रोहिणी शहा

मागील लेखामध्ये व्यवस्थापकीय अभिवृत्ती आणि निर्णयक्षमता या घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेच्या अनुषंगाने पर्यायांचे विश्लेषण कशा प्रकारे करावे आणि श्रेणीकरण करून सर्वात योग्य उत्तर कसे शोधावे याबाबत एका प्रश्नाच्या माध्यमातून या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

rbi kotak mahindra bank marathi news, kotak bank latest marathi news
विश्लेषण: रिझर्व्ह बँकेची कोटक महिंद्र बँकेवर कारवाई काय? त्याचा बँक ग्राहकांवर काय परिणाम होणार?
loksatta analysis drug shortage hit on tb elimination plan
विश्लेषण: क्षयरोगमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण होणार का? 
Loksatta explained The constructions of Pradhan Mantri Awas Yojana have not been completed
विश्लेषण: पंतप्रधान आवास योजनेची गती का मंदावली?
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या

‘‘राज्यामध्ये प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास रु. २००० इतक्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. पण काही फेरीवाले, भाजीवाले असे किरकोळ माल विकणारे लोक अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना तुम्हाला आढळले आहेत. याबाबत त्यांना हटकले असता ग्राहकांकडून सामान ठेवण्यासाठी पिशव्यांची मागणी होत असल्याचे आणि बाजारात उपलब्ध पर्यायी पिशव्यांचे दर त्यांना परवडत नसल्याने प्लास्टिकचाच वापर करणे अपरिहार्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तुम्ही त्यांना अशा उल्लंघनासाठी होणाऱ्या दंडाची बाब बोलून दाखविली असता संबंधित अधिकाऱ्यास ‘काहितरी’ देऊन सुटका करुन घेता येते असेही त्यांचेकडून सांगण्यात आले आहे. तुम्ही …’’

१.रद्दी आणि चिंध्यांपासून कमी किंमतीच्या पिशव्या बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्यामधीलच काहींना मदत आणि मार्गदर्शन कराल व प्लास्टिकचा वापर थांबवण्याची त्यांना विनंती कराल. (गुण २.५)

२.ग्राहकांना प्लास्टिकवर बंदी असल्याचे सांगून प्लास्टिकची पिशवी देता येणार नाही हे स्पष्टपणे सांगण्याची विनंती विक्रेत्यांना कराल. (गुण ०)

३. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाकडे तक्रार कराल व त्याच्यावर कारवाईची मागणी कराल. (गुण १.५)

४.स्थानिक प्रशासनाकडे या विक्रेत्यांबाबत लेखी तक्रार नोंदवाल आणि शासनाने अशा विक्रेत्यांना बाजारात उपलब्ध पर्यायी पिशव्या कमी दराने उपलब्ध करून देण्याची विनंती कराल. (गुण १)

नेमकी समस्या – 

’ग्राहक आणि विक्रेत्यांकडून प्लास्टिकचा बेकायदा वापर, पर्यायी व्यवस्था विक्रेत्यांना न परवडणारी, संबंधित अधिकारी कायद्याची अंमलबजावणी न करणारा व भ्रष्ट

’प्रसंगाचे मूल्यमापन, तुमची भूमिका व अधिकार

’प्रसंग अतिसंवेदनशील किंवा तात्काळ कृती करायची आवश्यकता नसलेला मात्र दूरगामी उपायाची गरज लक्षात आणून देणारा आहे. एक जागरुक नागरीक या नात्याने समर्पक कृती अपेक्षित पण अधिकार मर्यादित

पर्यायांचे विश्लेषण –

या उदाहरणातील पर्याय पाहिल्यास दुसरा पर्याय कोणत्याही प्रकारे प्रभावी नाही. प्लास्टिक बंदीची बाब ग्राहकांना माहीत नाही म्हणून ते प्लास्टिकच्या पिशव्या मागतात असे नाही. तसेच ग्राहकांची मागणी नाकारण्याइतका फेरीवाले वा भाजीवाल्यांचा व्यवसाय स्थिर नसतो. त्यामुळे याबाबत संवेदनशीलपणे विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी नाकारण्याबाबत अशा छोटय़ा विक्रेत्यांना आग्रह करणे फारसे परिणामकारक ठरणार नाही. या पर्यायातून तुम्ही कोणतीही जबाबदारी पार पडताना दिसत नाही तसेच कोणताच तोडगाही निघत नाही. तसेच एक जागरुक नागरिक म्हणून प्लास्टिक वापरापासून विक्रेत्यांना परावृत्त करणे हा परीणामही साधता येत नाही. उलट ती जबाबदारी विक्रेत्यांवर टाकून मोकळे होण्याची वृत्ती यामधून दिसते. त्यामुळे हा पर्याय फारसा स्वीकारार्ह नाही.

पर्यायातील आता उरलेल्या पर्यायांमधून अधिक समर्पक व या समस्येवर अंतिम आणि दूरगामी तोडगा निघू शकेल असा पर्याय निवडणे आवश्यक ठरते.

पर्याय चार हा कृतीशील वाटतो. कायद्याच्या विरोधात जाऊन केल्या जाणाऱ्या प्लास्टिक वापराबाबत शासनाकडे तक्रार करणे ही योग्य बाब आहे. त्यातून काही विक्रेत्यांवर कारवाई होऊ शकेल. मात्र अशा कारवाईनंतरही प्रशासनाच्या अपरोक्ष आणि ग्राहक टिकविण्यासाठी लपून छपून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शासन कल्याणकारी भूमिकेतून जीवनावश्यक वस्तूंचा आवश्यकतेप्रमाणे पुरवठा करू शकते. मात्र, महाग पर्यायी पिशव्या नागरिकांना स्वस्तामध्ये पुरविणे ही शासनाची जबाबदारी होऊ शकत नाही हे लक्षात आले पाहिजे. सर्व काही शासनाने करावे ही वृत्ती व अपेक्षा यातून दिसून येते. त्यामुळे योग्य वाटला तरी हा पर्याय व्यवहार्यही नाही आणि दूरगामी परिणाम करणाराही ठरत नाही. म्हणून या पर्यायास एक गुण देण्यात येईल.

तिसरा पर्याय संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कार्यवाहीचा उपाय सुचवतो. अशा प्रकारे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणे योग्यच आहे. पण त्यातून नेमक्या समस्येचे निराकरण होताना दिसत नाही. अधिकारी बदलला तरी नव्या अधिकाऱ्याच्या अपरोक्ष प्लास्टिक पिशव्यांचा वापर होणारच नाही याची खात्री देता येत नाही. त्यामुळे योग्य असला तरी हा पर्याय मूळ समस्येबाबत परिणामकारक ठरेलच असे नाही. त्यामुळे या पर्यायास दीड गुण देण्यात येईल.

पर्याय एक हा समस्येवरचा दूरगामी तोडगा आहे. यातून पर्यायी महाग पिशव्यांऐवजी पर्यावरणस्नेही अशा कागदी व कापडी पिशव्यांचा वापर सुरू होऊ शकतो. अशा स्वस्त पिशव्या बनवणे हा रोजगाराचा नवीन स्त्रोत ठरू शकतो. आणि त्यासाठी मदत मार्गदर्शन करण्याच्या तुमच्या विचारातून तुमची सकारात्मक वृत्ती आणि संवेदनशीलता दिसून येते. या माध्यमातून कोणतीही जबरदस्ती न करता ग्राहक आणि विक्रेत्यांच्या सवयीमध्ये बदल घडून येऊ शकतो. थोडक्यात यामध्ये समतोल व व्यवहार्य दृष्टिकोन, निर्बल समाजघटकांविषयी तसेच पर्यावरणीय संवेदनशीलता आणि कृतीशीलता असे तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलू दिसून येतात. त्यामुळे पर्याय एकला अडीच गुण देण्यात येतील.

 वरील विश्लेषणाचा विचार करता पर्याय दोनसाठी ० गुण, पर्याय चारसाठी १ गुण, पर्याय तीनसाठी १.५ गुण आणि पर्याय एकसाठी २.५ गुण दिले आहेत त्यामागचा विचार लक्षात येतो.

व्यवस्थापकीय अभिवृत्ती तपासणारे प्रश्न हा मुलाखतीच्या टप्प्यावरील सर्वात महत्त्वाच्या भाग असतो. समाधानकारक उत्तरे देणाऱ्या उमेदवाराला मुलाखत मंडळ पुढे असे प्रसंगाधारीत प्रश्न विचारून उमेदवाराचा अशा ट्रिकी प्रसंगातील प्रतिसाद आणि कारवाई काय असेल हे तपासत असते. अशा वेळी उमेदवारांना आपले स्वत:चे असे उत्तर वा पर्याय मांडता येतात. पण लेखी परीक्षेमध्ये दिलेल्या पर्यायातीलच एक जास्तीत जास्त समर्पक पर्याय कोणता असेल हे शोधायचे आहे. त्यामुळे उपलब्ध पर्यायांचे विश्लेषण आणि त्यांच्या समर्पकतेचे श्रेणीकरण करण्याची सवय असायला हवी.