसून कर्मचाऱ्यांचे उत्पादक व परिणामकारक कामावरच या मंडळींचा मुख्य भर राहिला आहे. या कामी अर्थातच आयटी व इतर व्यावसायिक कंपन्यांनी पुढाकार घेतला असून या लवचिक व व्यावहारिक धोरणाचा फायदा या कर्मचारी आणि कंपन्या या उभयतांना होत असतो.

दरम्यान, ‘ओईसीडी’ म्हणजेच ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेन्टतर्फे करण्यात आलेल्या एका व्यापक सर्वेक्षणात भारतीय महिलांच्या व्यावसायिक कार्य-कर्तृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ओईसीडीच्या या सर्वेक्षणानुसार, भारतीय महिला त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत सुमारे दीड तास अधिक काम करीत असून भारतासह अन्य २९ देशांमधील महिला कर्मचारी त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा अधिक तास काम करीत असल्याचे पण स्पष्ट झाले आहे.

‘ओईसीडी’च्या याच सर्वेक्षणानुसार भारतासह ३० देशांतील महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक काम करीत असतात. सर्वेक्षणानुसार डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, न्यूझीलंड आणि नेदरलॅण्डमध्ये मात्र तेथील पुरुष त्यांच्या महिला सहकाऱ्यांपेक्षा अधिक तास काम करतात; तर ब्रिटन आणि जर्मनीमध्ये मात्र पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन कामाचे तास मात्र समसमान आहेत.