माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन

माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन हा विशेषीकरणातील एक महत्त्वाचा विषय आहे. या विषयाला काही विद्यापीठांमध्ये संगणक व्यवस्थापन (कॉम्प्युटर मॅनेजमेंट) असेही संबोधले जाते.

माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन हा विशेषीकरणातील एक महत्त्वाचा विषय आहे. या विषयाला काही विद्यापीठांमध्ये संगणक व्यवस्थापन (कॉम्प्युटर मॅनेजमेंट) असेही संबोधले जाते. ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पदवी परीक्षेपर्यंत संगणक विषयाची ओळख झाली आहे किंवा ज्यांनी कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन यामध्ये पदवी प्राप्त केली आहे, त्याचप्रमाणे ज्यांनी संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान शास्त्रात अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आहे अशांना हा विषय समजण्यास तुलनेने सोपा जातो. अर्थात इतर विषयांमध्ये म्हणजे वाणिज्य, कला किंवा अभियांत्रिकीच्या इतर विद्याशाखांमध्ये पदवी मिळवली आहे त्यांनी हा विषय घेऊच नये किंवा त्यांना समजण्यास हा विषय अवघड जाईल असे नाही. मात्र आपल्याला जास्त मेहनत करावी लागेल हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.कॉम्प्युटर मॅनेजमेंट किंवा माहिती तंत्रज्ञान याही विषयामध्ये पुस्तकांपलीकडे तसेच वर्गाबाहेर शिकता येतील अशा अनेक गोष्टी आहेत. या विषयाचे वैशिष्टय़ म्हणजे या क्षेत्रातील बदल अतिशय वेगाने होतात. त्यामुळे या बदलांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानात वेगाने होणाऱ्या बदलांचे प्रतिबिंब कित्येक वेळा अभ्यासक्रमात लगेच उमटेल असे नाही. कारण अभ्यासक्रमात बदल करण्याची एक प्रक्रिया असते आणि त्यामुळे असे बदल अभ्यासक्रमात होण्यासाठी काही काळ व्यतीत होणे अपरिहार्य असते. मात्र, हे बदल समजून घेत विद्यार्थ्यांना स्वत:ला अद्ययावत ठेवता येणे शक्य आहे. याचबरोबर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना भेटी देऊन,  आपल्या मित्रमंडळीपैकी किंवा नातेवाईकांपैकी जर कोणी अशा कंपन्यांमध्ये काम करीत असेल तर त्यांच्याबरोबर चर्चा करून स्वत:चे ज्ञान व अनुभव वाढवता येईल. या क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव म्हणून वेबसाइट तयार करणे, एखादे सॉफ्टवेअर विकसित करणे हेही करून पाहायला हरकत नाही. आपली स्वत:ची किंवा माहितीतल्या एखाद्या संस्थेची वेबसाइट तयार करून ती चालवणे म्हणजेच तिचे व्यवस्थापन करणे.. हे करून पाहता येईल किंवा आपण ज्या संस्थेमध्ये शिकतो त्याच संस्थेची वेबसाइट अद्ययावत करण्यासाठी मदत करता येईल. याचबरोबर अभ्यास करताना काही नवीन उत्पादन विकसित करता येईल का, हाही विचार करता येतो. यामध्ये नवीन अ‍ॅप विकसित करणे तसेच महाविद्यालयासाठी उपयुक्त ठरेल अशी एखादी संगणक प्रणाली विकसित करणे इत्यादी अनेक गोष्टी करता येतात. नवीन वस्तू किंवा उत्पादन तयार करण्यासाठी सतत विचारांना चालना द्यावी लागते, त्यामुळे आपोआप विचारक्षमता विकसित होते. याबरोबरच माहिती तंत्रज्ञानविषयक कायदे, सायबर, गुन्हेगारी, सायबर सुरक्षा इत्यादी अनेक क्षेत्रांची माहिती घेता येते. अलीकडे संगणक माहितीची सुरक्षा हा एक महत्त्वाचा घटक आहे. या सुरक्षेसाठी कुठली नवीन तंत्रे वापरली जातात हे समजून घेता येईल, तसेच सायबर गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या उदाहरणांची माहिती जमा करून त्यावर कशी मात करता येईल याची माहितीही उपयुक्त ठरते.एमबीएचा अभ्यास करताना माहिती-तंत्रज्ञान विभागातील वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्सचा अभ्यास करता येतो. या वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्सच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातात. काही सर्टिफिकेशन्सच्या परीक्षांची फी थोडी जास्त वाटली तरी भविष्याचा विचार केल्यास त्याचा फायदा नक्कीच होतो. म्हणूनच सर्टिफिकेशन्सची माहिती घ्यावी.सारांशाने असे म्हणता येईल की, माहिती तंत्रज्ञान या विशेषीकरणाचा अभ्यास करताना अभ्यासक्रमातील विषयांसोबत प्रत्यक्ष व्यवहारात काय सुरू आहे याचीही माहिती हवी. वेगवेगळ्या आय. टी. कंपन्यांमध्ये कोणत्या प्रकारचे काम चालते हे पाहणे गरजेचे आहे आणि त्याप्रमाणे स्वत:मध्ये बदल घडवून आणायला हवे. बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, हेल्थकेअर, मार्केटिंग या अनेक क्षेत्रांत व तसेच इतरही काही क्षेत्रांत आय.टी. अ‍ॅप्लिकेशन्स मोठय़ा प्रमाणावर आहेत आणि ती वाढतच जाणार आहेत. म्हणूनच अद्ययावत माहिती सतत मिळवत राहणे व त्या माहितीचा वापर करणे याला पर्याय नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Information technology management

ताज्या बातम्या