फारुक नाईकवाडे
राज्य सेवा पूर्व परीक्षा १९ मे रोजी होणार आहे. या लेखापासून पूर्व परीक्षेच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये इतिहास घटक विषयाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे देण्यात आला आहे:‘‘भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व राष्ट्रीय चळवळ ’’
अभ्यासक्रमामध्ये प्राचीन व मध्ययुगीन कालखंडाचा उल्लेख नसला तरी भारताचा इतिहास व राष्ट्रीय चळवळ असा स्वतंत्र उल्लेख असल्यामुळे या तिन्ही कालखंडांचा अभ्यास आयोगाला अभिप्रेत आहे ते लक्षात येते. शिवाय प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरूनही ही बाब स्पष्ट होते. प्राचीन अणि मध्ययुगीन इतिहास हा घटक म्हणजे माहितीचा महासागर आहे. त्यात महाराष्ट्राचा विशेष संदर्भ असल्याने या कालखंडातील महाराष्ट्राचा अभ्यास अजूनच खोलवर करावा लागतो. आधुनिक भारतीय इतिहासातील मुद्दे, घटना यांची तोंडओळख असल्याने अभ्यास कसा करावा किंवा कोणती पुस्तके वापरावीत याविषयी उमेदवारांना सर्वसाधारण माहिती असते. पण तुलनेने प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास घटकाच्या अभ्यासाविषयी क्लिअर प्लॅन नसतो. त्यामुळे बरेच वेळा हा घटक पाहिल्यावर नवीन उमेदवारांना स्पर्धा परीक्षा खूप विस्तारलेली किंवा खूप अवघड आहे असे वाटू लागते. तुलनेने अवघड वाटणा-या या घटक विषयाचा अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करता येईल ते या लेखात पाहू.
प्राचीन कालखंड
महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक पुरातत्त्व स्थळे, त्यांचा काळ, उत्खननातील वस्तू आणि त्या त्या कालखंडाबाबत इतिहासकारांची मते माहीत असायला हवीत. त्याबरोबरच भारतामध्ये अन्य ठिकाणच्या प्रागैतिहासिक पुरातत्त्व स्थळांचा आढावा घ्यायला हवा.
सिंधु संस्कृतीमधील पुरातत्त्व स्थळे, तेथील उत्खननात सापडलेल्या वस्तू, त्यांची वैशिष्टे, उत्खननकर्ते, नगर रचनेची ठळक वैशिष्टय़े, कालखंड व अस्ताबाबतची इतिहासकारांची मते या बाबी माहीत असायला हव्यात.
वैदिक व उत्तरवैदिक कालखंडातील ग्रंथ व त्यांचे विषय व त्यांतील महत्त्वाचे मुद्दे, साहित्य, साहित्यकार यांवर अभ्यास करताना भर द्यायला हवा. या काळातील आर्थिक व्यवहार, सामाजिक रचना, सांस्कृतिक बाबी आणि राजकीय जीवन यांचा आढावा घ्यायला हवा.
जैन व बौद्ध धर्माचा उदय व विस्तार, त्यांची मुख्य शिकवण महत्त्वाचे ग्रंथ, राजाश्रय यांचा अभ्यास आवश्यक आहे. या काळातील सोळा महाजनपदे आणि महत्त्वाचे शासक यांचा आढावा घ्यायला हवा.
तमिळ संगम साहित्य, त्यांचे साहित्यकार आणि ग्रंथ, महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये वर्णन केलेले विषय, कालखंड, राजवटी / राजाश्रय यांच्या नोट्स काढून अभ्यास करायला हवा. या महत्त्वाच्या राजवटी आणि त्यांमधील संघर्षांचाही आढावा घ्यायला हवा.
मौर्य व गुप्त साम्राज्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाचे स्रोत, शिलालेख, नाणी, साहित्य यांच्या टेबलमध्ये नोटस काढाव्या. या कालखंडातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवनाचे स्वरूप समजून घ्यावे. विशेषत: अशोकाच्या कालखंडातील प्रशासन व बौद्ध धर्मविषयक बाबी बारकाईने अभ्यासाव्यात. गुप्त कालखंडातील कला, नाणी व राजकीय घडामोडींवर जास्त भर द्यावा.
प्राचीन महाराष्ट्रातील सातवाहन घराणे, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट घराणे, शिलाहार, गोंड घराणे या घराण्यांचा अभ्यास करताना घराणे/राजवटीचा कालखंड, संस्थापक, महत्त्वाचे राजे, शाखा व त्याचे प्रमुख, राजधानी (आर्थिक/सांस्कृतिक), आर्थिक, सामाजिक स्थिती, सांस्कृतिक योगदान, महत्त्वाच्या घटना, प्रमुख युद्धे या बाबींचा तुलनात्मक अभ्यास करणे फायद्याचे ठरते.
मध्ययुगीन कालखंड
मध्ययुगीन कालखंडामध्ये राजकीय आणि सामाजिक- सांस्कृतिक अभ्यासावर भर असावा. हर्षांच्या अस्तानंतर सल्तनत कालखंडापर्यंतची प्रादेशिक राज्ये, त्यांचे महत्त्वपूर्ण राजे, लढाया, त्यांचे परिणाम, समकालीन जगभरातील घटना आणि त्यांचा भारतावरील परिणाम हे मुद्दे असणारे टेबल तयार करावेत.
सल्तनत व मुघल राज्यकर्ते, त्यांचे महत्त्वाचे आर्थिक – सामाजिक निर्णय, महत्त्वाच्या लढाया व त्यांचे निर्णय यांचा टेबलमध्ये अभ्यास करावा.
मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रमुख राजवटींचा अभ्यास – चालुक्य, यादव, बहामनी – (ईमादशाही, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही) महत्त्वाचे राज्यकर्ते, त्यांचे महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाच्या लढाया व त्यांचे निर्णय या मुद्दय़ांच्या आधारे करावा.
मध्ययुगीन कालखंड हा सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध होता. या कालखंडातील सांस्कृतिक जीवन अभ्यासण्यासाठी इग्नूच्या नोट्स हा उत्तम संदर्भ ठरतो.
या काळातील विविध कला व शास्त्रीय शोधांचा आढावा घ्यायला हवा. वास्तुकला, चित्रकला व संगीत आणि नृत्य या दृष्यकलांचा वेगवेगळय़ा शैली, आणि त्यांची वैशिष्टय़े व त्यांचे क्षेत्र या मुद्यांच्या आधारे नोट्स काढून अभ्यास करावा.
भारतातील वेगवेगळय़ा राज्यांच्या आश्रयाला असलेले साहित्यिक, इतिहासकार आणि त्यांच्या रचना व त्यातील महत्त्वाच्या साहित्यकृतींचा विषय, या कालखंडातील परकीय प्रवासी आणि त्यांची प्रवासवर्णने यांचा टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करावा.
प्रश्नांचे वस्तुनिष्ठ स्वरूप लक्षात घेता नोट्स काढणे आणि त्यांची उजळणी करणे या घटकाच्या परिणामकारक तयारीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
मराठा कालखंड (१६३०-१८१८)
मराठा राजवटीचा कालखंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून १८१८ पर्यंत असा आहे. शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या लढाया, तह, ठळक घडामोडी, अष्ट्प्रधान मंडळ, आर्थिक व राजकीय निर्णय यांचा बारकाईने अभ्यास करावा. पेशव्यांची कारकीर्द अभ्यासताना महत्त्वाचे पेशवे, त्यांच्या लढाया व त्यांचे निर्णय, तह, महत्त्वाचे मराठा सरदार व त्यांचे कार्यक्षेत्र हे मुद्दे लक्षात घ्यावेत.
वारकरी संप्रदाय, महानुभाव पंथ, इतर मध्ययुगीन संत, त्यांच्या रचना, त्यांची शिकवण यांचा आढावा घ्यायला हवा. वारकरी संप्रदाय तसेच महाराष्ट्रातील इतर संतांच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाबीही माहीत असणे आवश्यक आहे.
संदर्भ ग्रंथ –
१) राज्य पाठय़पुस्तक मंडळ व ठउएफळ आठवी ते बारावीची इतिहासाची पुस्तके (जागतिक इतिहास वगळून)
२) प्राचीन भारत – आर एस. शर्मा, रोमिला थापर, डी. एन झा (तिन्हींचा मराठी अनुवाद के’सागर प्रकाशन)
३) मध्ययुगीन भारत – सतीश चन्द्र, जे. एल. मेहता (मराठी अनुवाद के’सागर प्रकाशन)

Pradhan Mantri Awas Yojana,
पंतप्रधान आवास योजना, राज्याची वाटचाल संथगतीनेच! अद्याप दोन लाख घरांच्या कामाला प्रारंभ नाही
mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
mla dadarao keche bjp martahi news
मंत्रोच्चार, कलशपूजन व अभिषेक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची पूर्वतयारी
Deadline for drain cleaning in Pune till May 10 Municipal Commissioners order
पुण्यात नालेसफाईसाठी १० मेपर्यंत मुदत, महापालिका आयुक्तांचा आदेश