सुनील तु. शेळगावकर

स्पर्धा परीक्षा आणि महाविद्यालयीन परीक्षा यांच्या अभ्यास व परीक्षापद्धतीमध्ये जमीनअस्मानाचा फरक आढळतो. सामान्य विज्ञान हा घटक सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी असतोच. उमेदवाराची विचारसरणी आणि दृष्टिकोन याचा अंदाज बांधण्यासाठी या घटकाचा परीक्षा मंडळाला फायदा होतो. शेवटी योग्य उमेदवाराची शिफारस करणे हाच कोणत्याही परीक्षा  मंडळाचा हेतू असतो. या ठिकाणी आपण महाराष्ट्र गट – क  पूर्वपरीक्षेसाठीच्या विज्ञान या घटकाची चर्चा करणार आहोत.   

State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
10 th Exam
दहावीत नापास झालात? काळजी नसावी कारण येत आहे नवे धोरण…
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

* सामान्य विज्ञान अभ्यासक्रम :

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र

* परीक्षेतील सामान्य विज्ञान :

महाराष्ट्र गट -क  पूर्व परीक्षेच्या शंभर प्रश्नांपैकी सुमारे १५ प्रश्न हे सामान्य विज्ञान या घटकावर असतात. याची काठिण्यपातळी बारावी अशी दिली आहे. एक प्रश्न एक गुणांसाठी असून २५% नकारात्मक गुणदान पद्धती आहे. जीवशास्त्र हा विषय तीन घटकात विभागून दिला आहे याचा अर्थ जीवशास्त्रावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या ही भौतिक व रसायनशास्त्र या घटकांपेक्षा जास्त असू शकते.

* अभ्यासक्रमाचे विश्लेषण :

भौतिकशास्त्र – भौतिकशास्त्र या उपघटकांतर्गत आपणास जास्तीतजास्त पाच प्रश्न विचारले जाऊ शकतात. भौतिकशास्त्र या विषयातील प्रश्नात भौतिकशास्त्रातील विविध शोध व संशोधक, भौतिकराशी, भौतिक राशींची परिमाणे व  मोजमाप, उदाहरणे, व्याख्या या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात येतात. यातील उपघटकाचा अभ्यास करताना गती ते गुरुत्व त्वरण, बल ते शक्ती, ऊर्जा, प्रकाश, चुंबकत्व, विद्युत आणि आधुनिक भौतिकशास्त्रातील इयत्ता बारावीपर्यंतच्या पुस्तकात दिलेल्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा.

रसायनशास्त्र – रसायनशास्त्र या उपघटकांतर्गत आपणास जास्तीत जास्त पाच प्रश्न विचारले जाऊ शकतात. रसायनशास्त्र या विषयातील विविध शोध व संशोधन, मूलद्रव्ये, संयुगे, मिश्रणे याबरोबरच आम्ल, आम्लारी, क्षार तसेच धातू, अधातू, धातूसदृश्य यांचा अभ्यास करावा लागतो. आधुनिक रसायनशास्त्रातील इयत्ता बारावीपर्यंतच्या पुस्तकात दिलेल्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा.

प्राणिशास्त्र – प्राणिशास्त्र या उपघटकांतर्गत आपणास जास्तीत जास्त तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्राणिशास्त्र या विषायातील प्रश्नात प्राणिशास्त्रातील विविध शोध व संशोधक, प्राण्यांचे वर्गीकरण, प्राण्यांचे अनुकूलून, विविध प्राण्यांचे वैशिष्टय़े, प्राणी पेशी व उती, प्राणी संवर्धन, प्राणी जीवनचक्र, प्राण्यांचे विविध रोग व उपचार पद्धती इत्यादी बाबीचा समावेश होतो. याशिवाय प्राणिशास्त्राविषयी इयत्ता बारावीपर्यंतच्या पुस्तकात देण्यात आलेल्या माहितीचा अभ्यास करावा.

वनस्पतीशास्त्र – वनस्पतीशास्त्र या उपघटकांतर्गत आपणास जास्तीत जास्त तीन  प्रश्न विचारले जाऊ शकतात. वनस्पतीशास्त्र या विषयातील विविध शोध व संशोधन,वनस्पतीचे वर्गीकरण, वनस्पतीचे अनुकूलन, वनस्पतीचे जीवनचक्र, विविध वनस्पतींची वौशिष्टय़े, वनस्पती पेशी व उती, वनस्पतींचे विविध रोग व उपचार पद्धती इत्यादी बाबींचा समावेश होतो. या शिवाय वनस्पतिशास्त्राविषयी इयत्ता बारावीपर्यंतच्या पुस्तकात दिलेल्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा.

आरोग्यशास्त्र – आरोग्यशास्त्र या उपघटकांतर्गत आपणास जास्तीतजास्त पाच  प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्या या परीक्षेत आरोग्य शास्त्राशी संबंधित जे प्रश्न असणार आहेत ते मानवी आरोग्याशी संबंधित असणार आहेत. या अनुषंगाने मानवी आरोग्याबरोबरच याठिकाणी मानवी आहार, मानवी इंद्रिय संस्था, ज्ञानेंद्रिय हा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. याशिवाय मानवी जीवशास्त्राशी संबंधित इतर घटक ज्यांचा इयत्ता बारावीपर्यंतच्या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे त्यांचाही अभ्यास करावा लागतो.

अभ्याससाहित्य :

सामान्य विज्ञान हा विषय कदाचित स्पर्धा परीक्षेतील एकमेव विषय असावा ज्याचे अभ्यास साहित्य हे बारावी पर्यंतची पुस्तके आहेत. यात देण्यात आलेली माहिती आपल्या परीक्षेच्या काठिण्यपातळीनुसार पुरेशी आहे. या विषयाशी संबंधित काही प्रश्न परीक्षेत असतील तर ते सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या सदराशी संबंधित असू शकतात हे लक्षात घ्यावे. अशा प्रश्नांसाठी वर्तमानपत्राच्या विज्ञानविषयक पुरवण्यांचा वापर अवश्य करावा.

अभ्यासपद्धती : इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या पुस्तकातून प्रत्येक विषयाची अनुक्रमणिका पाहून अगोदर स्वत:ची एक अनुक्रमणिका तयार करावी. ज्यात विविध इयत्तेत असणारे सर्व घटक विषयांप्रमाणे एकत्र करता येतील. उदाहरणार्थ : भौतिकशास्त्रातील ध्वनी हा घटक असेल तर तो कोणकोणत्या इयत्तेत विभागला आहे तो आपल्या अनुक्रमणिकेत एकत्रित करावा. मगच ध्वनी या घटकाच्या अभ्यासाकडे जावे. अभ्यास करताना इयत्ता पाचवी ते बारावी असा चढत्या क्रमाने पुस्तके वाचून करावा. अभ्यास करताना येणाऱ्या पारिभाषिक शब्दांतील अर्थ समजून घ्यावा. जुन्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा अभ्यास करून विषयाची काठिण्यपातळी व प्रश्नप्रकार समजून घ्यावा. एकंदरीत; सामान्य विज्ञान हा विषय विशेष ज्ञानाचा विषय आहे. त्यात सुरुवातीपासून ज्ञानाच्या कक्षा कशा रुंदावत गेल्या हे लक्षात घ्यावे लागते. यादरम्यान येणारी वस्तुनिष्ठ माहिती टिपणाच्या स्वरूपात विषयवार स्वत: तयार करावी लागते. विज्ञानातील ज्ञान हे तत्कालीन परिस्थितीतले खरे ज्ञान असते ते त्या त्या प्रमाणे परीक्षेच्या अनुषंगाने लक्षात ठेवावे लागते. थोडेसे अरुचकर, कंटाळवाणे वाटणारे विज्ञान एकदा कळू लागल्यावर त्यानंतर मात्र आवडीचे वाटू लागते. गरज आहे ते किमान पातळीवर यातील संज्ञा, माहिती लक्षात राहण्यासाठी उपरोक्त सांगितलेल्या पद्धतीने अभ्यास करण्याची. यशस्वी भव!