scorecardresearch

Premium

एमपीएससी मंत्र: वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-२: पारिस्थितिकी व जैवविविधता घटक

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षेतील वनसेवा मुख्य परीक्षेतील पारिस्थितिकी तंत्र, त्याच्याशी संबंधित कृषी विषयक घटक, जैवविविधता आणि तिचे संवर्धन व भारतातील स्थानिक प्राणी व वनस्पतींच्या प्रजाती या मुद्दय़ांच्या अभ्यासाबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. 

article about mpsc exam preparation
(संग्रहित छायाचित्र)

फारुक नाईकवाडे

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षेतील वनसेवा मुख्य परीक्षेतील पारिस्थितिकी तंत्र, त्याच्याशी संबंधित कृषी विषयक घटक, जैवविविधता आणि तिचे संवर्धन व भारतातील स्थानिक प्राणी व वनस्पतींच्या प्रजाती या मुद्दय़ांच्या अभ्यासाबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. 

नागपूर ‘एम्स’मध्ये अधिष्ठाता पदांच्या निकषांना छेद ! कायद्यात अशी आहे तरतूद..
UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..
loksatta district index road construction in ratnagiri district achievements in banking sector
बँका, रस्त्यांच्या जाळ्यामुळे रत्नागिरी विकासाच्या वाटेवर
government scheme chatura marathi article, government scheme for womans marathi news
शासकीय योजना : स्त्री-उद्योजिकांना मिळणार प्रदर्शन प्रोत्साहन अनुदान

पारिस्थितिकी तंत्र

या घटकातील अन्नसाखळी, अन्न जाळे, कार्बन व नायट्रोजनची जैवरासायनिक चक्रे आणि कृषी घटकातील खते, वनस्पतींवरील रोग, कीटकनाशके आणि घातक वनस्पती/ तण या मुद्दय़ांवर दरवर्षी प्रश्न विचारलेले दिसून येतात.

अन्नसाखळीमधील प्रत्येक टप्प्यावरील सजीवांची वैशिष्टय़े, प्रत्येक टप्प्यावर होणारे ऊर्जेचे हस्तांतरण, जैव विशालन या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. अन्न जाळे व त्याचे प्रकार आणि त्यातील वेगवेगळय़ा टप्प्यांवरील सजीव यांचा आढावा घ्यायला हवा.

वनस्पतींना आवश्यक पोषक तत्वे व त्यांच्या अभावामुळे / अतिरिक्त प्रमाणामुळे होणारे रोग व त्यावरील उपाय हे मुद्दे टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यासता येतात. सेंद्रीय व रासायनिक खतांच्या वापराबाबत तुलनात्मक अभ्यास करायला हवा. पोषक तत्त्वांच्या प्रमाणाच्या आधारे रासायनिक खतांचे प्रकार, त्यांच्या वापराच्या पद्धती, अति वापरामुळे होणारे परिणाम व उद्भवणाऱ्या समस्या हे मुद्दे समजून घ्यावेत.

जैविक व रासायनिक कीटकनाशके, कीडनाशके व तणनाशके यांचा समाविष्ट घटक, वापराच्या पद्धती, वापराचे दूरगामी परिणाम, समस्या या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा.

वनस्पती व कृषी उपयोगी तसेच अन्य पाळीव पशुंचे आजार अभ्यासताना रोगाचे कारक घटक (जीवाणू जन्य/ विषाणूजन्य/ बुरशीजन्य/ पोषक तत्वांचा अभाव किंवा अतिरिक्त प्रमाण), रोगाची लक्षणे, त्यावरील उपचार व उपाय या मुद्दय़ांचा समावेश करावा.

 घातक वनस्पती/ तण हा घटक भारताबाहेरील स्थानिक प्रजातींचा भारतात झालेला प्रादुर्भाव, त्याचा इतर वनस्पतींच्या वाढीवर होणारा परिणाम, असल्यास भारतीय जैवविविधतेस निर्माण होणारे धोके, त्यांच्या वाढीवरील उपाय या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासायला हवा.

जैवविविधता

जैवविविधता या संकल्पनेमध्ये समाविष्ट घटकांचा व्यवस्थित आढावा घेणे आवश्यक आहे. जैवविविधतेच्या ऱ्हासासाठी कारणीभूत आर्थिक व पर्यावरणीय कारकांचा अभ्यास आवश्यक आहे. शेती, गृहनिर्माण, खाणकाम, पायाभूत सुविधांचा विकास, युद्धासारख्या मानवनिर्मित आपत्ती, निर्वनीकरण या मानवनिर्मित कारकांचा स्वरूप, कारणे, परिणाम, उपाय या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा. यामध्ये घनकचरा आणि मलनिस्सारण या घटकांचा समावेश करावा.

जनुकीय बदल, घातक प्रजातींचा प्रादुर्भाव, गंभीर रोगकारक सूक्ष्मजीव, नैसर्गिक आपत्ती, भूरासायनिक/ तापमानसंबंधी/ जलशास्त्रीय बदल या पर्यावरणीय घटकांचाही स्वरूप, कारणे, परिणाम, व्याप्ती, उपाय या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा.

मानवी आरोग्य, कृषी, इतर आर्थिक प्रक्रिया, हवामान संतुलन यामध्ये जैवविविधतेचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. जैवविविधता संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांच्या व राखीव वने / उद्याने/ अभयारण्ये यांच्या अभ्यासाबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली आहे.

भारताच्या स्थानिक सजीव प्रजाती

भारतातील वनांचे प्रकार, वैशिष्टय़े, भौगोलिक वितरण व त्यावर परिणाम करणारे हवामानशास्त्रीय घटक (उंची., तापमान, पर्जन्यमान, आद्र्रता इत्यादी), यांचा तुलनात्मक टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करणे व्यवहार्य ठरते. नकाशा समोर ठेवून उजळणी केल्यास फायद्याचे ठरते.

भारतातील महत्त्वाच्या स्थानिक वनस्पती प्रजातींचा अभ्यास आढळाचे ठिकाण, आवश्यक अनुकूलन, पारिस्थितिकी तंत्रातील महत्त्व या मुद्दय़ांच्या आधारे टेबलमध्ये नोट्स काढून करावा. अनुकूलनाचा विचार करताना मुळे, खोड, पाने, फुले, फळे, बीया, उंची, विस्तार यांमध्ये निर्माण झालेली वैशिष्टय़े समजून घ्यावीत. यामध्ये खारफुटी वनस्पतींचा अभ्यास महत्त्वाचा आहे.

भारतीय वनांमधील महत्त्वाच्या वृक्ष प्रजाती, त्यांचा वनोत्पादनामधील सहभाग, महत्त्व, इमारती लाकूड व अन्य आर्थिक महत्त्वाच्या उत्पादनांमधील महत्त्व व वनाधारीत उद्योग अशा मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासाव्यात.

औषधी वनस्पतींच्या प्रजाती, त्यांच्यापासून होणारे औषधी उत्पादन व त्यांचे आर्थिक महत्त्व, इंधन / ऊर्जा निर्मितीसाठी होणारी ऊर्जा वनस्पतींची लागवड, तिचे आर्थिक व पर्यावरणीय महत्त्व या मुद्दय़ांचा अभ्यास आवश्यक आहे.

भारताच्या महत्त्वाच्या स्थानिक वन्यप्राण्यांच्या प्रजातींचा अभ्यास पुढील मुद्यांच्या आधारे करावा – आढळाचे ठिकाण, तेथील भौगोलिक परीस्थिती, त्यामुळे झालेले अनुकूलन, असल्यास त्यांच्यासाठी राखीव असलेली वने / उद्याने किंवा अभयारण्ये, त्यांच्या संवर्धनासाठी करण्यात येणारे प्रयत्न, शासकीय योजना, लोकसहभागाचे उपक्रम

भारताच्या महत्त्वाच्या स्थानिक पाळीव प्राण्यांच्या प्रजातींच्या अभ्यासामध्ये आढळाचे ठिकाण, तेथील भौगोलिक परिस्थिती, त्यामुळे झालेले अनुकूलन, त्यांच्या संवर्धनासाठी करण्यात येणारे प्रयत्न, शासकीय योजना, त्यांचे आर्थिक महत्त्व या मुद्दय़ांचा समावेश करावा.

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाच्या दृष्टीने चराऊ कुरणे व पशुखाद्य यांच्या आर्थिक बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mpsc mantra forest service mains exam paper ii ecology and biodiversity elements amy

First published on: 29-11-2023 at 02:18 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×