शब्दबोध डॉ. उमेश करंबेळकर

विपाशा हे नाव म्हटल्यावर आपल्याला काय आठवतं? तर याच नावाशी साधम्र्य असलेलं एका नटीचं नाव. पण या नावाची एक नदी आहे, हेच अनेकांना माहिती नसेल. विपाशा ही पंजाब प्रांतातली एक प्राचीन नदी आहे. पंच आब म्हणजे पाच नद्या. त्यापासून शब्द तयार झाला पंजाब. म्हणजे पाच नद्यांचा प्रदेश. त्या पाच नद्या म्हणजे, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज.

बियास नदीलाच विपाशा असंही नाव आहे. विपाशा या नावामागची एक कथा सांगितली जाते ती अशी की, वसिष्ठ ऋषींना आपल्या शंभर पुत्रांच्या मरणाचे अतीव दु:ख झाले. आत्मसमर्पण करण्याच्या हेतूने त्यांनी स्वत:ला पाशात बांधून घेतले आणि या नदीत उडी टाकली.

परंतु आपल्या हातून ब्राह्मणहत्येचे पातक घडू नये म्हणून या नदीने त्यांचे पाश तोडले आणि त्यांना किनाऱ्यावर सुखरूप पोहोचवले. त्यावरून पाश तोडणारी या अर्थाने तिला विपाशा हे नाव पडले. हा उल्लेख ज. वि. ओकांच्या गीर्वाणलघुकोषात येतो. विपाशा या नदीला हल्ली बिआस किंवा ब्यास या नावाने ओळखले जाते. ब्यास हे नावसुद्धा महर्षी वेदव्यासांवरून पडले आहे, असे म्हणतात. कारण व्यासांनी व्यासकुंडातून या नदीची निर्मिती केली, अशीही एक कथा प्रचलित आहे.

बिआस ही सिंधू नदीची उपनदी आहे. हिमाचल प्रदेशातील रोहतांग-पास येथे ती सुरू होते. नंतर मनाली मार्गे ती पुढे पंजाबमधील हरिके पट्टान येथे सतलज नदीला मिळते. भारतातील सर्वात धोकादायक नद्यांमधील एक म्हणून बिआस नदी ओळखली जाते. कारण ती अत्यंत खडकाळ प्रदेशातून वाहते. हिमालयातील पर्यटनामध्ये ज्या वेगाने वाढ झाली त्याच वेगाने तेथील नद्यांच्या प्रदूषणामधेही वाढ झाली. बिआस नदीही त्याला अपवाद नाही.