सुनील  तु. शेळगावकर

सर्व सजीव आणि निर्जीव घटक अव्याहतपणे सतत गतिमान असतात. त्याची गतिमानता हेच त्याचे अस्तित्व असते. असाच काहीतरी नियम स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडी या घटकास लागू आहे. आज आपण ३ एप्रिल २०२२ रोजी प्रस्तावित महाराष्ट्र गट – क सेवा पूर्व परीक्षा आणि चालू घडामोडी याविषयी चर्चा करणार आहोत.

अभ्यास पूर्वतयारी :

चालू घडामोडी या घटकाचा अभ्यास करण्यापूर्वी त्याची  अभ्यासपूर्व तयारी म्हणून परीक्षा योजना समजावून घ्यावी लागते. याच्या परीक्षा योजनेचा अभ्यास केल्यास आपणास असे लक्षात येते की

* परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न इयत्ता बारावीच्या काठिण्यपातळीचे असणार आहेत.

* एका प्रश्नासाठी एक गुण असून त्याचे उत्तर देण्यासाठी ३६ सेकंद इतका वेळ देण्यात आला आहे. 

* या परीक्षेस एकास चार (१:४) (२५ टक्के) अशी नकारात्मक गुणदान पद्धती आहे. (अर्थात; प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तरच ते उत्तर पत्रिकेत नमूद करावे.)

* चालू घडामोडी या घटकावर सुमारे पंधरा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.

* जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी असा अभ्यासक्रम देण्यात आला आहे.

अभ्यासपूर्ण सुरुवात :

वरील मुद्दे लक्षात घेऊन पुढीलप्रमाणे अभ्यासाची सुरुवात करावी.

अ) काठिण्यपातळी –

परीक्षेची काठिण्यपातळी बारावी असल्यामुळे विचारले जाणारे प्रश्न हे एका वाक्याचे, वस्तुनिष्ठ, माहितीपर आणि साधे व सोपे असतील याविषयी खात्री बाळगावी.

उदा: ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये कोणत्या चित्रपटाला ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कार प्राप्त झाला आहे? 

(महाराष्ट्र गट क सेवा पूर्ण, २०१८) 

१) एंजल्स वियर वाईट 

२) टेक ऑफ

३) क्षितिज

४) २२० बिट्स पर मिनिट

ब) अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अभ्यास :

चालू घडामोडी या घटकांतर्गत प्रादेशिक किंबहुना महाराष्ट्रातील चालू घडामोडीचा उल्लेख आढळत नाही. तरीसुद्धा अशा प्रादेशिक घटना, पुरस्कार, आयोजन, क्रीडा स्पर्धा, महोत्सव, मेळावे, साहित्य, संमेलन इत्यादी जी प्रादेशिक परंतु राष्ट्रीय दर्जाचे आहेत त्यांचा अभ्यास अनिवार्य पद्धतीने करावा लागतो.

क) सामान्यज्ञान :

प्रत्येक चालू घडामोडीला एक प्रकारचे

सामान्य ज्ञान संलग्नित असते; त्याचाही आढावा किंबहुना तत्सम माहिती आपणास घ्यावी लागते. जसे की; या वर्षांचे आंतरराष्ट्रीय नोबल पुरस्कार कोणाला मिळाले या चालू घडामोडीच्या माहिती सोबतच – हा पुरस्कार कोणातर्फे दिला जातो, कधीपासून  दिला जातो, पुरस्काराचे स्वरूप काय असते, आजपर्यंत किती भारतीयांना हा पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार कोणकोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो, यासारखी माहितीही आपणास  अभ्यासावी लागते. उदा: महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण? या चालू माहितीसोबतच त्या पदाचे सामान्यज्ञानही आपणास माहिती हवे!

प्रश्न : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण?  (लिपिक टंकलेखक २०१७)

१) मोरारजी देसाई  

२) यशवंतराव चव्हाण

३) वसंतराव नाईक 

४) शंकरराव चव्हाण

ड) उपघटकांचे निश्चितीकरण :

महाराष्ट्र शासनाद्वारे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या नोकरी मिळवण्याचा जवळपास सर्व स्पर्धा परीक्षांसाठी कमी अधिक फरकाने चालू घडामोडी व संदर्भीय सामान्यज्ञानावर हमखास प्रश्न विचारले जातातच. प्रश्नांची काठिण्यपातळी, प्रश्न संख्या, गुणदान, नकारात्मक गुणदान पद्धती, विषयावरील भर हा फरक अभ्यास करताना लक्षात घ्यावा लागतो. असे असले तरी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपघटकांचे हे निश्चितीकरण तीन घटकांसाठी अर्थात; जागतिक, राष्ट्रीय आणि प्रादेशिक या गटांसाठी करता येणे अपेक्षित असते.  ते उपघटक पुढीलप्रमाणे असू शकतात.

* आर्थिक, राजकीय, सामाजिकविषयक चालू घडामोडी व सामान्यज्ञान.

* वैज्ञानिक, संरक्षणविषयक, पर्यावरणविषयक, अंतराळविषयक, ऊर्जाविषयक, शिक्षण व आरोग्यविषयक चालू घडामोडी व सामान्यज्ञान.

* क्रीडा, साहित्य, मनोरंजन, पत्रकरिता इत्यादीविषयक चालू घडामोडी व सामान्यज्ञान.

इ) जुन्या प्रश्नपत्रिकाचे महत्त्व :

विषय कोणताही असूद्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आयोगाच्या झालेल्या जुन्या प्रश्नपत्रिकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चालू घडामोडीच्या बाबतीत विषयाचा परीघ, काठिण्यपातळी, उपघटक निश्चिती, प्रश्नप्रकार, सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न समजून घेण्यासाठी मागील किमान पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करावा.

वरील बाबी लक्षात घेतल्याशिवाय चालू घडामोडी या घटकाचा अभ्यास हा अपूर्ण राहतो.

* अभ्यास साहित्य :

अभ्यास साहित्याचा वापर हा एक वादातीत मुद्दा आहे. माझ्या मते अभ्यास साहित्यात  पुढील बाबींचा किमान समावेश असावा. दैनिक ‘लोकसत्ता’सारखे दर्जेदार व परीक्षाभिमुख असे वर्तमानपत्र, महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे मासिक, केंद्र सरकारचे मराठी माध्यमातून प्रसारित होणारे योजना हे मासिक, आर्थिक पाहणी अहवाल २०२०-२१ (महाराष्ट्र व भारत सरकार), भारत: २०२२ (सूचना व प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रकाशित) याव्यतिरिक्त बाजारातील एखादे चालू घडामोडीविषयक पुस्तक अभ्यासण्यास हरकत नाही.

* विषयाचा परीघ :

चालू घडामोडी घटक या विषयाचा अभ्यास करताना विषयाचा परीघ  आखताना प्रस्तावित परीक्षा दिनांकाच्या किमान एक वर्ष अगोदपर्यंतचा घटनांचा परीक्षाभिमुख पद्धतीने अभ्यास करणे हितावह ठरते.

* सातत्य हेच यशाचे गमक: चालू घडामोडी घटकाचा अभ्यास स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतल्यापासून ते स्पर्धा परीक्षेतील आपापले अंतिम यश मिळेपर्यंत चालूच पाहिजे. बाजारातील पुस्तके व मासिके यावर पूर्णत: अवलंबून न राहता स्वत: याविषयीची टिपणे काढलीच पाहिजेत. यापूर्वी असे केले नसले तर या परीक्षेपुरते बाजारातील एखाद्या पुस्तकावर अवलंबून राहावे आणि वर चर्चिलेल्या सूत्राचा वापर करून यशोमार्ग प्रशस्त करावा. चालू घडामोडी या घटकावर विचारलेल्या प्रश्नांची सर्व उत्तरे देण्यासाठी यांच्या अभ्यासातील सातत्य हेच यशाचे गमक आहे.