सुनील  तु. शेळगावकर

महाराष्ट्र गट-क सेवा (पूर्व) परीक्षा ही महाराष्ट्रात गट-क पदाच्या इतर स्पर्धा परीक्षेपेक्षा अनेकार्थानी वेगळी आहे. त्यापैकी एक बाब म्हणजे परीक्षेचे टप्पे व अभ्यासक्रम. आज आपण या परीक्षेसाठी अभ्यास कराव्या  लागणाऱ्या इतिहास या घटकाच्या अभ्यासाविषयी चर्चा करणार आहोत.

अभ्यासक्रमाचे स्वरूप :

इतिहास म्हणजे हे असे घडले होते.  म्हणजेच  भूतकाळात नेमके काय घडून गेले होते त्याचा वस्तुनिष्ठ अभ्यास. अर्थात; हा अभ्यास करताना आपल्या परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा दर्जा बारावी आहे हे विसरून चालणार नाही. या परीक्षेसाठी आयोगाने दिलेला अभ्यासक्रम हा पुढीलप्रमाणे आहे.

आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा अभ्यास

या अभ्यासक्रमावरील अंदाजे १५ प्रश्न आपल्या परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता असते. एक प्रश्न एक गुणासाठी असून परीक्षा कक्षात त्याचे उत्तर देण्यासाठी ३६ सेकंदांचा कालावधी आहे. या परीक्षेसाठी २५ टक्के नकारात्मक गुणदान पद्धती आहे.

अभ्यासक्रमाचे विश्लेषण :

 आधुनिक कालखंड :

कालखंडानुसार इतिहासाचे तीन कालखंड मानण्यात येतात.  प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक.आपल्या परीक्षेसाठी भारताचा विशेषत: महाराष्ट्राच्या आधुनिक ऐतिहासिक कालखंडाचा अभ्यास करावा लागतो. असे असले तरी; इ.स. १४०० सालातील ठळक घटना जसे की; कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव, अमेरिकेचा शोध, वास्को- द- गामाचे भारतातील आगमन, युरोपियन सत्तांचे भारतातील आगमन आणि निर्गमन, भारतभूमीवरील युरोपियन सत्तांचा युरोपियन सत्तांशी झालेला सत्तासंघर्ष, युरोपियन सत्ता व भारतीय सत्ताधीश यांच्यातील संघर्ष ते इसवी सन १८५७ पूर्वीचा कालखंड याचा परीक्षाभिमुख पद्धतीने अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. जेव्हा केव्हा भारतभूमीवर एखादी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक राजकीय, सामाजिक किंबहुना आर्थिक घटना किंवा बदल घडून येत होता तेव्हा महाराष्ट्रातील नेमकी परिस्थिती, घटना कशी होती  व घडून येणारी स्थित्यंतरे काय होत होती याचाही आपणास येथे वस्तुनिष्ठ अभ्यास करावा लागतो.

१८५७चा उठाव :

१८५७च्या उठावाची पार्श्वभूमी, १८५७च्या उठावाची कारणे, फैलाव, अपयशाची कारणे, उठावाचा परिणाम आणि इतिहासकार व विचारवंतांची उठावाविषयीचे मत-मतांतरे इत्यादी.

राष्ट्रीय सभा :

राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी विविध प्रांतांतील राजकीय संघटना, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचा इतिहास व स्थापना, राष्ट्रीय सभेची वाटचाल- मवाळ कालखंड, जहाल कालखंड, गांधीयुग तसेच या दरम्यानच्या  ठळक बाबी, घटना जसे की; बंगालची फाळणी, मुस्लीम लीग स्थापना व कार्य, होमरूल चळवळ, खिलाफत चळवळ, जालियनवाला बाग हत्याकांड, स्वराज्य पक्ष, सायमन कमिशन, नेहरू रिपोर्ट, गोलमेज परिषद इत्यादीचा अभ्यास आपणास करावा लागतो.

 क्रांतिकारकांचे कार्य :

क्रांतिकारक चळवळीचा जन्म, पार्श्वभूमी, क्रांतिकारकांचे भारतातील व परदेशातील कार्य, क्रांतिकारकांच्या कारवाया, संघटना, कट इत्यादी बाबींचा  अभ्यास आपणास  करावा लागतो.

 स्वातंत्र्य चळवळीचे शेवटचे पर्व :

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धात भारतीयांचा पािठबा मिळावा म्हणून इंग्रजांनी भारतीयांशी केलेल्या सत्तेच्या वाटाघाटी व भारताचे स्वातंत्र्य, द्विराष्ट्र संकल्पना आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा संस्थांने  विलीनीकरणाचा प्रश्न व स्वतंत्र प्राप्तीनंतरचा इसवी सन १९६० पर्यंतचा भारत या बाबींचा अभ्यास आपणास करावा लागतो.

अनिवार्य अभ्यास :

याशिवाय भारतातील किंबहुना महाराष्ट्रातील विविध सुधारणावादी चळवळी, ब्रिटिशकालीन कायदे, काँग्रेसची अधिवेशने, इंग्रजांचे भारतातील गव्हर्नर, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय, महत्त्वपूर्ण इतिहासकालीन वृत्तपत्रे व त्यांचे प्रमुख किंवा संपादक, विविध इतिहासकालीन व्यक्तिमत्त्व व त्यांची टोपण नावे, कार्य, पुस्तके इत्यादी यांचाही अनिवार्य पद्धतीने अभ्यास करावा लागतो. अभ्यासक्रमाचे विश्लेषण करताना अगदी बारकाईने सर्व अभ्यास मुद्दे आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. जर एखादा मुद्दा नजरचुकीने राहिला असल्यास त्याची माहिती आपणास बालभारतीचा बारावीपर्यंतच्या शालेय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इयत्तेच्या पुस्तकात मिळून जाईल.

इतिहासाचा अभ्यास परीक्षेत आठवत नाही :

इतिहास हा विषय प्रचंड वस्तुनिष्ठ माहितीने भरलेला आहे. आपल्याला अपेक्षित असते की; एकदा वाचले की आयुष्यभर लक्षात राहावे पण; असे कोणाच्याही बाबतीत घडत नसते. इतिहासाच्या  प्रथम वाचनात फक्त घटनांचा कार्यकारणभाव लक्षात घ्यावा.  द्वितीय वाचनात कालखंड लक्षात घ्यावा. तृतीय वाचनात व्यक्ती व त्याचे कार्य यांचा संबंध लक्षात घ्यावा. चतुर्थ वाचनात परीक्षाभिमुख टिपणे नोंदवावीत. पाचवे वाचन फक्त टिपण वाचन करावे. आता आपणास परीक्षेत इतिहास नक्की आठवेल.

परीक्षाभिमुख अभ्यास करावा :

आयोगाचा  तत्सम अभ्यासक्रम आणि दर्जा असणाऱ्या इतर परीक्षा याच्या किमान पाच वर्षांचा प्रश्नपत्रिका मिळवाव्यात. प्रश्नपत्रिका प्रश्नांची काठिण्यपातळी, प्रश्न विचारण्याचे कारण लक्षात घ्यावे व अभ्यासाचा परीघ ठरवावा.  किमान या विषयाच्या बाबतीत काय वाचावे यापेक्षा जास्त काय वाचू नये हे महत्त्वाचे.

अभ्यास साहित्य :

विषयाची परीक्षाभिमुखता लक्षात आल्यानंतर वर उल्लेख केलेले सर्व घटक आणि उपघटक अभ्यासण्यासाठी कोणतेही पुस्तक वाचल्यास चालते. परंतु या विषयाची वस्तुनिष्ठता ही बालभारतीच्या पुस्तकात चांगली असल्याकारणाने त्याचा अभ्यास प्रथमत: करावा असे वाटते. आपल्या परीक्षेचा दर्जा फक्त बारावी असल्याकारणाने विद्यापीठ शिफारशीत पुस्तके वाचण्याची गरज नक्कीच भासणार नाही.

अभ्यास पायऱ्या :

सर्वप्रथम आपल्या परीक्षेच्या काठिण्यपातळीनुसार विषयाचा परीघ आखून घ्यावा. पहिल्यांदा भारताच्या इतिहासाचा अभ्यास करावा. त्यानंतर महाराष्ट्राच्या  विशेष बाबींचा अभ्यास करावा. शेवटी सूक्ष्म टिपणे तयार करावी. कालानुक्रमे घटनाक्रम, महत्त्वपूर्ण माहिती जसे की; राष्ट्रीय सभेची अधिवेशने, ब्रिटिशकालीन  गव्हर्नर्स, गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय, इतिहासकालीन महत्त्वपूर्ण व्यक्तींची  टोपण नावे, वृत्तपत्रे व संपादक, विविध संघटना व संस्थापक इत्यादीचा समावेश करावा. आधुनिक भारताचा इतिहास जवळपास सर्व प्रकारचा स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.  त्यामुळे याचा नंतरच्या टप्प्यात परीक्षाभिमुख पद्धतीने आपला अभ्यास वाढवावा जेणेकरून या परीक्षेतील यश हे अंतिम यश ठरणार नाही.